…. हा तर प्रस्थापित घराणेशाही व नात्यागोत्यांचा विजय

द्वारा.. अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे कवित्व संपले असले तरी थोरात-तांबे कुटुंब व काॅंग्रेस अंतर्गत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतच आहेत. कोण खरे व कोण खोटे? यांत संबंधित सोडून इतरांनी पडण्याचे काहीएक कारण नाही. कारण हल्ली राजकारणाची पातळी खाली घसरल्यामुळे मतलबी संधीसाधूपणा वाढीस लागलेला आहे.

एकंदरीतच तांबे पिता-पुत्राच्या राजकीय खेळीमुळे बाळासाहेब थोरातांची मोठीच अडचण निर्माण झालेली आहे. मुळातच नाशिक पदवीधरची जागा तांबे कुटुंबातच दिली जात असताना देखील संबंधितांचे समाधान झाले नाही.

प्रत्येक पक्षात स्वत:चा राजकीय वारस निर्माण करताना, सर्वसामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान व लायक कार्यकर्त्यांच्या राजकीय सुंता करून त्यांना डावलले जाण्याचे घाणेरडे काम प्रस्थापितांकडून पिढ्यांपिढ्या केले जात आहे. आणि हे जळजळीत वास्तव आहे. परिणामी ‘खोगीरभरती’ केलेले नमुने सहन करावे लागतात.

याचाच अर्थ राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातच आमदारकी, खासदारकी दिली गेली पाहिजे, हा पायंडा आणखी दृढ बनत चालला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मुलाला राजकीय वारस म्हणून पुढे आणणे, ही ताजी घटना घराणेशाहीच अधोरेखित करते.

बहुतांश बड्या राजकीय घराण्यांनी वा नेत्यांनी आपापल्या कुटुंबातील मुलगा, मुलगी, पुतण्या, भाचा, सूना, नातू यांनाच राजकीय वारस म्हणून पुढे आणलेले आहे.

या मतदारसंघात काॅंग्रेस पक्षाच्या विचारधारेची पताका खांद्यावर घेऊन केवळ स्वार्थासाठी सोयीस्करपणे बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीतचा विजय हा केवळ प्रस्थापित घराणेशाही व नात्यागोत्यांचा विजय आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

गेला महिनाभर आजारी असलेले काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात राजकीय आखाड्यात सक्रिय झाले असून ते देखील व्यक्त होत आहेत. थोरातांनी आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात थेट काॅंग्रेस हायकमांडला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अलिकडच्या काळात राज्यात पत्रलेखनाला सुगीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे त्याचाच हा परिणाम असल्याचे जाणवते.

थोरात तसेच सत्यजीत यांनी विशेषत: काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप करून तेच या सर्व गोंधळ नाट्याला जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. असे असले तरी तांबे पिता-पुत्राने काॅंग्रेस पक्षाविरोधात घेतलेली भूमिका ही एकदम रास्त होती, असे म्हणता येणार नाही. काॅंग्रेस पक्षात त्यांच्यावर कोणताही अन्याय कधी झाल्याचे दिसून आले नाही.
बाळासाहेब थोरात हे काॅंग्रेस पक्षाचे मोठे नेते असून त्यांना पक्षात वजन व मान आहे. आणि त्यांच्याच कृपेमुळे व
कै. भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्याईमुळे या पिता-पुत्राला खुप काही मिळालेले आहे.

त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थासाठीच तांबे पिता-पुत्र काँग्रेसची विचारधारा सोडून भाजपच्या वळचणीला गेल्याचे दिसते.

तसे नसते तर विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मोठ्या भावासमान असल्याचा साक्षात्कार सत्यजीतला झालाच नसता. तसेच आपले मामा बाळासाहेब थोरात व नाम. राधाकृष्ण विखे यांचे एकमेकांशी असलेले विळ्या भोपळ्याचे वैर सर्वश्रृत असताना देखील या निवडणूकीत विखेंची मतदानरूपी मदत घेतलीच गेली नसती.
सर्वकाही ठरवून केले गेलेले ‘नाट्य’ आहे. ‘मी नाही…. अन् कडी लावा…’ असाच हा प्रकार आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ हा तांबे कुटुंबाला आंदण म्हणून मिळालेली जहागीर आहे, असाच समज संबंधित कुटुंबियांनी करून घेतलेला दिसून येतो.

दरम्यान कुणी कितीही टिमक्या वाजू द्या, सत्यजीत तांबे यांच्या पाठीमागे त्यांचे मामा म्हणजेच बाळासाहेब थोरात यांची तगडी ताकद उभी होती, म्हणूनच सत्यजीतला विधानपरिषदेत निवडून जाण्याची संधी मिळाली. अन्यथा सत्यजीतला स्वत:च्या ताकदीवर वा भाजपच्या कुबड्यांवर निवडून येणे शक्यच नव्हते. 

सत्यजीत तांबेचा विजय भाजपमुळे झाला, असे नाम. राधाकृष्ण विखे व अन्य काही भाजप नेते म्हणत असले तरी त्याला काहीही एक अर्थ नाही.

सत्यजीत यांच्या विजयात अनेकांचे हातभार लागलेले आहेत. यांत प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार, सत्यजीतला मोठ्या भावासमान असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, थोरातांचे पक्के राजकीय विरोधक असलेले नाम. राधाकृष्ण विखे, पाचही जिल्ह्यातील काॅंग्रेससह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब थोरातांशी असलेल्या मित्रत्वाच्या अदृश्य किनारीचा देखील वाटा आहे.

तात्पर्य पाटलाचं पोरगं म्हणून सर्वच गावकऱ्यांनी सत्यजीतला ‘सांभाळून’ घेतलेले आहे. त्यामुळे मामा बाळासाहेब थोरात व एवढ्या साऱ्या एकत्रित महाशक्तींसह प्रचंड आर्थिक पाठबळ पाठीशी असल्यामुळेच सत्यजीतचा विजय सुकर झालेला आहे. त्यामुळे कुणी काहीही वल्गना केल्या, फुशारक्या मारल्या तरी त्यात काहीही तथ्य नाही.

दुसरीकडे नावापुरत्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या सौ. शुभांगी पाटील यांनी खऱ्या अर्थाने स्वत:च्या ताकदीवर, आघाडीतील शिवसेनेच्या काही मदतीवर तसेच काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर चाळीस हजार मते मिळविणे, ही नक्कीच सोपी गोष्ट नाही.

त्यामुळे शुभांगी पाटील यांना मिळालेली मते पाहता, महाशक्तींच्या जोरावर ‘सत्य’ कि ‘जीत’ अशा मखलाश्या मारणे चुकीचे आहे.

तसे पाहिले गेले तर अहमदनगर जिल्ह्यातील नात्यागोत्यांचे राजकारण भल्याभल्यांना कळत नाही. कदाचित नानांना याची जाणीव नसावी. या जिल्ह्यातील अनेक राजकीय घराण्यांची एकमेकांशी सोयरीक वा नातेसंबंध आहेत.

दरम्यान जिल्ह्यात थोरात कुटुंब वगळता एखाद दुसरे कुटुंब काॅंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीलेले आहेत. दुसरीकडे
जिल्ह्यातील इतर बहुतांश मोठ्या राजकीय घराण्यांचा इतिहास हा दलबदलूंचा राहिलेला आहे.

आपापल्या राजकीय गढ्या सुरक्षित ठेऊन, सर्व महत्वाची पदे, सत्तास्थाने आपल्याच कुटुंबात व सग्यासोयऱ्यांत कशी राहतील, या स्वार्थापोटीच वारंवार दलबदलूपणा करणे, हा संबंधितांचा धंदा बनून गेला आहे. बाकी यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे नाही.

सर्वात गंमतीचे म्हणजे नाम. राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यातून राजकीय विस्तव जात नाही, हे अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला माहिती आहे. आणि त्याच नाम. विखे यांना सत्यजीतला मतदान करण्याचे आदेश आपल्या समर्थकांना का द्यावेसे वाटले? याला नव्या समीकरणांची नांदी समजायची कि राजकीय हतबलता कि मांडवली म्हणायची?
दुसरीकडे विखे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांचेच ऐकू शकतात, म्हणून तांबे कुटुंबाने काॅंग्रेसशी फारकत घेऊन पडद्यामागून भाजपशी जुळवून घेतले तर नाही ना? या शंकेला वाव मिळतो. तांबेंनी काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतली असती तर विखेंनी त्यांना कधीच मदत केली नसती. हे ही तितकेच खरे.