शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची चाकण सभा फ्लाॅप.. शिवसेनेत अस्वस्थता.

chakan sabha

By अतुल दत्तात्रय काळे.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नुकतीच चाकण येथे शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु सभेला अपेक्षित अशी गर्दी न जमल्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा पूर्णतः फ्लॉप झाली. समोरची गर्दी पाहून भाषणाच्या सुरवातीलाच ठाकरे यांनी पुढील सभेसाठी पिंपरी चिंचवड येथे जायचे आहे, असे सांगून वाहतूककोंडीचा फटका बसण्याची भिती व्यक्त केली. याचाच अर्थ राजगुरुनगर ते मोशी दरम्यान सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीची दहशत खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली, हे बरेच झाले.
या सभेच्या माध्यमातून सभेला गर्दी जमविण्यात आलेले अपयश, गेल्या अनेक वर्षांंपासून न सुटलेली वाहतूककोंडी, यातून उद्धव ठाकरे यांनी नाराजीच व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तसेच मार्केट यार्ड येथील सभेच्या बदललेल्या ठिकाणाचीही ठाकरे यांनी दखल घेतली.

तसे पाहिले तर ठाकरे कुटुंबिय व चाकण येथील मार्केट यार्डच्या पटांगणातत होणारी ठाकरे यांच्या टोलेजंग सभा, यांचे विशिष्ट असे नाते आहे. हे नाते २००४, २००९ व २०१४ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची याच मार्केट यार्डच्या पटांगणात विशाल सभा झाली होती. यावेळी जमलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे मार्केट यार्डचे आवार अक्षरशः ओसंडून वाहत होते. हजारो लोकांना बसायला जागाच नव्हती. जागा मिळेल तिथे लोकं दाटीवाटीने उभी होती. आणि हीच सभा आढळराव यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली होती. त्यानंतर २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आढळराव यांच्यासाठी घेतलेल्या सभांना देखील अभूतपूर्व गर्दी जमली होती. तसेच २०१४ च्याच विधानसभा निवडणुकीच्यावेळी आमदार सुरेश गोरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेला देखील प्रचंड गर्दी जमली होती. मार्केट यार्डच्या पटांगणात पार पडलेल्या शिवसेनेच्या चारही सभा रेकॉर्डब्रेक झाल्या होत्या. चारही वेळा शिवसेनेने विजय प्राप्त केला होता. सत्ता नसतानाही शिवसेनेच्या सभा कमालीच्या यशस्वी ठरल्या होत्या. मार्केट यार्ड शिवसेनेसाठी चांगलेच लकी ठरले होते. परंतू सत्ता आल्यानंतर नेमकी उलटी परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

यावेळी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेला पारंपरिक असे मार्केट यार्डचे पटांगण उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या एका दुसर्‍या जागेत शिवसेनेला ठाकरे यांची सभा घ्यावी लागली. पूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या सभांना जो प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, तो यावेळी बिलकुल मिळाला नाही. गर्दी जमविण्यात खासदार शिवाजीराव आढळराव यांना अपयशच आलेले आहे. हे आढळराव यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. एक मात्र नक्की की, या फ्लॉप सभेमुळे आढळराव व शिवसेनेची झोप उडालेली आहे. मुळातच ही परिस्थिती का निर्माण झाली? एकेकाळी प्रचंड प्रेम करणारी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता का दूर गेली? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. परंतु आता आत्मपरीक्षण करण्यास तेवढा वेळही आढळराव यांच्याकडे शिल्लक नाही. सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. हा घटक एखाद्याला प्रेमापोटी डोक्यावर घेऊन बेधुंद नाचेल. परंतु त्याला ठकविण्याचा प्रयत्न केला तर, तो त्याला डोक्यावरुन थेट खाली आपटायला देखील कमी करणार नाही.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना प्रामुख्याने बैलगाडा शर्यतीलाच हात घातला. बैलगाडा शर्यती संबंधित सर्व नाराज घटकांचा अंदाज ठाकरे यांना देखील आलेला आहे. त्यामुळेच ठाकरे यांनी या घटकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या पाच वर्षात राज्यात व केंद्रात भाजप शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे पाच वर्षांत बैलगाडा शर्यतबंदीचा मुद्दा सोडवण्यात का अपयश आले? असा सवाल उपस्थित होत आहे.

दुसरीकडे आढळराव यांना मतदारसंघातील जनतेने तब्बल पंधरा वर्षे संधी दिली होती. परंतु या सुसंधीचा त्यांना कामांच्या माध्यमातून प्रभाव पाडता आला नाही. ते वेगळ्याच रुबाबात, आविर्भावात वागत राहिले. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात तब्बल नऊ धरणे आहेत. तरीदेखील याच तिन्ही तालुक्यांतील जनता विशेषतः आदिवासी बांधव हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. मोठया कृषीक्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. चाकण परिसरात मोठी औद्योगिक वसाहत निर्माण होऊनही मतदारसंघातील कुशल, अकुशल तरुणांना नोकऱ्या मिळू शकलेल्या नाहीत. आदिवासी भागातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. रस्त्यांची चाळण झालेली आहे. आरोग्य सेवेची हेळसांड झालेली आहे. तरीदेखील आढळराव डोंगराएवढया विकासाच्या गप्पा मारण्यात आत्ममग्न झालेले आहेत. पूर्वी सत्ताधाऱ्यांना दोष देत अपयशाचे सर्व खापर त्यांच्यावरच फोडले. आता सत्तेत असूनही काही करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ बाकी काय? स्वतःची निष्क्रियता लपविण्याचाच हा प्रकार आहे.

बाकी जाऊ द्या हो, गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत शिवसेना पक्ष वाढीसाठी आढळराव यांनी नेमके काय प्रयत्न केले? किती गावांमध्ये शिवसेना शाखा उघडल्या व शाखा बांधल्या? किती सर्वसामान्य गरीब शिवसैनिकांना मोठे केले? मूळच्या किती शिवसेना पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला? २००९ च्या  विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेल्या अशोक खांडेभराड यांच्या विरोधात सेनेतीलच कुणी कुणी काम केले? मागे वळून पाहताना यागोष्टी देखील विचारात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

आत्मविश्वास नडणार? आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर विशेषतः २००४ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तर त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. २००४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा मौनी खासदार म्हणून उल्लेख केला. त्यानंतर ज्यांना विधानसभा व विधानपरिषद यामधील फरक कळत नाही, अशा अशिक्षित विलास लांडे यांना खासदार म्हणून निवडून देणार का? असा प्रचार केला. मला घाबरून शरद पवार माढयाला पळून गेले, अशी दर्पोक्ती वजा डरकाळी फोडली. देवदत्त निकम यांना वाघापुढे बांधलेली शेळी व वासरु असे हिणवले. दिलीपराव वळसे यांचा कंदिलमंत्री म्हणून सातत्याने उल्लेख केला. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर माझ्या विरोधात उभा राहण्यासाठी राष्ट्रवादीत इतरांचे तर सोडा. अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील कुणीही उभे राहून दाखवावे, असे थेट आव्हानच दिले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते.


२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी चाकण मार्केट यार्ड येथे उपस्थित प्रचंड जनसमुदाय