दिलीपराव, एकदाची निवृत्ती घ्याच…!
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

राज्याचे माजी मंत्री तथा आंबेगांव तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप वळसे यांनी नुकतेच ‘वळसे हेच तालुक्यातील दूध भेसळखोरांना पाठीशी घालत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, या प्रकरणात माझा काहीही संबंध असल्यास वा आढळल्यास मी तात्काळ सामाजिक जीवनातून निवृत्ती घेण्यास तयार आहे, असे जाहीर केले.
हे बाकी एकदाचे बरेच झाले, असेच म्हणावे लागेल.
दिलीपराव, तुम्ही निवृत्ती घ्याच बरं का…!
कदाचित वळसेंना राजकीय जीवनातून निवृत्ती घेणार असे म्हणायचे होते, परंतु नजर चूकवून त्यांच्या तोंडी राजकीय ऐवजी सामाजिक हा शब्द आला असावा. दिलीपराव, मोठ्या शिताफीने वा अक्कलहुशारीने तुम्ही राजकीय ऐवजी सामाजिक हा गोंडस शब्द वापरला.
समाजाशी माझी नाळ किती जुळलेली आहे, हेच तुम्हाला यातून दर्शवायचे असावे. असो.
दिलीपराव, पामर विरोधकांकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. ते जाणूनबुजून तुम्हाला त्रास देऊन तुमचा संबंध थेट तालुक्यातील नराधम व नालायक अशा दूध माफियांशी जोडू पाहत आहेत. तुमची बदनामी करू पाहत आहेत. ते त्यांचे कामच आहे. या दूध माफियांना देशद्रोहीच म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. कारण त्यांनी देशाच्या भावी पिढ्यांना कित्येक वर्ष विषयुक्त दूध पाजलेले आहे. त्यांना देखील मुलंबाळं असतील. परंतु याचा विचारच त्यांनी केलेला नाही. इतक्या दिवसांत या भेसळखोर देशद्रोह्यांचे दूध प्रकल्प जेसीबीने उध्वस्त करायला पाहिजे होती. परंतु ती झाली नाहीत. या कारवाईबाबत दिलीपरावांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
दिलीपराव, लवकर निवृत्ती घ्या..!
दिलीपराव, ज्या बाळंतीण मातांना सुरवातीला अपेक्षित असे दूध येत नाही, अशा मातांपुढे, त्यांच्या घरच्यांसमोर नुकत्याच जन्मलेल्या बाळांना बाहेरचे वा वरचे दूध पाजण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसतो. त्यामुळे काही तासांच्या, काही दिवसांच्या निष्पाप बाळांना देखील या नालायकांनी कित्येक वर्षे भेसळयुक्त दूधच पाजलेले आहे. लहान लहान मुले, आजारी तसेच वृद्धांना देखील या नालायकांनी भेसळयुक्त दूध पाजलेले आहे. ही पाषाण ऱ्हदयी लोकं समाजात जगण्याच्या तरी लायकीची आहेत का?
सांगा दिलीपराव, हे खरे आहे की नाही? कित्येक वर्षे ही बांडगुळं लोकांच्या जीवाशी खेळत होती.
दिलीपराव, खरोखर तुम्हाला निवृत्ती घ्यावीच लागणार आहे….!
समाजात विशेषतः राजकीय क्षेत्रात उजळ माथ्याने मिरविणारे हे भामटे व्यावसायीक थंडपणे किती भेसळयुक्त विष विकत होते, हे आता उघडकीस आले. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून तालुक्यात ही भेसळयुक्त दुधाची निर्मिती व विक्री अव्याहतपणे चालूच आहे. आणि भक्कम राजकीय पाठबळ वा संरक्षणाचे कवच असल्याशिवाय हे असले धंदे होऊच शकत नाही. संबंधित भामट्यांची ही भामटेगिरी अनेकांना माहित होती, असेही समजते. परंतु या भामट्यांमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तालुक्याच्या एका राजकीय दैत्याच्या, असुराच्या दबावामुळे सर्वसामान्य लोकं या भेसळीविरोधात बोलत नव्हती.
दिलीपराव, जाऊ द्या एकदाची तुम्ही निवृत्ती घ्याच…..!
दिलीपराव, तसे पाहिले तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच तुमचे विरोधक. आणि ते ही स्व तालुक्यातीलच. आणि तेच तुमच्यावर आरोप करत सुटले आहेत. त्यांची मजालच कशी झाली आरोप करण्याची? हेअजिबात बरे दिसत नाही. संबंधित विरोधक हे तुमच्याच तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्या तुमच्यावरील भेसळखोरांशी असलेल्या आरोपांवर आंबेगांव सोडून पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील लोकांचा लगेच विश्वास बसेल, अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे ते देखील या विरोधकांच्या आरोपांना खरे मानू लागलेले आहेत. लोकं चांगल्या व्यक्तींवरच बिनबुडाचे आरोप करत असतात.
