दुधावरचा बोका ते पिंडीवरचे विंचू…! भाग-३
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

एकंदरीतच श्री भीमाशंकर देवस्थानचा सर्व कारभारच नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे. चोराच्याच हाती तिजोरीची चावी दिलेली आहे. असे दुर्मिळ व अद्भुत उदाहरण संपूर्ण विश्वात देखील शोधून सापडणार नाही. आणि ते ही राज्याचे विविध मंत्रीपदे उपभोगलेल्या, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून राहिलेल्या, या देवस्थानचा कित्येक वर्षे अध्यक्ष म्हणून राहिलेल्या, अजूनही देवस्थानचे संपूर्ण सूकाणू आपल्याच हाती ठेवलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली.
मुळातच भीमाशंकर देवस्थानमध्ये विश्वस्त नेमण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला काहीच अर्थ व निकष नाहीत. जून २०१८ पासून या देवस्थानमध्ये अधिकृत व कायदेशीररीत्या ट्रस्टच अस्तित्वात नाही. देवस्थानच्या पूर्वीच्या काही दोषारोपी ठरलेल्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच थेट शासनालाच आव्हान देत बेकायदेशीररीच्या देवस्थानचा ताबा घेतलेला आहे.
पूर्वी देवस्थानच्या ट्रस्टमध्ये एकूण १९ पैकी १० विश्वस्त हे गुरव व ब्राम्हण समाजाचे होते. १० पैकी ७ गुरव समाजाचे व ३ ब्राह्मण समाजाचे.
सुरेश कौदरेनी अतिशय धूर्तपणे व चलाखीने त्याला सोयीस्कर अशाच पद्धतीने या ट्रस्टची नोंदणी करून घेतलेली आहे. जेणेकरून बहुमताच्या जोरावर मंदिर हे पूर्णपणे या दोन्ही समाजाच्या ताब्यात राहील. मंदिर लूटून खाणाऱ्यांनी या मंदिरावरच मालकीहक्क प्रस्थापित केलेला आहे.
दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांकडून जे चार विश्वस्त नेमले जातात, ते देखील राजकीय प्रभावाने, ओळखीने नेमले जातात. त्याला देखील काही अर्थ नाही.
श्री भीमाशंकर हे देशातील एक मोठे देवस्थान आहे, ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येथे दरवर्षी लाखो भक्त भाविक येत असतात. या माध्यमातून येथे कोट्यावधींची आर्थिक उलाढाल होते. भाविकांकडून देवस्थानला श्रद्धेने प्रचंड प्रमाणात देणग्या, सोनेनाणे अर्पण केले जाते. एवढे सारे असूनही या देवस्थानचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी त्या योग्यतेचा कुशल व तज्ञ माणूसच नाही. आणि इथेच सर्व पाणी मुरलेले आहे. या आरोपींनी स्वतःच्या ताब्यात सर्व आर्थिक व्यवहार असावेत म्हणून जाणीवपूर्वक व वाईट हेतूनेच आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी तज्ञ माणूस ठेवलेला नाही. या लोकांकडून केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठीच या देवस्थानचा वापर केला जात आहे. भस्म्या झालेला आहे या लोकांना. तरीही यांची हाव काही सुटेना. अजीर्ण झालेले आहे.
सर्वात धक्कादायक व गंमत म्हणजे, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध मंत्री सातत्याने येत असतात. पण ज्यांच्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालय म्हणजेच न्यायालयाचा वहीम आहे, ज्यांनी दहशतीच्या जोरावर मंदिराचा ताबा घेतलेला आहे. अशांच्या शुभहस्ते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत, सत्कार, केला जातो. हीच मोठी शोकांतिका आहे.
अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा पाहणारी यंत्रणा, तसेच विविध गोपनीय यंत्रणा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांना या गोष्टींची जराही कल्पना नसावी? हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. स्वत: पुणे जिल्हाधिकारीच अशा लफंग्यांसोबत मांडीला मांडी लावून यात्रा नियोजनाच्या बैठका घेत असतील तर, याला काय म्हणावे? मुळातच धर्मादाय आयुक्तांनी दोषीरोपपत्र ठेवलेले व निलंबित केलेले माजी विश्वस्त सुरेश कौदरे देवस्थानचे अध्यक्ष म्हणून शासकीय बैठकांना हजरच कसे राहू शकतात? वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे माहीत नाही का?
