खेड तालुक्याचा आमदार विकासाभिमुख व चांगल्या प्रतिमेचा असावा

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे पुन्हा एकदा निवडणूकीच्या आखाड्यात उतरणे जवळपास नक्की आहे. भलेही मोहितेंनी गेल्या विधानसभा निवडणूकीतील प्रचारात राजकीय नसबंदीची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा  मोहितेंच्या विस्मृतीत गेल्याचे चित्र आहे. मोहितेंच्या त्या राजकीय नसबंदीचे काय करायचे? याबाबतचा निर्णय तालुक्यांतील जनताच घेईल. असो, घोडामैदान जवळच आहे.

दुसरीकडे आमदार मोहितेंच्या विरोधात उभे राहू इच्छीत असणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या यादीत काही खोगीरभरती केलेले उमेदवारही स्वत:ला चर्चेत व स्पर्धेत ठेवण्याचे काम करत आहेत. डोईजड असलेल्या आपल्या पक्षीय प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी मिळू नये, म्हणूनच काहीजण स्वत:ला इच्छूक असल्याचे दाखवतात. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या पण त्याला नको, हाच या लोकांचा मूळ हेतू असतो. आणि ही खोड तालुक्याला नवीन नाही. इच्छूकांची संख्या पाहून मोहिंतेना देखील गुदगुल्या होत असतील. दोनपेक्षा अधिक उमेदवार मैदानात असतील तर मोहितेंसाठी ते बरेच आहे. कदाचित यासाठी मोहिते देव पाण्यात ठेऊन बसले असावेत.

दरम्यान तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा सुसंस्कृत, स्वच्छ चारित्र्याचा असावा, तो विकासाभिमुख, लोकाभिमुख असावा, त्याच्याकडे विकासाची दूरदृष्टी असावी, तो वादग्रस्त नसावा, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व आपल्या विरोधकांना दहशतीच्या जोरावर जाणूनबूजून त्रास देणारा नसावा, अशीच भावना तालुक्यांतील जनतेची आहे. चुकीचा लोकप्रतिनिधी निवडला तर तालुक्यांतील सामाजिक वातावरण बिघडून तालुक्याचे मोठेच नुकसान होते. तसेच भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी देखील हे चांगले नसते.

उदाहरणच द्यायचे म्हणजे खेड तालुक्यातील चाकण परिसरात मोठी औद्योगिक वसाहत विकसित झालेली आहे व होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या दोन बड्या महानगरपालिका तालुक्याच्या खेटूनच आहेत. तरीदेखील खेड तालुक्यात मूलभूत समस्यांची वानवा आहे.

या औद्योगिक वसाहतीचा तालुक्यांतील मुली मुलांच्या शिक्षणासाठी, पायाभूत सुविधांसाठी नेमका काय आणि कसा उपयोग झाला, हे सांगणे कठिण आहे. तसेच तालुक्यात तीन तीन धरणे असूनही विशेषत: पश्चिम व पूर्व भागातील पाचवीला पुजलेल्या पिण्याच्या पाणीटंचाईचे उच्चाटन होऊ शकलेले नाही. ही वस्तूस्थिती असता लहान मोठे लोकप्रतिनिधी मात्र ऊर बदडून तालुक्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणल्याचे दावे करतात. दूरदृष्टीने काम केले असते तर या हजारो कोटींच्या झिरप्यातूनही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत टंचाईचे सावट दूर झाले असते. आणि या गोष्टींना आमदार मोहिते एकटेच जबाबदार नसून निष्क्रियतेचे महामेरू म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार शिवाजी अढळराव व विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील या गोष्टींची जाणीव असेल. राज्यात व केंद्रात सत्तेत असलेला भाजपही आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

खेड विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू आहे. त्यातच
शरद पवार गटाचा एक इच्छूक उमेदवार उद्धव ठाकरे गटातील काही इच्छूकांसोबत गुप्त बैठका घेऊन मांडवल्या करत असल्याची चर्चा आहे. सेनेतील इतर उमेदवारांच्या तुलनेत महाविकास आघाडीकडून बाबाजी काळे यांची दावेदारी नक्कीच भक्कम आहे. आणि याच दावेदारीला महाविकास आघाडीचे बहुतांश इच्छूक शह देत असल्याची चर्चा आहे. त्यातच भरीस भर म्हणजे राजकीय परिपक्वता व प्रगल्भता नसलेले खासदार महोदय खेड, आंबेगांव व भोसरी येथील महाविकास आघाडीतील पवार व ठाकरे गटातील इच्छूकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत.

