चौदा हज्जार कोट्टी रुपये म्हणजे किती रं~~~ दादां.
By अतुल दत्तात्रय काळे.
सोमा ऊर्फ सोअमाजी व गोमा ऊर्फ गोअमाजी हे दोघे अत्यंत जवळचे व जिवलग मित्र आहेत. तसे बघितले तर दिवसांतील अठरा तास ते दोघे सोबतच असतात. या दोघांचा तेवढ्याच जवळचा आणखी एक मित्र आहे. तो या दोघांपेक्षा वयाने किंचीत मोठा असल्यामुळे त्याला ते दादाच म्हणतात. या दादाचे आडनांव काअपसे आहे. थोडक्यात दादा काअपसे. त्यांच्या याच बंधुतुल्य नात्यांमुळे या त्रिकूटाला तमाम पंचक्रोशीत सोअमाजी गोअमाजी काअपसे याच एकत्रित टोपण नावाने ओळखले जाते. या तिघांचे शिक्षण तसे जेमतेमच. सोमा व गोमा यांच्या तुलनेत दादा थोडा जास्त शिकलेला. म्हणजे मुंबई येथे रात्र शाळेत शिकून तो दहावी झाला. व दहावी झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी दादाने थेट कोल्हापूरच गाठले. कारण मुंबईचे शैक्षणिक वातावरण त्याला काही मानवलेच नाही.
राजकारणाची अत्यंत आवड असल्यामुळे गावपुढारी म्हणूनही सोमा गोमा व दादा या तिघांकडे पाहिले जाते. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा जबरदस्त फिवर आहे. त्यामुळे त्यांच्या अगाध राजकीय ज्ञानाच्या काथ्याकूट चर्चेने वाडीतील पारावरचा दगड अक्षरशः झिजू लागलेला आहे. त्यातच तिघेही शिरुर लोकसभा मतदारसंघातच राहत असल्यामुळे साहजिकच त्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी याच मतदारसंघातील झालेल्या, न झालेल्या व भविष्यात होईल की नाही? ही शाश्वती नसलेल्या अशा विविध विकासकामांचे विषय असतात. त्यातल्या त्यात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आहे. रस्ते चांगल्या पद्धतीने निर्माण केले तर वाडी, गाव किंवा शहरांचा मोठा विकास होऊ शकतो. यावर या तिघांकडून भर दिला जात आहे. कारण त्यांच्या वाडीकडे जाण्यासाठी चांगला रस्ताच अस्तित्वात नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याने जाणे खुप त्रासदायक असते. त्यामुळेच रस्ता हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
दरम्यान चार दिवसांपूर्वी दादा भोसरीला आपल्या नातवाकडे गेले होते. त्यामुळे दादा वाडीत नसल्यामुळे राजकीय चर्चांना निरसपणा आला होता. दादा कधी गावी येतात, याकडे त्यांच्या घरच्यांपेक्षा सोमा व गोमाचेच अधिक लक्ष लागून राहिले होते. अखेर एकदाचे दादा घरी म्हणजेच वाडीत आले. आणि सोमा व गोमाचा जीव एकदम भांड्यात पडला. पुढच्या दिवशी सकाळी सकाळीच पारावरच्या राजकीय चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्या. दादा नुकताच शहरात राहून आल्यामुळे त्याचे दोन शब्द ऐकण्यासाठी सोमागोमासह वाडीतील सर्व वयस्कर पुरुष व तरुण मुले पारावर व पाराभोवती दाटीवाटीने बसली होती.
दादा पण असा भारी गडी की, त्याने पण सुरवातीलाच रस्त्यांच्या विषयाला हात घातला. दादा म्हणाले, गेल्या फक्त पाच वर्षांच्या कमी कालावधीत आपल्या मतदारसंघात रस्त्यांची तब्बल चौदा हजार कोटी रुपयांची कामे सुरु झालेली आहेत. दरम्यान फक्त रस्त्यांच्याच कामांसाठी चौदा हजार कोटी रुपयांचा आकडा ऐकताच सोमागोमासह काही ग्रामस्थ अक्षरशः म्हणजे अक्षरशः वर हवेत उंच फेकली गेली. चारदोन तर थेट खरपुड व वांद्रयाच्या पवनचक्क्यांवर जाऊन अडकली. सत्तरी पार केलेले तर भोवळ येऊन आडवे झाले. हे सर्व वातावरण बघून दादापण भांबावला. क्षणभर त्यालापण कळेना की नेमके काय झाले आहे. कारण दादा सोडून उपस्थित सर्वांना जबरदस्त हादरा बसला होता. एकंदरीत काही वेळानंतर सर्व परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर दादाच्या लक्षात वरील सर्व प्रकार आला.
त्यानंतर सोमागोमासह उपस्थित सर्वांनीच एकसुरात व दबक्या आवाजात कापरं भरल्यागत दादाला सवाल केला. चौदा हज्जार कोट्टी रुपये म्हणजे किती रं~~ दादा..? दादाने शांतपणे सर्वांना सांगितले की, हा आकडा मी माझ्या मनाने नाही सांगितला आहे. एक कोटीवर नेमके किती शुन्य असतात, हेच मला माहित नाही. तर चौदा हजार कोटींवर नेमके किती शुन्य असतात, हे समजायला मला अजून चारदोन तरी जन्म घ्यावे लागतील. पेपरमध्ये मी रस्त्यांची चौदा हजार कोटींची विकासकामे सुरु असल्याची बातमी वाचली आहे. बातमी वाचल्यानंतर माझी परिस्थिती देखील तुमच्यासारखीच झाली होती. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. या चौदा हजार कोटी रुपयांच्या कामांमध्ये आपल्या वाडीकडे येणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे की नाही? हे पाहण्यासाठी म्हणून मुद्दामहून मी तो पेपर सोबत घेऊन आलो आहे.