दरम्यान वळसे, कौदरे व गवांदे या तिघांमध्ये जरा देखील नैतिकता शिल्लक राहिलेली असेल, तर त्यांनी धर्मादाय सह आयुक्त यांनी केलेल्या निरीक्षण अहवालाची चौकशी पूर्ण होईपर्यंत, देवस्थानच्या कारभारात भाग घेऊ नये व ढवळाढवळही करू नये.
मुळातच याठिकाणी काय काय भानगडी चालतात, याची साधी कल्पना पुणे जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयांना नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. ते असहाय आहेत. कारण या मंदिरावर दिलीप वळसेंचा पूर्णतः ताबा असल्यामुळे तसेच त्यांच्या राजकीय प्रभावामुळे सर्व भानगडी डोळ्याआड केल्या जात आहेत. एकप्रकारे दोघांकडूनही पांघरूण घातले जात आहे. याचाच गैरफायदा घेऊन विशेषतः सुरेश कौदरे याने या देवस्थानमध्ये धुडगूस घातलेला आहे.
एकंदरीतच गेल्या वीस ते पंचवीस वर्षांचा विचार केला तर या देवस्थानमध्ये विविध मार्गाने काहीशे कोटीं रूपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. वळसेंच्या आशिर्वादाने कौदरे याने देवस्थानचा कब्जाच घेतलेला आहे. फक्त मंदिर स्वत:च्या नावावर करणे एवढेच बाकी आहे. ‘अंध दळतंय अन् कुत्र पीठ खातयं’ अशातलाच हा प्रकार आहे.
मंदिर व मंदिर परिसरात सुरेश कौदरे जी संघटित टोळी चालवत आहे, त्या टोळीला वळसेंचा नाहीतर कुणाचा आशिर्वाद आहे? त्या टोळीला सर्वार्थाने सांभाळणारे, त्यांचे सर्वच कृत्ये पाठीशी घालणारे, दिलीप वळसे हेच या टोळीचे प्रमुख आहेत. आणि हे जगजाहीर आहे.
‘मी नाही त्यातला अन् कडी कोयंडा लावा बाहेरचा’ असाच वळसेंचा एकुण कारभार आहे.
वळसे व कौदरे यांचे नाते म्हणजे ‘मी तुला मारल्यासारखे करतो व तू रडल्यासारखे कर’ अशा स्वरूपाचे आहे. वळसे व कौदरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकंदरीतच सुरेशनी आता गप्प बसावे. कायदा सर्वोच्च आहे. वळसेंच्या व अजून काही नेत्यांच्या पदराखाली किती दिवस लपतां येणार आहे? भस्म्या झालेलाच आहे. आता तो वाढू न देणे हिताचे ठरेल, अन्यथा कायदा एकदा मागे लागला की कुणीच वाचवू शकत नाही.
भीमाशंकर मंदिरातील दानपेटी दिसेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही लावलेला होता. परंतु या लोकांनी सीसीटीव्हीची दिशाच बदलून टाकली होती.
सर्वात हलकटपणा म्हणजे नंदीशेजारी जी मोठी दानपेटी आहे. या दानपेटीतील उत्पन्न कार्यकारी विश्वस्त म्हणजे तहसीलदार यांचे नावे शासन जमा होते. या दानपेटी शेजारूनच भाविकांची रांग दर्शनासाठी मंदिरात जाते. त्यामुळे त्या दानपेटीत भाविकांनी पैसे टाकू नये म्हणून सुरेश व त्याची टोळी त्या दानपेटीला आडवा लोखंडी बॅरीकेड लावायची. जेणेकरून या दानपेटीऐवजी भाविक मंदिरातील दानपेटीत अधिक पैसे टाकतील. भयंकर शातीर माणूस आहे सुरेश कौदरे. तसेच तेथे जमा होणारे हजारो नारळ मंदिरा शेजारच्या इमारतीत न्यायचे व पुन्हा तीच नारळ मंदिर परिसरात पानफुले विकणाऱ्यांना विकायचे.
दर्शनपास मधून देवस्थानला मोठे उत्पन्न प्राप्त होते. परंतु सुरेश व त्याची टोळी विना दर्शनपासाद्वारे भाविकांकडून मोठ्या रकमा घेऊन त्यांना मागच्या बाजूने मंदिरात सोडतात. सध्या प्रति भाविक पाच हजार रुपये भाव असल्याचे स्थानिकांकडून समजते.