दिलीपराव, तुम्ही निवृत्ती घ्याच…..!
तसेही तुमची दैदिप्यमान राजकीय कारकीर्द आता पूर्णतः झाकोळून गेलेली आहे. जेष्ठ नेते शरदराव पवारांचा हात जोपर्यंत तुमच्या पाठीवर, खांद्यावर, डोक्यावर होता, तोपर्यंत तुमचे एकदम बरे चालले होते. तुमची वीसही बोटे मधात असायची. आता मात्र परिस्थिती कमालीची बिघडलेली आहे. तुमची बोटे मधाऐवजी आता आंबेगांव तालुक्यातील विविध खाजगी डेअऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या शुद्ध? गावरान? तुंपात डुंबलेली आहेत. तसे ती पूर्वीपासूनच डुंबलेली होती. आणि हो संबंधित गावरान तुप भेसळयुक्त तर नाही ना, याची खात्री करून घ्या. नाहीतर तुमच्या विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळायचे.
दुसरीकडे तुमचे राजकीय वारसदार देखील तेवढे कर्तृत्ववान नाहीत. शेंदूर फासलेल्या दगडांसारखे त्यांचे स्वकर्तृत्व आहे.
त्यामुळेच दिलीपराव, तुम्ही एकदाची निवृत्ती घ्याच…..!
वळसेंनी तालुक्यातील नालायक भेसळखोरांना पाठीशी घातले किंवा नाही, हे आंबेगाव तालुक्याबाहेरच्या लोकांना फारसे माहिती नाही. परंतु आंबेगाव तालुक्यातील लोकांना याबाबत खुप काही माहिती असावे. एक मात्र खरे की भेसळयुक्त दुधाची निर्मिती करून त्याची विक्री करणारे संबंधित नालायक, नराधम, देशद्रोही दूध माफिया हे तुमच्या जवळची म्हणजे ओळखीची तर नक्कीच असणार. काहीजण तर तुमची कार्यकर्ते देखील असतील. हे बाकी कोणीही नाकारू शकणार नाहीत. अगदी स्वतः तुम्ही देखील.
दिलीपराव, तुम्हाला निवृत्ती घ्यावीच लागणार आहे…..!
अशा नराधमांना फाशी मिळावी आणि हीच यांच्यासाठी एकमेव शिक्षा आहे. मग तो आंबेगांव तालुक्याचा असो की राज्याच्या कोणत्याही भागाचा. तसेच तो वळसेंच्या जवळचा सहकारी असो की कार्यकर्ता असो की अन्य कोणा मंत्र्याच्या वा अगदी मुख्यमंत्र्यांच्या देखील.
दिलीपराव, आता तुम्ही निवृत्ती घ्यायलाच पाहिजे…..!
दिलीपराव, आंबेगांवसह शिरूर तालुका व महाराष्ट्रातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. अंतिम विजय सत्याचाच होईल, वगैरे वगैरे फिल्मी पद्धतीची भाषा देखील तुम्ही वापरली म्हणे. दरम्यान संपूर्ण शिरूर तालुका नव्हे. शिरूर तालुक्यातील जी ३०/३५ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत, त्या गावांतील जनतेचा विश्वास तुमच्यावर आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे. या दोन्ही तालुक्यांचा विचार केला तर म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर तुमच्याकडे अधिकच्या वा जास्तीच्या फक्त १५२३ जणांचाच विश्वास असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणे जिल्हा व महाराष्ट्रात न गेलेलेच बरे. जिथे स्व: तालुक्यातील जनतेला तुमचे काहीही पडलेले नाही, तिथे पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेला काय पडले असणार? तुम्ही काहीही म्हणा कारण त्याला आता काहीच अर्थ राहिलेला नाही. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असल्याची जी हाळी दिली आहे, ती निव्वळ गंमत आहे. कारण विरोधकांनी तुम्हाला बेअब्रू केलेले आहे.
दिलीपराव, निवृत्तीचे तेवढे पहा….!
