खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात पुढील आमदार महिला?

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून महिलेला उमेदवारी देण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने सुरू असल्याचे खात्रीलायक समजते. त्यादृष्टीने शक्यता देखील पडताळून पाहिल्या जात आहेत. कारण १९६७ ते २०१९ या काळात झालेल्या विधानसभेच्या १२ निवडणुकांमध्ये खेड तालुक्यातील एकाही महिलेला विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे ही शक्यता अधिक गडद होत आहे. असे झाले तर तालुक्याच्या दृष्टीने ती एक ऐतिहासिक घटना ठरेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शांतता नांदेल. परिणामी तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत होऊन तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ते अधिक पोषक ठरेल. त्यामुळे यावर फक्त चर्चा न करता ठाम निर्णय घेणे अपेक्षित आहे. या मतदारसंघात आजपर्यंत म्हणजेच गेल्या ५७ वर्षांच्या कालावधीत फक्त लाडक्या भावांच्याच हिताचा विचार करून बहिणींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे या निवडणूकीत तरी सर्व पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या लाडक्या बहिणीचे हित सांभाळून तिला विधानसभेला नेतृत्व करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा महिला वर्गाने व्यक्त केली आहे.

दिलीपभाऊंना पाच विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव. ते पाच पैकी तीन वेळा आमदार म्हणून निवडून देखील आले. असे असूनही दिलीपभाऊ सहाव्यांदा मुंडावळ्या बांधून तयार. लाडक्या बहीणींचे जाऊ द्या हो, पण स्वत: ऐवजी स्वत:च्या पत्नीला तरी उमेदवारी मिळावी एवढा मोठेपणा दिलीपभाऊंनी दाखवून आता तरी थांबले पाहिजे. अशी माफक अपेक्षा तालुक्यांतील लाडक्या बहीणींनी व्यक्त केली आहे.

खेड तालुक्यातून प्रामुख्याने विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी माजी जिप सदस्या सुरेखा मोहिते, माजी आमदार दिवंगत सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या राज्य उपाध्यक्षा तसेच खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे यांच्या स्नुषा ॲड. राजमाला बुट्टे तसेच माजी जिप सदस्य अनिल (बाबा) राक्षे यांच्या पत्नी माजी जिप सदस्या डाॅ. रोहिणी राक्षे यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत पुढाकार घेण्याची गरज असल्याचे महिला वर्गांमध्ये बोलले जात आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व जेष्ठ नेते खासदार शरदराव पवार हे नेहमीच राजकीय धक्कातंत्र अवलंबविण्यात माहिर असल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे. अधिकाधिक महिलांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे, याबाबत शरदराव पवारांची भूमिका ही नेहमीच सकारात्मक राहीलेली आहे. दुसरीकडे ज्या विद्युत वेगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले, अगदी त्याच पद्धतीने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या एखाद्या महिला पदाधिकारी वा सर्वसामान्य कार्यकर्तीला उमेदवारीची संधी देऊन तालुक्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान करावा, अशी अपेक्षा तालुक्यांतील महिला वर्गाची आहे.

एकीकडे महिलांना राजकारणात ३३ टक्के, ५० टक्के आरक्षण दिले जावे, यासाठी देश व राज्यस्तरीय सर्वपक्षीय नेते बेंबीच्या देठांपासून गप्पा झोडण्याचे काम करतात. मात्र निवडणूकांमध्ये जेव्हा वरीलप्रमणे उमेदवारी द्यायची वेळ येते, तेव्हा हीच नेतेमंडळी सोयीस्करपणे मौन बाळगून महिलांच्या हक्कांकडे एकप्रकारे दुर्लक्ष करतात, कानाडोळा करतात. त्यावेळी ३३ व ५० टक्क्यांचा यांना विसर पडतो. दुसऱ्या बाजूला हीच प्रस्थापित नेतेमंडळी आपल्या घरात आमदारकी, खासदारकी राहावी म्हणून आपल्याच घरच्या महिलांना उमेदवारी देतात. वेळप्रसंगी आपल्याच नात्यांमधील, सग्यासोयऱ्यांमधील महिलांना दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करतात. म्हणजेच प्रस्थापित घराणीच खऱ्या अर्थाने ३३ टक्क्यांचे खरे लाभार्थी आहेत.

दरम्यान ऐनवेळी कोणती महिला कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवेल, हे अद्याप तरी सुस्पष्ट नसले तरी महिलेच्याच हाती तालुक्याची धुरा जाईल, हे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान सुरेखा मोहिते यांना राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्या स्वत: जिप सदस्या होत्या. त्यांचे पती विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे तीन वेळा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे सुरेखा मोहिते यांचा राजकारणात नेहमीच थेट व सक्रीय सहभाग राहिलेला आहे. दिलीपरावांना त्यांची कायमच खंबीर अशी साथ लाभलेली आहे. पक्षाचा कोणताही लहान मोठा कार्यक्रम, मेळावा असो, त्या आयोजनात सुरेखाताई स्वत: आघाडीवर राहतात. तालुक्यांतील विविध प्रश्नांची देखील त्यांना चांगली जाण आहे. एकंदरीतच खऱ्या अर्थाने त्या शॅडो आमदारच आहेत. पंधरा वर्षे त्यांच्या घरातच आमदारकी राहिलेली असल्यामुळे त्या स्वत: आमदारकी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. दिलीपरावांच्या तोडीस तोड त्यांचा तालुक्यात जनसंपर्क असून तालुक्याचा कानाकोपरा त्यांना परिचित आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते दांपत्यामध्ये भांडणे लावण्याचा हा प्रकार नसून दिलीपरावांनी देखील मोठ्या मनाने स्वत: ऐवजी स्वत:च्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.

खेड तालुक्याचे शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेशभाऊ गोरे हे शांत व संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे. आमदार होण्यापूर्वी ते पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे ते तालुक्याचे आमदार राहिले. परंतू त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यातील कुणालाच अगदी तो त्यांचा राजकीय विरोधक का असेना, त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास देण्याचे काम केलेले नाही. तालुक्यांतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. दुदैवाने कोविड काळात त्यांचे निधन झाले व तालुका एका चांगल्या राजकीय व्यक्तीला कायमचा मुकला. दरम्यान त्यांच्या पत्नी मनीषा गोरे या राजकारणात कधीच सक्रीय नव्हत्या. की त्यांनी कधीही कोणत्याच व्यासपीठावर हजेरी लावल्याचे स्मरत नाही. मध्यंतरी मनीषा गोरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. चाकण परिसर व आसपासची गावे तसेच तालुक्यात देखील सुरेशभाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे. चाकण परिसरात गोरे कुटुंबीयांची मोठी भावकी व सगेसोयरे आहेत. सुरेशभाऊंचे दोन चुलत भाऊ तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असले तरी त्यांना मर्यादा येतात. त्यामुळे सुरेशभाऊंचा राजकिय वारसा पुढे चालू ठेवण्याची मोठी संधी मनीषा गोरेंना चालून आलेली आहे. तसेच त्यांच्या नावावर तालुक्यात एकमत होणेही अवघड नाही. सर्व वर्गांकडून त्यांना मोठी मदत व पाठिंबा मिळू शकतो.

राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाच्या माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांचा देखील उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो. त्यांनी जिपचे अध्यक्षपद कोणत्याही वादाशिवाय सांभाळले आहे. त्या आमदार मोहितेंच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. जिप अध्यक्ष या नात्याने त्यांनी तालुका पिंजून काढलेला आहे. वेळ आली तर पानसरे यांच्या रूपाने आणखी एक पर्याय अजित पवार यांच्या पक्षाकडे उपलब्ध आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या राज्य महिला उपाध्यक्षा तसेच खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे यांच्या स्नुषा ॲड. राजमाला बुट्टे यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. आजही साहेबराव बुट्टे यांच्याबद्दल व्यक्तीश: व त्यांच्या एकूणच कार्याबद्दल तालुक्यात नेहमीच आदरपूर्वक बोलले जाते. त्यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून राजगुरूनगर येथे लावलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन आज हजारो विद्यार्थिनी विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एका अर्थाने बुट्टे कुटुंब तालुक्याच्या गावागावांत, घराघरात पोहचलेले आहे. ॲड. राजमाला बुट्टे या संस्थेत सक्रीय असून महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांचे वक्तृत्व उत्कृष्ट आहे. या संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे हे ॲड. राजमाला यांचे पती असून शरदराव पवार तसेच नामदार दिलीप वळसे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. देवेंद्र बुट्टे हे देखील यापूर्वी विधानसभेसाठी इच्छूक होते.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या माजी जिप सदस्या डाॅ. रोहिणी राक्षे यांच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यांचे पती अनिल (बाबा) राक्षे हे देखील माजी जिप सदस्य म्हणून राहिलेले आहे. राक्षे दांपत्य ज्या राजगुरूनगर-रेटवडी या जिप गटातून येतात, त्या गटात लोकप्रतिनिधी या नात्याने या दोघांनीही मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केलेली आहेत. राजगुरूनगर शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये राक्षे कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राजकारण हा त्यांच्यासाठी नवीन विषय नाही. पक्षाकडून त्यांना जर उमेदवारीची संधी मिळाली तर त्या चांगल्या पद्धतीने निवडणूकीला सामोरे जाऊ शकतात. कारण अनिल (बाबा) राक्षे यांचे तालुक्यात सर्वपक्षीयांमध्ये चांगले राजकीय संबंध आहेत. या संबंधांचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.