खेड तालुक्यात अजित पवार गटातील आमदार मोहिते सेना सोडली तर इतर पदाधिकारी व काही कार्यकर्ते मोहितेंचे काम करतील का? याचा अजिबात भरवसा नाही. मोहिते सेनेतील काही पदाधिकारी देखील वयपरत्वे अण्णांनी आता थांबावे, या मानसिकतेत आहेत. आणि हे कटुसत्य आहे. मोहितेंना फक्त हुजरेगिरी करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी आवडतात. मोहितेंना तालुक्यात मोठा विरोध आहे. हे त्यांच्या लक्षातच आणून दिले जात नाही.

खेड तालुक्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कट्टर शिवसैनिक आहेत. परंतु अनेक वर्षांत योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज काही होत नाही. कि पक्षसंघटना देखील मजबूत होत नाही. तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. फक्त त्यांचा वापर होत गेला. तत्कालीन एकसंघ शिवसेनेकडून शिवाजी अढळराव हे पंधरा वर्ष खासदार म्हणून राहिले. मात्र त्यांनी पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. मुळातच अढळराव स्वत:ची प्रतिमा जपत स्वत:ला कायमच पक्षापेक्षा मोठे व वेगळे समजत होते. दुसरीकडे सेनेचे इतर पदाधिकारी देखील स्वत:चे वलय, ताकद वाढवण्यात अपयशीच ठरले. दिवंगत माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या काळातही शिवसेना पक्ष वाढला नाही कि पक्षात प्रबळ असा पदाधिकारी निर्माण झाला नाही. अढळराव व गोरे हे दोघेही आयात होते. खेड तालुक्यात स्वत:च्या ताकदीवर, स्वकर्तृत्वावर या पक्षात एकाही पदाधिकाऱ्याला स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही. आणि हे वास्तव आहे. आज या पक्षात तालुक्यांतील जनतेने गांभीर्याने दखल घेणारा, स्वबळावर निवडून येणारा नेमका कोणता पदाधिकारी आहे? हे सांगणे अवघड आहे.

मी सोडून पक्षात कुणीच इच्छूक नाहीत, असा प्रपोगंडा मोहितेंकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र अनिल (बाबा) राक्षे यांचा आमदार मोहितेंना पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध असल्याचे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. राक्षे देखील उमेदवारी मिळावी, यासाठी युद्धापातळीवर प्रयत्न करत आहेत. तसे पाहिले तर आमदार मोहितेंची प्रतिमा तसेच राजकिय कारकीर्द ही सुरवातीपासूनच वादग्रस्त राहीलेली आहे. त्यातुलनेत अनिल (बाबा) राक्षे हे वादग्रस्त नाहीत. आणि हीच त्यांची सर्वसमावेशक जमेची बाजू आहे.

आमदार मोहिते हे सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीत. शेवटच्या चेंडूपर्यंत ते हार मान नाहीत. असा त्यांचा स्वभाव आहे. असे असले तरी एकास एक लढत झाली तर त्यांचा पराभव कुणीच रोखू शकत नाही. अगदी त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवार देखील नाहीत. त्यामुळे मोहितेंना यावेळी अजित पवारांवर जास्त विसंबून राहता येणार नाही.

एकेकाळी विशेषत: पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा वारू चौफेर उधळलेला होता. त्याला रोखणे कुणालाच शक्य होत नव्हते. शेंदूर फासलेल्या दगडाला देखील निवडून आणण्याची ताकद, धमक अजित पवारांमध्ये होती. मात्र काळाचा महिमा बघा, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांना स्वत:च्या पत्नीला स्वत:च्या गावात निवडून आणता आलेले नाही. अलिकडच्या काळातील घडलेल्या काही गोष्टींमुळे तो ‘वारूच’ आज विकलांगिक स्थितीत पहूडलेला आहे. पूर्वी भले भले अजित पवारांसमोर जाण्यास व बोलण्यास कचरत असे. पण आज मात्र परिस्थिती अशी आहे की, ‘कुणीही यावे आणि टपली मारूनी जावे’ म्हणजेच गावपातळीवरचा टग्या कार्यकर्ता देखील त्यांच्याबद्दल अद्वातद्वा बोलून जातो, अशी अवस्था अजित पवारांची झालेली आहे.

मविआतील महत्वाचे स्थान, त्यानंतरचा रम्य पहाटेचा शपथविधी, पुन्हा मविआच्या गोटात शिरकाव, मविआ सोडून महायुतीतील ‘तिसरा’, तसेच ज्या शरदराव पवारांनी अजितचा अजितराव, अजितरावचा अजितदादा केला, त्याच शरदराव पवारांचा पक्ष अजित पवारांनी हिसकावून घेतला. या गोष्टीच अजित पवारांच्या राजकिय उतरंडीला कारणीभूत ठरल्या आहेत.