खेड तालुका हा तर तुमचे आजोळच ना. मग तुम्ही आंबेगावसह खेड आणि शिरूर असे म्हंटले असते तर खेड वासियांना देखील खुप खुप बरे वाटले असते. आजोळकरांचे तुमच्यावर भलतेच प्रेम व विश्वास आहे. त्यातल्या त्यात तुमचे नांवकरी दिलीपराव मोहिते हे तर तुमच्यावरील आरोपांवरून फारच व्यथित झाल्याचे कळते. ते त्या आरोपांचा निषेध करून आरोपकर्त्यांचा बेतच बघणार आहेत, असेही कळते. आमच्या पक्षाच्या बड्या नेत्यावर आरोप करताना विरोधकांना जराही काही वाटले नाही, अशी खंत दिलीपराव मोहितेंनी व्यक्त केली आहे. एकंदरीतच त्यांनी स्वतःच्या मनाला खुपच लावून घेतलेले आहे. दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची देखील मोहितेंसारखीच अवस्था झालेली आहे. तसेच हे आरोप ऐकून आढळराव उद्विग्न झालेले आहेत. असो.
दिलीपरावांमुळेच आंबेगाव तालुका हा दूध (भेसळयुक्त नव्हे) उत्पादनात एवढा पुढे गेलेला आहे. या तालुक्यात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघापेक्षा खाजगी दूध उत्पादकवालेच मोठ्या प्रमाणात दूध संकलन करतात अशी परिस्थिती आहे.
एक जर्सी दूधवाला तर पुणे व मुंबई येथील नट-नट्यांना, उद्योगपतींना देखील दूध पुरवठा करतो असे म्हणतात? तसेच त्याच्या कंपनीपुढे तर डझनांनी दुधाचे टॅंकर उभे असतात म्हणे. जसे की संपूर्ण जिल्ह्याचे दूध संकलन त्यांच्याच कंपनीकडून केले जाते. मुळात एवढे दूध कसे व कूठून येते, हा मोठाच प्रश्न आहे. तसे पाहिले तर याच्या दावणीला जेवढ्या गायी, म्हशी आहेत, त्यापेक्षा प्रचंड प्रमाणात हा दूध निर्मिती व संकलन करतो म्हणे? भारीच आहे गड्या. हा केवळ मुखवटा आहे, सदर कंपनी ही मूळ तीन स्लीपिंग पार्टनरांची असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दिलीपराव, बहुसंख्यांची इच्छा आहे की, तुम्ही निवृत्ती घेऊनच टाका….!
मुळातच कोणताही चुकीचा, अवैध धंदा असो. त्याला राजकीय पाठबळ, आशिर्वाद, संरक्षण लागतेच लागते. त्याशिवाय हे असले धंदे करणे कसे शक्य आहे?
नाही का दिलीपराव……?
दरम्यान आंबेगाव तालुका भेसळयुक्त दूधाच्या विषयात तुमचा हस्तक्षेप असेल वा नसेल तसेच भेसळखोरांना तुम्ही वाचवत असाल किंवा नसाल यातून काही अंतिम सत्य बाहेर येईलच हे सांगणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे सध्याचे सहमतीचे, सांभाळून घेण्याचे, क्लीन चीट देण्याचे, तडजोड करण्याचे आलेले सुगीचे दिवस. सरतेशेवटी सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, हेच अंतिम सत्य आहे. येथील राजकीय व्यवस्थेत माणसाच्या जीवाची थोडीच पर्वा व किंमत केली जाते? आणि आम्ही बघतोय विकसित भारताचे स्वप्न. असो
दिलीपराव, तुमची निवृत्ती जनतेला हवी आहे…!
परंतु गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून श्री भीमाशंकर देवस्थानमध्ये जो घोळ चालू आहे, जी लूट चालू आहे, जी आर्थिक अनियमितता झालेली आहे, त्याची जबाबदारी देवस्थानचा प्रमुख म्हणून, अध्यक्ष म्हणून तुम्हाला तर अजिबात झटकता येणार नाही. किंबहुना झटकून दिली जाणार नाही.
मान. धर्मादाय आयुक्तांनी जो निरीक्षक अहवाल दिला होता, त्यात जे दहा विश्वस्त निलंबित केले होते, ते तर तुमचेच होते ना? दोषींना तुम्हीच अध्यक्ष व उपाध्यक्ष केले होते ना? आणि अजूनही त्याच दोषी प्रवृत्ती मंदिराचे नियोजन पाहत आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का? पिंडीवरील या विंचवांच्या नांग्या का ठेचल्या नाहीत तुम्ही?
संबंधित चोरांनी भीमाशंकर देवस्थानची कोट्यावधी रूपयांची लूट केलेली आहे. अजूनही होत आहे. असो. याबद्दल सविस्तरपणे समाचार घेतला जाईलच.