या भामटेगिरीचा खेळ मुख्यत्वे पहाटे पाच वाजेची आरती झाल्यानंतर सकाळी साडेसात या वेळेत होतो. तसेच दिवसभर देखील खेळ चालूच असतो.
जिल्हाधिकारी डुडी यांचे पांघरूण..!
स्व अजित दादांनी डुडींना पुणे जिल्हाधिकारी करताना त्यांच्या कामाचे सार्वजनिक कौतुक केले होते. परंतु असे असूनही डुडींना स्वतःची अशी वेगळी प्रतिमा निर्माण करता आली नाही की कामांच्या माध्यमातून छाप पाडतां आली नाही. विशेषतः पर्यावरणाच्या बाबतीत जिल्हाधिकारी डुडी अजिबात संवेदनशील नाहीत.
धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षी देवस्थानच्या कार्यकारी विश्वस्त असलेल्या तहसीलदारांनाच सुरेश कौदरे व त्याच्या इतर साथीदारांनी की जे दोषारोपात सापडलेले आहेत. त्यांनी बेकायदेशीरपणे पदच्युत करून दहशतीच्या व बेकायदेशीर मार्गाने मंदिराचा ताबा घेतला व स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केले. अरे हे काय चालू आहे? आपल्या एका महसूल अधिकाऱ्याला कार्यकारी विश्वस्त पदावरून अशा बेकायदेशीरपणे काढले जाते, तरीही जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी काही करत नसेल तर हे त्याहूनही गंभीर म्हणावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी एवढी उदासीनता व असंवेदनशीलता दाखविणे, खचितच चांगले म्हणता येणार नाही. याला वचक म्हणतात का? याला पदाचा रूबाब म्हणतात का? मुळातच देवस्थानचा ताबा घेतलेल्या या बोगस लोकांवर तातडीची कारवाई करणे जिल्हाधिकारी महोदयांकडून अपेक्षित होते. परंतु त्यांनी मूळमूळीत भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती नक्कीच संशयास्पद आहे. एकप्रकारे जिल्हाधिकारी डूडी यांनी या लोकांच्या गुन्ह्यावर पांघरूण घातलेले आहे
वळसेंची भूमिका सहाय्यभूतच
दरम्यान हा जो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे हे एका माजी मंत्र्याला, कायद्याच्या विद्यार्थ्याला, देवस्थानचा माजी अध्यक्ष व सर्वेसर्वा म्हणून राहिलेल्या आमदार दिलीप वळसेंना माहिती नाही का? त्यांनी या प्रकाराला आक्षेप का घेतला नाही? का पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही की धर्मादाय आयुक्तांकडे यांची तक्रार केली नाही?
दरम्यान आंबेगाव तालुक्यातील दुधावरच्या बोक्याने भेसळयुक्त दुधाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करून ते भेसळयुक्त दूध जिल्ह्यात तसेच राज्यात विकून त्यातून बक्कल कमाई केलेली आहे. या बोक्याने भेसळयुक्त धंद्यात अक्षरशः हैदोस घातलेला आहे. हा बोका काही साधासुधा नाही. या दुधावरच्या बोक्याने स्वतःचा तालुका सोडून शेजारच्या खेड तालुक्यातील श्री भीमाशंकर मंदिरात देखील प्रवेश केला. येथील महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणाऱ्या अगदी दूध, मध, दही, नारळासह नोटांची बंडले, किमती सोने चांदीचे दागिने तसेच बेकायदेशीर दर्शनपासामधून मिळणाऱ्या प्रंचड पैशांवर हा बोका सारखा टपून बसलेला आहे. या टोक्या बाबाची पापणी देखील लवत नाही.
या दुधावरच्या बोक्याने पिंडीवर स्वतःचे पाळलेले काही विंचू बसवलेले आहेत. या बोक्याच्या संरक्षक कवचामुळे पिंडीवरच्या विंचवांनी यथेच्छ धुडगूस घातलेला आहे. त्यामुळे या बोक्यासह पिंडीवरच्या विंचवांना देखील ठेचून काढले पाहिजे. बोक्याने पाळलेले हे विंचू कुणालाच दाद देत नाहीत. ते मुजोर झालेले आहेत.