दिला इशारा जाता जाता
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आगामी कुंभमेळापूर्व कामांच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खेड व आंबेगाव तालुक्यांचे आमदार सर्वस्वी बाबाजी काळे व दिलीप वळसे यांच्यासोबत एकत्रित काढलेल्या फोटोची जोरदार चर्चा दोन्ही तालुक्यात होत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही आपल्या बाहुपाशात घेतल्यामुळे ही तर भविष्यातील राजकीय पेरणीची सुरवात तर नाही ना? असाही अर्थ काहीजण काढत आहेत. या फोटोतील मुख्यमंत्र्यांच्या प्रसन्न मूडचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान स्थानिक आदिवासी बांधव, तालुक्यातील जनता तसेच भक्त भाविकांची मुख्यमंत्र्यांना एकच मागणी आहे की, त्यांनी देवस्थानच्या अपारदर्शक कारभारात जातीने लक्ष घालून श्री क्षेत्र भीमाशंकर महाराजांना आमदार दिलीप वळसे, तोतया अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे व इतर बडव्यांच्या मगरमिठीतून तातडीने मुक्त करावे व पिंडीवरच्या विंचवांच्या नांग्या ठेचून काढाव्यात. या देवस्थानपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षानुवर्षे स्वत:च्या व स्वतःच्या कुटुंबियांच्या तुंबड्या भरून अक्षरशः कोट्यावधींची माया गोळा करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना गजाआड करावे.
तसेच या देवस्थानपासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या अर्ध्या हिश्श्यातून स्थानिक आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुखसुविधा, तसेच त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी खर्च करणे गरजेचे आहे. या देवस्थानवरील आदिवासी बांधवांचा कायदेशीर अधिकार मान्य करावा, अशीही आदिवासी बांधवांची मागणी आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानवर प्रशासकीय प्रमुख म्हणून मान. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करावी. तरच या देवस्थानचा कारभार सुधारून देवस्थानच्या व भाविकांच्या पैशांची लूट थांबेल.
दरम्यान या फोटोचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे क्वचितच हसणारे हसण्याचा प्रयत्न करत आहेत तर कायमच दात दाखवणारे आवंढा गिळून बसलेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा ता. आंबेगांवसह खेड या संयुक्त नामकरण विधीत आमदार काळे व आमदार वळसे यांनी दोन्ही तालुक्यात जाणूनबुजून निर्माण केलेल्या वादामुळे या आंबेगांवसह खेड नामांतराच्या विरोधात खेड तालुक्यात मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी या नामांतराच्या विषयावरून वळसे व काळे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
केवळ मोहितेंना विरोध म्हणून आमदार वळसेंच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या आमदार काळे यांनी खेड तालुक्याची अस्मिता व खेड तालुक्यातील जनतेशी एकप्रकारची गद्दारी केल्याची भावना तालुक्यात निर्माण झालेली आहे. म्हणूनच की काय मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी या दोघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असाच संदेश माजी आमदार दिलीप मोहिते यांना दिला असावा, अशीही चर्चा तालुक्यात आहे.
कदाचित मुख्यमंत्री मोहितेंना असेही सांगू इच्छित असावेत की, दिलीपराव, ये दोनों मेरे करण-अर्जुन है, ये दोनो मेरे राम और शाम है, ये दोनो मेरे लवकुश है, ही संताजी-धनाजीची जोडी आहे, या दोघांकडे वाकड्या नजरेने पहाल किंवा त्यांना काही त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर खबरदार, याद राखा, गाठ माझ्याशी आहे.
यांतील गमंतीचा भाग सोडला तर मुख्यमंत्र्यांनी जाता जाता या फोटोमधून खरा इशारा दिला आहे तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोघांना. वळसे हे जवळपास भाजपमध्ये तन मनाने गेलेलेच आहे. प्रश्न राहिला तो बाबाजी काळेंचा. काळे मूळ शिवसेनेला कधी व कशी कलटी मारतील, हे ते स्वतःला देखील सांगू शकणार नाहीत.
किंवा मुख्यमंत्र्यांना दिलीप मोहितेंना असेही सूचित करायचे असेल की, काळेपेंक्षा मला तुमच्यासारखा आक्रमक व प्रगल्भ नेता हवा आहे. याचे कारण म्हणजे दहा बारा वर्षात खेड तालुक्यात भाजपला पक्षाचा चेहरा निर्माण करण्यात आपयशच आलेले आहे. तालुक्यात मोहितेंमागे हक्काचे असे मोठे व एकनिष्ठ जनमत आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी खांद्यावर हात ठेवल्यामुळे वळसे व काळे भलतेच हर्षोउल्हासित झाल्याचे दिसून येते.
विशेषतः वळसेंच्या चेहऱ्यावरील हास्य, गालावरील खळीच सांगते की, ते खुप दिवसांनंतर असे मनमोकळे हसले असावेत. तरीही त्यांनी पूर्ण हास्य बाहेर येऊच दिलेले नाही. वळसे हास्य दाबूनच हसले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवरूपी विजय झाल्यानंतर वळसेंनी ‘मी लाजत लाजत फिरतोय’ अशी खंत बोलून दाखवली होती. परंतु आता ते लाजत लाजतच हसताना दिसतात. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशीच त्यांची अवस्था झालेली आहे. असो.
दुसरीकडे वळसे म्हणत असतील, देवाभाऊ, काळजी करू नका. आता मी तुमचाच झालो आहे. तसेही गेल्या काही वर्षांपासून मी पडद्यामागून तुमचाच हितसंबंधी राहिलो आहे. आता लवकरात लवकर मला आपल्या पदरात घ्या. पदर जरा थोडा मोठा करा. कारण बोनसमध्ये मी बाबाजीला देखील तुमच्या पक्षाच्या दावणीला बांधतो. अजिबात काळजी करू नका. हल्ली मला देखील ‘हर्षा’पेक्षा चांगली म्हणजेच हर्ष झाल्यागत निरव शांत झोप लागते.
वळसेंची देहबोलीच खुप काही सांगून जाते. वळसे खुप अगतिक व असहाय्य झालेले दिसत आहेत. राष्ट्रवादीमध्ये आता भविष्य नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव झालेली आहे. ते म्हणत असतील, देवाभाऊ, या पोरासोरांच्या हाती आमच्या पक्षाचे काही खरं तरी आहे का? त्यांना साधी पानपट्टी नीट चालवता येणार नाही. आणि ते पक्ष ताब्यात घेऊन चालवायला बसलेत. यांना राजकारणातील अ आ तरी माहीत आहे का? २०२९ नंतर हे दोघे ताईंनाच सक्तीची व्हिआरएस देतील व पक्षाचे सारथ्य दोघांपैकी कुणाच्या हातात ठेवायचे, यावरून आपापसांतच मारामाऱ्या करतील. तो ‘मुंढवा’फेम तर लईच द्वाड आहे. तो आताच आदेश देऊ लागलाय. ‘डिमांड’ करू लागलाय. नको त्यात लक्ष देऊ लागलाय. काय खरंय यांचे? हवं तर आमची मुलूखमैदानी तोफ येवलेकरांना विचारा.
गेल्या आठवड्यात या द्वाडाने माझ्या माणसाला टेंडर द्या म्हणून थेट येवलेकरांनाच दम भरला म्हणे. ही खबरबात तुमच्यापर्यंत आली असेलच म्हणा. येवलेकरांना दम द्यायची अपवाद वगळता उभ्या महाराष्ट्रात कुणात हिंमत तरी आहे का? त्यातुलनेत मी तर एकदम गरीब गाय. मला कोणी दम बीम दिला तर मला एकदम कापरं भरतं. अहो, शेजारच्या माझ्या नावकऱ्याने मोठ्या आवाजात मला जरी काही म्हंटले की मी लगेच हायकमांड तथा माझ्या वर्गशिक्षकांकडे त्याची तक्रार करायचो.