सोमा पेपरमधील कामे वाचू लागला. तळेगांव-चाकण-न्हावरा…. २२०० कोटी, खेड सिन्नर…. १३४८ कोटी, नाशिक फाटा ते खेड…. १०१३ कोटी, चाकण-चौफुला-न्हावरा…. २००० कोटी, अष्टविनायक महामार्ग…. ६३५ कोटी, बनकर फाटा-भीमाशंकर-जुन्नर- वाडा खेड.. ७०० कोटी, तसेच इतर अनेक रस्त्यांसाठी वेगळा निधी. की ज्याचा आकडा पेपरमध्ये देण्यात आलेला नाही. प्रामुख्याने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग… ७५०० कोटी, मंजूर.. १०० कोटी.. जर रस्त्यांसाठी एवढा निधी आणला असेल तर, तेही पाच वर्षांत.. तर रस्ते सोडून बाकी काही कामे केली की नाही? तेवढ्याच एक तरूण हिंमत करुन मध्येच उठून उभा राहिला व दादाला म्हणाला, दादा गमंतजमंत म्हणून अनवधानाने तुम्ही दुसऱ्या देशातील बातमी तर वाचवून दाखवत नाही ना? यामुळे गंभीर वातावरण एकदम हलके झाले. यापैकी खेड सिन्नर या रस्त्याचे नाशिक हद्दीतील काम कधीच पूर्ण झालेले आहे. आपल्या पुणे हद्दीतील बाह्य़वळण रस्त्यांचे कामे अद्याप पूर्ण आहेत. बाकी इतर एकही काम सुरू झालेले नाही. हा सर्व जुमलेबाजीचा खेळ आहे.
दरम्यान गोमाला आकडयांमध्ये काहीतरी घोळ वाटल्यामुळे त्याने मोबाईलवर आकडेमोड करुन पाहिली, तर पुन्हा त्याला धक्का बसला. कारण चौदा हजार कोटी नव्हे तर साडेपंधरा हजार कोटी रुपयांचे आकडे असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याचाच अर्थ तब्बल दिड हजार कोटींची विकासकामे दडवून ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे दादांनी आणलेल्या पेपरमध्ये चौदा हजार नव्हे तर साडेपंधरा हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे शिरुर लोकसभा मतदारसंघात मंजूर असल्याचे दुरुस्तीनंतर सर्वानुमते जाहीर करण्यात आले. हाच धागा पकडून गोमाने एक महत्वाचा मुद्दा मांडला. गोमा म्हणाला, दादा विमानतळ झाला असता तर अजून दहा एक हजार कोटींची गुंतवणूक आपल्या तालुक्यात नक्कीच आली असती नाही का?
दरम्यान हिंमत करून तरुणांनी कुहुतुलापोटी दादांच्या म्हणजेच काअपसे दादांच्या खऱ्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सोमा व गोमा यांनीही तरुणांच्या मागणीला अनुमोदन देऊन काअपसे दादांचे नेमके किती शिक्षण झालेले आहे? हे सांगण्याची विनंती केली. कारण काअपसे दादांनी वेगवेगळ्या पदव्यां जाहीर केलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी तसेच इतरत्र सार्वजनिकरीत्या दादांच्या शिक्षणाबाबत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी दादांचे म्हणजेच काअपसे दादांचे शिक्षण Post Graduate, P. D, Intermediate (Arts), Inter/Higher Secondary, आणि B.A. असे पाच वेगवेगळ्या प्रकारचे जाहीर केलेले आहे. हे ऐकून सोमागोमासह इतर उपस्थित ग्रामस्थ अवाक् होऊन दादांकडे म्हणजेच काअपसे दादांकडे डोक्यात मुंग्यां गेल्यागत पाहतच राहिले. काय बोलावे कुणालाच काही कळेना. इतरांचे जाऊ द्या हो. सोमा व गोमा हे तर काअपसे दादांचे खास जिगरी दोस्त. परंतु त्यांनाही दादांनी तब्बल पंधरा वर्षे अंधारातच ठेवले.
दरम्यान खरा धक्का तर पुढेच आहे. या सर्व घटनेनंतर दादांनी असा काही गौप्यस्फोट केला की, त्यांनी म्हणजेच दादांनी थापालाॅजीमध्ये चक्क डॉक्टरेट मिळवलेली आहे. दुसरीकडे दादा थापालाॅजीमध्ये डॉक्टरेट आहेत, याची कुणालाच कल्पना नव्हती. की दादांनी देखील कुणालाच कधी सांगितले नव्हते. बाकीच्यांचे जाऊद्या हो. परंतु जिगरी दोस्त सोमा व गोमा यांना देखील दादाने थांगपत्ता लागून दिला नव्हता. अशी पदवी मिळविणे कुण्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. कारण या पदवीचा कालावधी तब्बल पंधरा वर्षांचा आहे. पहिल्या दहा वर्षांत फक्त खोटे आणि खोटेच बोलायचे. पुढच्या पाच वर्षांत फक्त थापाच मारायच्या. त्यानंतर कुठे पंधरा वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर थापालाॅजीमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळते.