२०१४ ची पुनरावृत्ती होणार ?

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात २०१४ साली शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या दिलीप मोहिते यांचा पराभव करून या मतदारसंघात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवला होता. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात भगवा फडकविण्याची नामी संधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चालून आलेली आहे. यासाठी या पक्षातील काही इच्छूकांनी दोन पावले मागे येऊन आपापल्या भलत्याच राजकीय महत्वाकांक्षेला लगाम घालण्याची गरज आहे.

तसे पाहिले तर या मतदारसंघात अखंड शिवसेना व अखंड राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हे गेली काही वर्ष सातत्याने एकमेकांविरोधात लढतच आलेले आहेत. दरम्यान एकमेकांविरोधात लढणारे हे दोन्ही पक्ष आज मात्र काही राजकीय अपरिहार्यतेमुळे एकत्र नांदत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री कुणाचा? यावरून सेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडून मोठाच तणाव निर्माण झाला. दोन्हीही पक्षांनी ‘मुख्यमंत्रीपद’ प्रतिष्ठेचे केल्यानंतर युतीच दुभंगली गेली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेसशी हातमिळवणी केली व या अभिनव प्रयोगातून महाविकास आघाडी जन्माला आली. दरम्यान अखंड शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांची शकले होऊन दोनाचे चार झाले व राजकारणाची नवीच समीकरणे उदयास आली.

थोडक्यात सांगायचे तात्पर्य असे की, मूळ शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राज्यातील बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र खेड तालुक्यांतील एखाद दुसरा अपवाद वगळता बहुसंख्येने पदाधिकारी, कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले.

दुसरीकडे मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फुटल्यानंतर या पक्षाचे आमदार दिलीप मोहिते हे आपल्या सर्व समर्थकांसह शरदराव पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. तालुक्यांतील जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाचे बहुतांश सर्व पदाधिकारी आमदार मोहितेंसोबत अजित पवार गटात गेले. सातकर गट सोडला तर एकही प्रमुख पदाधिकारी वा प्रमुख कार्यकर्ता उघडपणे शरदराव पवारांसोबत राहिला नाही.

याचाच अर्थ खेड तालुक्यात शरदराव पवारांना पक्ष फुटीचा जबरदस्त फटका बसलेला आहे. विद्यमान आमदारच सर्व लवाजम्यासह अजित पवार गटात गेल्यामुळे शरदराव गटाला मोठेच भगदाड पडले. त्यातुलनेत उद्धव ठाकरे यांचे काहीही नुकसान झालेले नाही. उद्धव ठाकरे यांची ताकद आहे तशीच आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांची दावेदारी अधिक भक्कम आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, भोसरी व हडपसर या जागांवर उद्धव ठाकरे गट अधिक आग्रही आहे. आणि ते स्वाभाविक आहे. अमोल कोल्हे यांना खासदार करण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मोठाच वाटा राहिलेला आहे. परंतु खासदार महोदयांना हे मान्यच नसल्याचे दिसते. त्यांना असे वाटते ते स्वत:च्याच कर्तृत्वावर निवडून आलेले आहेत. आणि त्यांना या लोकसभा मतदारसंघातील सहाचे सहा विधानसभा मतदारसंघात स्वत:च्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची घाई झालेली दिसते. एवढा उतावळेपणा चांगला नसतो. नाही तर त्यांनी खेड, भोसरी व आंबेगांव मतदारसंघातील शिवसैनिकांना नाराज करण्याचे काम केले नसते.

दरम्यान विधानसभेला शरदराव पवार गटाकडे उमेदवार नव्हता. आणि हेच हेरून भाजपचे अतुल देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला. मतांच्या बेगमीसाठी कोल्हेंनी राजकीय तडजोड करून यात महत्वाची भूमिका पार पाडली. यामुळे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भलतेच नाराज झालेले आहेत. की ज्यांचा देशमुखांना तीव्र विरोध आहे. महाविकास आघाडीत देशमुख यांच्या नावावर सहमती होणे अवघडच आहे.

दुसरीकडे विधानसभेच्या दृष्टीने जन ‘सेवेकरी’ता विशेष ध्यास घेतलेले आळंदी परिसरातील सुधीर मुंगसे यांनीही शरद पवार गटात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशमुख यांच्याप्रमाणेच मुंगसे यांना देखील खासदार महोदयांनी उमेदवारी मिळवून देण्याचे वचन दिलेले असावे. देशमुखांच्या तुलनेत मुंगसे यांची पाटी कोरी आहे. भलेही मुंगसे यांना शिवसेनेतील काही इच्छुकांकडून शब्द मिळालेला असेल. तसेच त्यांच्या राजकीय कर्तृत्वाला देखील मर्यादा येतात. त्यातच भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाने अधिक कंबर कसल्यामुळे मुंगसे यांच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते

एकंदरीतच सारासार विचार करता शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाचे सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वच मतदारसंघ शरदराव पवार यांच्या पक्षाकडे जाऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना यापैकी दोन किंवा तीन जागा निश्चितच लढेल. त्यापैकी खेड-आळंदी हा मतदारसंघ ठाकरे यांच्या पक्षासाठी अधिक अनुकुल असून त्यांची दावेदारी प्रबळ आहे.

या पक्षाचे माजी जिप सदस्य बाबाजी काळे हे महाविकास आघाडीच्या इतर इच्छूक उमेदवारांपेक्षा अधिक योग्य उमेदवार ठरू शकतात. काळे यांचा तालुक्यात सर्वदूर असणारा दांडगा लोकसंपर्क, तालुक्यात मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे, मोठ्या प्रमाणात असलेली नातीगोती, प्रतिमा या गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तसेच काळे हे इतर इच्छूकांच्या तुलनेत खुप लांब निघून गेलेले आहेत. विधानसभेची त्यांची तयारी खुप दिवसांपासूनची आहे.

बाबाजी काळे यांना पक्षांतर्गत काही इच्छूकांचा विरोध आहे. परंतू त्या विरोधाला काही अर्थ नाही. कारण काळे यांना पक्षाचे तिकिट मिळू नये, यासाठी हा विरोध आहे. यापैकी काही इच्छूकांचे शरद पवार गटाच्या इच्छूकांसोबत गुप्तगू चालू आहे. बाबाजी काळे यांना विरोध करणे, हाच या लोकांच्या विरोधाचे खरे कारण आहे. 

महाविकास आघाडीकडून बाबाजी काळे हेच अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना तगडी लढत देऊन चितपट करू शकतात. काळे वगळता महाविकास आघाडीकडून मोहितेंना लढत देऊ शकेल, असा तगडा उमेदवार कुणीच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील इच्छूकांनी आपआपसातील हेवेदावे मिटवून, तलवारी म्यान करून जर एकोपा दाखवला तर दहा वर्षानंतर पुन्हा एकदा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकाविणे अवघड नाही.