माझ्या वर्गशिक्षकांमुळे प्रत्येक वर्गात मला पहिल्याच बाकावर बसण्याचा योग आला. आता पुढील वाटचालीत मला फारशी काही अपेक्षा राहिलेली नाही. माझ्या आवडीचे तसेच आमच्या वाट्याचे ते अर्थखाते मला सारखे सारखे खुणावतेय. तेवढे एकदाचे मला तुमच्याकडील अर्थ खाते द्या. हवंतर लगेच मी तिकडे येतो.
माझा शेजारी असलेल्या माझ्या नावकऱ्याचे अन् माझे कधी पटलेच नाही. तसे पाहिले तर मी, माझा नावकरी व स्व. नारायणराव पवार आमच्यात काही वादच नव्हते. वर्गात पहिल्या नंबरने कोण पास होणार, यावरून तसा आमच्यात काही वाद असण्याचे कारणच नव्हते. फक्त पहिल्या बाकावर कोण बसणार? यावरूनच आमच्यात वाद होते. मी वर्गशिक्षकांचा लाडका विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमीच पहिल्या बाकावर बसण्याचा मान मिळायचा. तसे पाहिले तर वर्गशिक्षकांचा लाडका हिच माझी शिदोरी होती. आणि या दोघांबद्दल मी नेहमीच वर्गशिक्षकांना खोटे सांगून, त्यांचे कान भरवून या दोघांना शेवटच्या बाकावर दम देऊन बसवायला लावायचो.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पाठीवर हात ठेवल्यामुळे बाबाजी काळेंच्या अंगात भलतेच बळ आल्याचे दिसते. एखाद्या मारकुट्या वृषभ तथा बलीवर्दा सारखी त्यांची नजर दिसते. जेवढे गवत उपटायचे तेवढे उपटा, गवताचे कितीही भारे बांधा. आता यापुढे मी तर कुणालाच भीक घालणार नाही. आता माझ्या खांद्यावर साक्षात मुख्यमंत्र्याचा हात आहे, असाच इशारा वा आव्हानाची भाषा ते तालुक्यातील आपले विरोधक तसेच आपल्या पक्षीय नेतृत्वाला करत असावेत. जिथे तालुक्यातील जनता व तालुक्याच्या अस्मितेचा विचार मी कधी केला नाही तिथे पक्षनिष्ठा काय चीज आहे.
आता राजकारणाचा भाग थोडा बाजूला ठेवूया. ज्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, त्या देवस्थान व्यवस्थापनाच्या आर्थिक अनियमितेसंबंधी काही भानगडी आहेत. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले तर बरे होईल, अशी भावना खेड तालुक्यात व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संबंधी अनेक गोष्टी की ज्या बाहेर येत नाही. आल्या तर त्या दाबल्या जातात. याबाबत मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून गेल्या काही वर्षात भीमाशंकर मंदिर व्यवस्थापनात ज्या काही चुकीच्या गोष्टींचा, प्रवृत्तींचा हस्तक्षेप वाढलेला आहे. किंबहुना हे मंदिर म्हणजे आमचीच खाजगी मालमत्ता आहे, असे समजणाऱ्यांना चाप लावून त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
मुळातच भीमाशंकर ही वाडी आहे. वाडीचे गावठाण कसे झाले? तसेच या ठिकाणी असलेली बहुतांश बांधकामे ही बेकायदेशीरच आहे. डोंगर टेकड्या फोडून, झाडी तोडून बांधकामे करण्यात आलेली आहेत. अशा अवैध बांधकाम करणाऱ्यांचे पुनर्वसन का व कशा आधारावर करायचे? यातील बहुतांश लोकांची एकपेक्षा अधिक ठिकाणी स्वतःची घरे आहेत. त्यामुळे सारासार विचार करून मुळ भीमाशंकरवाडीतील रहिवासी असलेल्यांनाच तेथे राहण्याचा अधिकार दिला जावा. मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे घरे बांधून राहणाऱ्यांचा कशाही प्रकारे पुनर्वसनासाठी विचार करू नये.
