मंदिर नामांतरामागे दडलीय भाजप प्रवेशाची बीजे

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा ता. आंबेगांवसह खेड, ही आंबेगांव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे यांनी जाणूनबुजून खेळलेली तिरकस चाल नक्कीच सहजसोपी नाही. या खेळीमागे त्यांच्या उद्याच्या भाजप प्रवेशाची बीजे रोवली गेलेली आहेत. 

सद्यस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील आपल्या स्थानाचे झालेले अवमूल्यन तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या बेचव विजयानुळे वळसे मोठ्या प्रमाणात सैरभैर झालेले आहेत. त्यांची अक्षरशः झोप उडालेली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या स्वत:च्या व आपल्या वारसदारांच्या राजकीय भविष्याची चिंता सतावत आहे. त्यातूनच त्यांनी मंदिर नामकरण वादाला मुद्दामहून फोडणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

खेड तालुकाविरोधी भूमिका घेऊन, तालुक्यातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून खेड तालुक्याची अस्मिता पळवू पाहणाऱ्यांना जाहीर सहमती देणाऱ्या आमदार बाबाजी काळेंच्या मदतीने आमदार दिलीप वळसे आंबेगांव तालुक्याचे नांव मंदिर नामांतरात घुसडवण्यात यशस्वी ठरले तर, कदाचित ती वळसेंच्या भाजप प्रवेशाची नांदी असेल

कारण अजित पवारांच्या झालेल्या दुदैवी व धक्कादायक निधनामुळे राष्ट्रवादी पक्षाकडे अजित पवारांसारखे राज्य स्तरावरील बहुआयामी नेतृत्व व चेहरा नाही. या पक्षाकडे जे जे नेते आहेत, अपवाद वगळता बहुतांश नेते हे आपापल्या गढ्या वा तालुके सांभाळण्यापुरतेच मर्यादित आहेत. जेष्ठ नेते शरदराव पवार व अजित पवार हीच त्यांची ओळख व क्षमता. अजित पवार गेल्यानंतर या पक्षातील नेत्यांच्या मर्यादा आणखीनच उघड्या पडलेल्या आहेत. अनेकांचा बाजार उठलेला आहे. अजित पवार म्हणजेच पक्ष होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच पोरगट पार्थ व जय पवार यांच्या हाताखाली काम करण्यास त्यांना कमीपणा वाटत आहे. 

सध्या पवार कुटुंबियांच्या पाठीशी मोठी सहानुभूती असल्यामुळे हि वरिष्ठ नेतेमंडळी पक्ष सोडण्याची हिंमत करणार नाहीत. परंतु २०२९ पूर्वी राष्ट्रवादी पक्ष फुटीला मोठ्या प्रमाणात सुरवात होणार आहे. बहुतेकांची पहिली पसंद ही भाजपच असणार आहे. ऐनवेळेस प्रवेश करण्यापेक्षा भाजपमधील आपली जागा पक्की करण्यासाठी अनेकजण आधीच भाजपात प्रवेश करतील.  

एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाला निवडून आणण्याची ताकद अजित पवारांमध्ये होती. परंतु आता तसे नाही. २०२९ च्या निवडणुकीत अजित पवारांशिवाय कसे निवडून यायचे, याच तणावात बहुसंख्य विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या चरणी कोलांटउडी मारण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर नाही. तसे पाहिले तर अनेकांनी भाजप प्रवेशाची आगाऊ नोंदणी करून ठेवलेली आहे. फक्त योग्य वेळेची वाट ते पाहत आहेत. २०२९ पूर्वी ‘प्रवेश बंद’ची पाटी लावण्याची वेळ भाजपवर न येवो.

दुसरीकडे देशातील एक मोठे राजकीय कुटुंब असलेले व अजित पवारांसारख्या एका कर्तबगार पित्याच्या पोटी जन्म घेऊनही त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच पार्थ व जय पवार यांना राजकीयदृष्ट्या ‘तयार’ होताच आले नाही. अजित पवार हयात असताना त्यांच्याकडे मोठा कालावधी उपलब्ध होता. परंतु आमदार आदित्य ठाकरे व आमदार रोहित पवारांसारखे त्यांना स्वत:ला सिद्ध करता आले नाही. दोघांनाही पाहिजे तेवढी राजकीय परिपक्वता, प्रगल्भता निर्माण करताच आली नाही. 

त्यामुळे पक्षातील वस्ताद असलेली जूनी खोडं या दोघांना सूधरूच देणार नाहीत. अनेकांना गमंत वा वाईट वाटेल पण अजित पवारांच्या पश्चात या पक्षाला फारसे राजकीय भवितव्य उरलेले नाही. २०२९ पर्यंतच या पक्षाची धुगधुगी असेल. फारफार तर २०३४ पर्यंत. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक झाले तरच काहीतरी भविष्य या पक्षाला असेल. अन्यथा नाही. असो. 

एकंदरीतच वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाची सत्ता जनता सहन करत नाही. आणि यातच वळसेंच्या झालेल्या नकोशा विजयाचे सार आहे. विजय हा किती निष्ठूर, किती क्रूर, किती लज्जास्पद, किती मानहानीकारक, किती वेदनादायी असू शकतो, असल्या विजयापेक्षा पराभव परवडला अशीच काहीशी भावना वळसे यांची झालेली असावी. 

आंबेगाव तालुक्यातील जनता खरोखर वळसेंना कंटाळलेली आहेत. तिसऱ्या पिढीला देखील तुम्ही जनतेवर लादलेले आहे. तर जनता ते कसे काय सहन करील? 

एकवेळ अजित पवारांनी शरदराव पवारांचा हात सोडला, हे लोकांनी सहन केले. कारण त्यांच्याकडे पक्ष पुढे न्यायचे कर्तृत्व व धमक होती. परंतु वळसेंनी उतारवयात शरदराव पवारांना स्वार्थापोटी सोडून पळ काढणे, हे लोकांना पटलेलेच नाही. काहीही कर्तृत्व नसताना केवळ शरदराव पवारांनी एवढ्या मोठ्या संधी दिल्या. शरदराव पवारांचा ‘लाडका दिलीप’ हीच वळसेंची राजकियदृष्ट्या जमेची बाजू. तरीसुद्धा वळसेंनी त्यांचा हात सोडून सत्तेच्या कळपात जाणे पसंद केले. आणि त्याचा मोठा फटका वळसेंना गेल्या विधानसभा निवडणूकीत बसला. आता त्यांची अवस्था ‘तेल ही गेले अन् तुप ही गेले’ अशीच झालेली आहे. 

२०२३ मध्ये बोलता बोलता दिलीप वळसे बोलून गेले की, ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. परंतू शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असतानाही फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. एकप्रकारे वळसेंनी शरदराव पवारांच्या राजकीय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याचे काम केले होते. शरदराव पवारांच्या क्षमतेवर बोलणारा कृतघ्न विरोधी पक्षात देखील सापडणार नाही. 

एका अर्थाने दिलीपने तृप्तीचे ढेकर देऊन अतृप्त होत माझ्यासाठी तुम्ही काय केले? असे म्हणून पांग फेडावे, अशीच काहीशी भावना वा तीव्र वेदना शरदराव पवारांना झाल्या असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

शरदराव पवारांनी डोक्यावर हात ठेवला नसता तर वळसेंना उभ्या हयातीत कधी आमदार, मंत्री सोडा, साधा ग्रामपंचायत सदस्य वा सोसायटीचा संचालक तरी होता आले असते का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

ज्या शरदराव पवारांमुळे आपल्याला एवढे सारे काही मिळाले, त्यांच्याबद्दलच असे जिव्हारी बोलायचे व नंतर माफी मागून शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, त्यांना मी कधीही अंतर देणार नाही आणि त्यांच्याबद्दल वाकडा शब्दही बोलणार नाही, असे म्हणून मखलाशी मारायची? याला काहीएक अर्थ नाही.

दरम्यान वस्तुस्थिती अशी आहे की, वळसेंच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. किंबहुना वळसे आंबेगांव तालुक्यापुरतेच मर्यादित आहेत, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. राज्याचे जाऊ द्या, पुणे जिल्ह्यात तरी वळसेंचा किती प्रभाव आहे? असे असते तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजी अढळराव यांच्याविरोधात नक्कीच उभे राहिले असते.

आता वळसेंमागे शरदराव पवारांची ताकद नाही की अजित पवारांची. या दोन्ही पक्षात त्यांना काहीही महत्व नाही. इतक्या वर्षे या दोघांनी वळसेंना “आपला” म्हणून कसेतरी सांभाळून घेतले. आता यांना कोण सांभाळून घेणार की यांचे लाड सहन करणार? आता वळसेंकडे पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. त्यातच त्यांचा राजकीय अस्त कमालीचा उंबरठ्याकडे झुकलेला आहे. त्यांच्यापुढे भाजप प्रवेश हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. कारण वळसे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनचे सुमधुर संबंध कधीच लपून राहिलेले नाहीत. 

विधानसभा अध्यक्ष असताना वळसे विरोधी नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या प्रकारे ‘मदत’ करत असत.
महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना फडणवीस यांनी सळो की पळो करून सोडले होते. बिचाऱ्या देशमुखांना नीट खाऊन दिले नाही की पिऊन. अखेर देशमुखांचे काय झाले ते सर्वांनीच पाहिलेले आहे. त्यातुलनेत फडणवीस यांनी दिलीप वळसेंविरोधात मवाळ भूमिका घेऊन त्यांना सांभाळूनच घेतले .

गमंत म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता खाली खेचण्याचे प्रयत्न होत असताना, तत्कालीन एकसंध शिवसेना पक्षात एवढी मोठी फूट होत असताना, शिवसेनेचे आमदार सूरतला पळून जात असताना, एक गृहमंत्री म्हणून दिलीप वळसेंना जराही भनक नसावी, हे न समजण्यासारखे पलिकडचे आहे

त्यातच २०२४ मध्ये महायुतीला प्रचंड मोठे यश मिळूनही स्व. अजित पवारांनी वळसेंना मंत्रीपदापासून दूरच ठेवले होते. वळसेंची मंत्रीपदाची नाराजी लपू शकलेली नाही. त्यामुळे भाजपात प्रवेश केला तर मंत्रीपदाची इच्छा तरी पूर्ण करता येईल, असेही वळसेंना वाटत असावे. 

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आली होती. त्यावेळी वळसेंना मंत्रीपदाची संधीच देण्यात आली नव्हती. कारण वळसेंना मंत्रीपद देण्यात स्व. अजित पवारांचा तीव्र विरोध होता. केवळ शरदराव पवारांचा ‘लाडका दिलीप’ हीच गुणवत्ता असलेल्या वळसेंना नेहमीच इतर आमदारांवर अन्याय करून दरवेळेस मंत्रिमंडळात स्थान का द्यायचे? याच मताचे अजित पवार होते. 

अखेर अजित पवारांपुढे डाळ शिजत नाही हे बघून अस्वस्थ झालेल्या वळसेंनी शरदराव पवारांना हरतऱ्हेने साकडे घालून विधानसभा अध्यक्षपद कसेतरी पदरात पाडून घेतले होते, याच्या चर्चा चविष्टपणे चर्चिल्या जात होत्या.

शरदराव पवारांशी असलेल्या संबंधांमुळेच दिलीप वळसेंना नेहमीच झुकते माप मिळून त्यांना मंत्रीपद देताना खेड तालुक्यावर एकप्रकारचा अन्याय करण्यात आलेला आहे. माजी आमदार स्व. नारायणराव पवार, तसेच माजी आमदार दिलीप मोहिते हे कामांच्या बाबतीत नक्कीच उजवे होते, प्रशासनावर त्यांची पकड होती. परंतु शरदराव पवारांच्या ‘लाडक्या दिलीप’साठी खेड तालुक्याला मंत्रीपदापासून कायमच दुर ठेवण्यात आले.

या महोदयांचा खेड तालुक्यावर विशेष राग. स्व नारायणराव पवार व दिलीप मोहिते यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींची कान भरून, कळी लावून त्यांना त्रास देण्याचेच काम आजवर केले गेलेले आहे