आ. बाबाजी काळे फोडाफोडीच्या वावटळीत घावणार?
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पक्षनिष्ठेला तिलांजली देऊन फुटणाऱ्यांचे पीक टोळधाडीसारखे वारेमाप स्वरूपात येणार आहे. एक दोन वर्षात विरोधी पक्षातून फुटून सत्ता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही सर्वोच्च पातळीवर असेल. एवढी की किळस हा शब्द देखील तोकडा पडेल, एवढी पक्षांतराची घाणेरडी व किळसवाणी स्थिती विशेषतः महाराष्ट्रात पहावयास मिळणार आहे. यातून एखाद्या लहानशा वाडीचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य देखील सुटणार नाहीत.
पक्षफोड्यांची जी वावटळ आहे, ती अल्पजीवी व क्षीण आहे. तिला भविष्य नाही. केवळ खून्नसीतून तयार झालेली व दूरस्थ नियंत्रणाद्वारे चालणारी ती एक कृत्रिम वावटळ आहे.
कुजायला, वाळायला लागलेला पालापाचोळा तसेच जीर्ण झालेल्या, झुकलेल्या, कमकुवत बुंध्यांच्या व वाळक्या तथा सुकलेल्या फांद्यांनाच वावटळ स्वतः बरोबर घेऊन जाते. परंतु भरभक्कम व चिवट फांद्या, महावृक्षाचे दणकट खोड कोणत्याच वावटळींना भीक घालत नाही. त्या आपल्या जागेवर रोवूनच राहतात.
याच पार्श्वभूमीवर विचार केला तर आगामी काळात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात नक्कीच राजकीय भूकंप होणार आहे. कुणी कितीही शपथा घेऊद्या, अगदी श्री क्षेत्र भीमाशंकर महाराजांचे, श्री माऊलींचे नाव घेऊन शपथा घेऊद्यात, टिळ्याची शपथ घेऊ द्यात, पण मतदारसंघाच्या विकासासाठी विरोधी पक्षात जास्त काळ राहणे, पक्षात घुसमट होतेय, पक्षनेतृत्व भेटत नाही, या साचेबद्ध कारणांसाठी खेड तालुक्यात फूट अटळ आहे.
सांगायचे तात्पर्य असे की, पक्षफोड्यांच्या टोळधाडीत राज्यातील जे जे आमदार फूटू शकतात, त्यात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार बाबाजी काळे हेही बळी पडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मूलत: बाबाजी काळे यांना भाजपमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. याचे कारण म्हणजे काहीही केले तरी सत्तेच्या सुरक्षाकवचाखाली लपता येते. तसेच माजी जिप सदस्य शरद बुट्टे व अतुल देशमुख या दोघांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे तालुका भाजपमध्ये त्यातुलनेत दखल घ्यावा असा कुणीच पदाधिकारी नाही. अलिकडच्या काळात खेड तालुका भाजपमध्ये जी काही गर्दी झाली होती, ती केवळ बुट्टे व देशमुख यांच्या कार्यकर्त्यांची होती. म्हणून बाबाजी काळे यांची पहिली पसंती भाजप असावी. परंतु त्यांना भाजपमध्ये प्रवेश न देता व्हाया विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांच्या माध्यमातून शिंदे गटात पाठवले जाऊ शकते.
दरम्यान शिंदे गटात प्रवेश करावा, तर तेथे अतुल देशमुख ठाण मांडून आहेत. अतुल देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली होती. या निवडणुकीत बाबाजी काळेंची जादू बिलकुल चालली नाही. तसेच एका म्यानात दोन तलवारी एकत्र राहणे अशक्य. त्यामुळे काय करू अन् काय नको, या कात्रीत काळे अडकलेले आहेत.
येत्या काळात आमदार काळे जरी पक्षांतर केले तरी त्याने तालुक्यात फारसा फरक पडेल, अशी स्थिती नाही. तालुका शिवसेनेत बाबाजी काळेंना पर्याय म्हणून चाकण परिसरातून नेतृत्व करत असलेले खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार व पश्चिम भागातील घोटवडी गांवचे माजी सरपंच, विकास रत्न म्हणून दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सुनिल धंद्रे पुढे येऊ शकतात. दोघांनाही तालुक्यातील विविध प्रश्नांची चांगली जाण व अभ्यास आहे. त्यांच्याकडे नेतृत्वगुण देखील आहेत. दोघांचाही दांडगा जनसंपर्क आहे. दोघांमध्ये तालुक्याचे नेतृत्व करण्याची क्षमता निश्चितच आहे.
एक विचार केला तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना व शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. २००४ मध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेतून राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यात शिवसेनेला खऱ्या अर्थाने मोठेच खिंडार पडले होते. त्यावेळी तालुक्यातील शिवसेना संपली, असेही बोलले गेले होते. मात्र तसे अजिबात काही झाले नाही.
त्यातच पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरदराव पवार, कै. अजित पवारांचा बालेकिल्ला. तरीदेखील खेड तालुक्यात शिवसेना पक्ष संपला तर नाही. उलट २०१४ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन वेळा आमदार निवडून आले, ते ही राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दारूण पराभव करून. त्यामुळे कुणाच्या जाण्याने कोणताच पक्ष कधी संपत नसतो की पक्षाची विचारधारा कधी संपत नसते. शिवसेना हा तर राज्यातील जनसामान्यांच्या मनांवर गारूड केलेला पक्ष, तळागाळात रूजलेला पक्ष.
थोडे मागे पाहिले तर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी राष्ट्रवादीच्या स्व. नारायणराव पवार यांना कडवी लढत दिली होती. मोहिते यांचा अवघ्या ३८०० मतांनी पराभव झाला होता. दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकविण्याची संधी मिळाली होती. परंतु सेनेचा म्हणजे स्वपक्षाचा आमदार निवडून आला तर मला प्रतिस्पर्धी निर्माण होईल म्हणून सेनेचेच तत्कालीन खासदार शिवाजी अढळराव यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक खांडेभराड यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार रामदास ठाकूर यांच्यामागे आपली ताकद लावली होती. परिणामी खांडेभराड व ठाकूर यांच्यात मोठी मतविभागणी होऊन राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते निवडून आले होते. त्यांच्यामागे
दुसरीकडे ज्या शिवसेनेने, ज्या शिवसैनिकांनी शिवाजी अढळरावांना तब्बल तीन वेळा लोकसभेवर निवडून दिले. सर्वकाही भरभरून दिले. परंतु त्यांनी कृतघ्नपणा दाखवून शिवसेनेचे पांग फेडले. त्यांच्या जाण्याने शिवसेनेला काहीच विशेष असा फरक पडला नाही. त्यांच्यासोबत जे जे गेले होते, ते सर्व आज कोणत्या कोपऱ्यात पडून आहेत, हे कळायला देखील मार्ग नाही. शिवसेना सोडून त्यांनी मोठीच चूक केलेली आहे. स्वतः अढळराव राजकारणात कोठे एवढे सक्रीय वाटतात? म्हाडाच्या चिकटपट्टीमुळे तरी त्यांची ओळख शिल्लक राहिलेली आहे. अन्यथा ते देखील कुठल्या अडगळीत पडले असते, हे शोधून काढणे अवघड होऊन बसले असते.
बाबाजी काळेंना तालुक्याने मोठी साथ देत विधानसभेवर पाठविले. काळेंच्या कार्यकाळात तालुक्याचे काही भले होईल, तालुक्यात शांतता नांदेल, विकासाचा महापूर येईल, कामांच्या बाबतीत मोहितेंच्या तुलनेत काळे सरस ठरतील, असे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मनोमन वाटले होते. परंतु जनतेचा मोठाच अपेक्षाभंग, भ्रमनिरास झाला. काळेंना संधीचा फायदाच घेता आलेला नाही. ते पूर्णतः अपयशीच ठरलेले आहेत. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान निधीचे भांडवल करून त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये.
स्वतःला वारकरी समजायचे व दुसऱ्यांना भुंकणारा कुत्रा संबोधून स्वतःचा उल्लेख हत्ती (मदमस्त) करायचा, हे एक वारकरी म्हणून अशोभनीय आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी काही टिका टिप्पणी केली वा काही उलटसुलट बोलले की बाबाजी काळे त्वेषाने मोहितेंवर तूटून पडतात व त्यांना प्रत्युत्तर देण्यात वेळ खर्ची करतात. बोलताना तर त्यांचा थरकाप उडतो. मुळातच जनतेची कामे करायची सोडून फालतू गोष्टींत अडकून पडायचेच कशाला?
आमदार होऊनही काळे जिप सदस्य असल्यासारखेच वागत आहेत. काही लोकांना आमदार झाल्यासारखं वाटतं. परंतु हे महाशय आमदार होऊनही त्यांना आमदार झाल्यागत वाटतच नाही. कामांच्या बाबतीत हे मोहितेंच्या तुलनेत एकदम कमजोर आहेत. तालुक्यातील चालू असलेल्या बहुतांश कामांचा विचार केला तर, जुन्याच तिकिटावर सर्व खेळ चालू आहे. काळे मूळचे स्वत: ठेकेदार असल्यामुळे त्यांचे सर्व लक्ष ठेकेदारीवरच केंद्रित आहे.
त्यांच्या नेतृत्वाखालील ठेकेदारांच्या संघटित टोळीला व स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांना विविध विभागांची अगदी लहान सहान कामे कशी मिळतील, यातच सर्व तालुक्याचे हित सामावलेले आहे. या टोळीचे नियंत्रण व नियोजन चासकमान भागातील निकृष्ट कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका ठेकेदाराकडे दिलेले आहे. की जो स्वतःला ‘सावली आमदार’ म्हणून तालुक्यात मिरवत असतो. आमदार काळे हे याच सावली आमदाराच्या ठेकेदारी व्यवसायात निष्क्रिय भागीदार तथा सुप्त भागीदार असल्याचे काही दुखावलेल्या ठेकेदारांमध्ये बोलले जाते. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील नांव जाहीर न करण्याच्या अटीवर या दोघांच्या सुप्त भागीदारीला दुजोरा दिलेला आहे.
उदाहरणच द्यायचे म्हणजे पश्चिम भागातील कुडे बु।। गावाच्या हद्दीतील बांगरवाडी-पाळेवस्ती या रस्त्याचे काम मिळविताना बाबाजी काळे यांच्या धनेश काळे या सख्ख्चा पुतण्याने उत्तर पुणे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून निविदा प्रक्रियेत घोळ करून, आर्थिक गैरव्यवहार करून शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान केले व स्वतःचा लाखो रूपयांचा फायदा करून घेतला.
मध्यंतरी या महोदयांनी एक पिल्लू सोडून दिलं की, कोणत्यातरी महाशक्तीचा हात आहे म्हणे माझ्या डोक्यावर? याचाच अर्थ महाशक्तीचा धाक दाखवून तुम्ही तालुक्यातील विरोधकांबरोबरच सर्वसामान्य जनतेला देखील चिरडून टाकणार की काय? आणि त्याच जोरावर तुमच्यात एवढी गुर्मी चढलेली आहे? स्वतःच्या जीवावर, मनगटावर जोर करायचा असतो. दुसऱ्यांच्या नव्हे. जनता हीच सर्वश्रेष्ठ महाशक्ती आहे. तिचा नादच करायचा नाही. जनतेच्या तडाख्यात कधी नष्ट व्हाल कळायचे देखील नाही.
सर्वार्थाने अमर्याद सत्ता व अमाप साधनसामग्री असणारे लोकं इतर पक्षातील स्वार्थी व स्वतःला एका पायावर विकायला तयार असलेल्या लोकांना खरेदी करण्यासाठी मोठमोठी आमिषे दाखवत आहेत. व हे असले लोकं या गोष्टींना झटकन बळी पडून पक्षाच्या तसेच जनतेच्या प्रती असलेल्या निष्ठेला मूठमाती देऊन आपली शारीरिक व सांपत्तिक भूक शमवून घेत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
याचे कारण म्हणजे अनैतिक व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली अफाट अशी संपत्ती सुरक्षित करण्यासाठी, नको ते असलेले अनैतिक धंदे, संशयास्पद व्यवहारांना संरक्षण व पाठबळ मिळावे, याच हेतूसाठी पक्षांतर्गत होत असते. मतदारसंघाच्या विकासासाठी, जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, भल्यासाठी पक्षांतर केले, असा जो साळसूदपणा दाखवला जातो, आव आणला जातो, तो शुद्ध बनावट व लबाड आहे. बाकी काही नाही.
सद्यस्थितीत भाजपमध्ये नेत्यांची एवढी भाऊगर्दी झालेली आहे, की त्यांना इतर पक्षातील मास लीडर नेत्यांचा अपवाद वगळता इतर घाऊकांची फारसी आवश्यकता नाही. भाजप आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीला सद्यस्थितीतील नेत्यांच्या बळावरच सामोरा जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष फोडला, तर तो पक्षफुटीचा डाग आपल्यावर उडू नये म्हणून भाजप हा सर्व घाऊक माल शिंदे गटात पाठवतो.