मुळातच अभयारण्य क्षेत्रात पुनर्वसनच नको. अभयारण्याच्या संरक्षण व संवर्धनच्या दृष्टीने ते खचितच चांगले राहणार नाही.
तसेच मुख्यमंत्र्यांनी मंदिर लगतची जी तीस पस्तीस एकर जमीन आहे. ती जमीन मुळची कुणाची होती? तिचा मूळ दर्जा काय होता? ती कोणत्या प्रकारची जमीन होती? तिचे हस्तांतरण म्हणजेच त्या जमीनीची विक्री मूळ मालकाकडून कशा प्रकारे केली गेली? या व्यवहारात काही नियमबाह्यता वा अनियमितता झाली का? या व्यवहारात खेडच्या तत्कालीन महिला तहसीलदाराची काय भूमिका होती? म्हणजेच या जमीनीच्या शोध अहवालाची चांगल्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून घेतली गेली पाहिजे.
आमदार दिलीप वळसे हे देवस्थानचे २००४ ते २००९ पर्यंत अधिकृत अध्यक्ष असताना व २००९ ते २०१८ पर्यंत अनधिकृत अध्यक्ष असताना जी काही लहान मोठी कामे करण्यात आलेली त्या कामांबद्दल मान धर्मादाय आयुक्तांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस आणली होती.
देवस्थानची अनेक मोठी कामे ही निविदा न मागविताच करण्यात आलेली असल्याचे निरीक्षकांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. हा मनमानीचाच कारभार आहे. हे दिलीप वळसे यांना देवस्थानचे सर्वेसर्वा म्हणून माहिती नाही का? मुख्यत्वे करून तेच या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत. याचाच अर्थ या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात आल्याचे दिसून येते.
त्यानंतर २०१८ मध्ये दिलीप वळसे यांनी केवळ माजी खासदार शिवाजी अढळराव यांना अध्यक्षपद द्यायचे नाही म्हणून त्यांना डावलले व आपलेच पित्ते असलेले व धर्मादाय आयुक्तांनी दोषारोप पात्र ठपका ठेवलेल्या ॲड. सुरेश बन्सीलाल कौदरे, व मधुकर गवांदे यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध बसविले होते. वळसेंच्या या हेतूची देखील चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भक्त भाविक व तालुक्यातील जनतेची, स्थानिक ग्रामस्थांची एकच विनंती आहे की, वळसेंचा खासम् खास असलेला व देवस्थानचा तोतया अध्यक्ष म्हणून मिरविणाऱ्या, गेली अनेक वर्ष पिंडीवर ठाण मांडून बसलेल्या, धर्मादाय आयुक्तांनी २०१८ मध्येच निलंबित केलेल्या, देवस्थानवर स्वतःच्या कुटुंबाचा मालकी हक्क प्रस्थापित करणाऱ्या वादग्रस्त ॲड सुरेश कौदरे यांच्या सर्व कृष्णकृत्यांची, त्यांच्या काळातील सर्व कारभारांची चौकशी करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंदिर व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारचा भाग घेण्यास, हस्तक्षेप करण्यास बंदी घालावी. आपल्या राजकीय ओळखीचा वापर करून कौदरे गेली काही वर्ष स्वत:ला आजपर्यंत वाचवतच आलेला आहे.
विरोधात बोलणाऱ्या स्थानिकांना दमदाटी करणे, मारहाण करणे या गोष्टी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. याठिकाणी नियमबाह्य पद्धतीने ठेवलेल्या मंदिर व्यवस्थापनातील व बाहेरच्या सुरक्षारक्षकांकडून भाविक भक्तांना नेहमीच वाद घालून मारहाण केली जाते. हे मंदिराच्या सर्वेसर्वा असणाऱ्या दिलीप वळसेंना माहिती नाही का? या सर्व भानगडी, आर्थिक अनियमितता कोण पाठीशी घालते? हे सर्वांनाच माहिती आहे.