खासदार आढळराव यांची जनतेच्या डोळ्यात धूळफेक..
By अतुल दत्तात्रय काळे..
महिन्याभरात खेड घाटातील एका मार्गिकेचे काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला केला जाईल. की ज्यामुळे राजगुरुनगर शहर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असे राणा भीमदेवी थाटात ठोस आश्वासन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी खेड तालुक्यातील जनतेला दिले होते. परंतु एक महिना पूर्ण झाला. मात्र खेड घाटातील एकाही मार्गिकेचे काम काही पूर्ण होऊ शकलेले नाही की राजगुरुनगर शहर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. खासदार आढळराव यांचे आश्वासन तकलादू होते व नेहमीप्रमाणे ते हवेतच विरले.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केवळ वेळ मारुन नेण्यापुरते आढळराव यांचे आश्वासन होते, हे बाकी सिद्ध झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच तीन चार वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या कामाचे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पुन्हा भूमिपूजन करणे, हे हास्यास्पद असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
गेल्या मार्च महिन्यात दहा तारखेला खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या वतीने खेड घाट व बाह्य़वळण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी ‘महिन्याभरात खेड घाटातील एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्याचे’ आढळराव यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच त्याच दिवशी काम सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शुभारंभाच्या दिवशी कामच सुरू झाले नाही. या कामासाठी ज्या दिवशीचा मुहूर्त निवडण्यात आला होता, नेमकी त्याच दिवशी लोकसभेची आचारसंहिता लागू झाली. दरम्यान आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते, याची जाणीव देशातील अगदी सर्वसामान्य नागरिकांना देखील होती. आढळराव यांना या गोष्टींची कल्पना नसेल, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आढळराव यांनी मोठ्या चलाखीने व हुशारीने खेड घाटात पूर्वीच शुभारंभ होऊन अर्धवट पडलेल्या कामाचा फेर शुभारंभ घाईघाईत उरकून घेतल्याची चर्चा आहे. कामच सुरू करायचे होते तर इतक्या दिवस का गप्प बसले? ऐन निवडणूका जाहीर होण्याचा दिवस का बघितला? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
शुभारंभाच्यावेळी संबंधित काम तातडीने सुरू करुन एका बाजूची मार्गिका महिन्यात सुरु केली जाईल, असे आढळराव यांनी जाहीर केले होते. मात्र एक महिना पूर्ण होऊनही वाहतूकीसाठी मार्गिका काही सुरू होऊ शकली नाही. एकुण अपेक्षित कामाच्या एक टक्काही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे दहा दिवसांपूर्वी एक पोकलेन मशीन व चार डंपर कामाच्या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. सुरवातीला सदर ठिकाणी असलेली डबर भरावासाठी वापरण्यात येत होती. परंतु तीन चार दिवसांपासून काम बंदच आहे. पोकलेन मशीन व डंपर एकाच जागी उभे करण्यात आलेले आहेत. हे सर्व गौडबंगाल आहे. केवळ लोकसभेचे मतदान पार पडेपर्यंत घाटातील रस्त्याचे काम सुरू ठेवायचे, हे दर्शविण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे. दरम्यान मतांच्या जोगव्यासाठी महिन्याभरात एका बाजूची मार्गिका वाहतूकीसाठी खुली केली जाईल, अशी शुध्द लोणकढी थाप मारुन आढळराव यांनी तालुक्यातील जनतेची फसवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान तेथे संबंधित काम करणाऱ्या लोकांना विचारले असता त्यांनी आठ दहा दिवसांपासून भरावाचे काम सुरू केले आहे असे सांगून पोकलेन मशीन व डंपर तातडीने तेथून काढून पलीकडच्या बाजूकडे घेऊन गेले. व झनझन स्थळाच्या वरच्या बाजूला उभे करून ठेवले.

