बैलगाडा शर्यतबंदीचा खासदार आढळराव यांना मोठा फटका बसणार..
By अतुल दत्तात्रय काळे.
ग्रामीण जीवनात विशेष स्थान असलेल्या विविध गावांतील स्थानिक ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रांचा उत्सव सध्या सुरु आहे. परंतु मान. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्यामुळे यात्रांदरम्यान बैलगाडा घाटात हमखास ऐकू येणाऱ्या भिर्रर्र…. झाली…. सेकंद अकरा…… बारीचे नाव…. या कर्णभेदी आरोळ्या कानावर पडतच नाहीत. बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये, बैलगाडा शौकीन तसेच बैलगाडा मालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा सर्व घटक हिरमुसलेला आहे. भविष्यात शर्यती सुरु होतील की नाही याविषयी हा घटक साशंक आहे. बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे गावोगावच्या यात्रा ओस पडलेल्या आहेत. यात्रांकाळात दिसणारे भारलेले वातावरणच गायब झाले आहे. सर्वत्र शांतता आहे.
दरम्यान बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून स्वत:ची राजकीय पोळी भाजणारे तसेच एकमेकांवर चिखलफेक करणारे सर्वच राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी सत्ता असूनही बैलगाडा शर्यती सुरु करु शकलेले नाहीत. या प्रश्नावर सर्वचजण मूग गिळून गप्प बसलेले आहेत. विशेषत: या प्रश्नावरून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या इतका राजकीय फायदा कोणत्याच लोकप्रतिनिधीला घेता आलेला नाही. गावोगावीचे बैलगाडा घाट व खासदार आढळराव यांचे समीकरण निर्माण झाले होते.
२००४, २००९ व २०१४ या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये आढळराव यांच्या विजयात बैलगाडा शर्यती संबधित असलेल्या सर्व घटकांचा प्रमुख वाटा राहिलेला आहे. आढळराव यांनी या नाजूक प्रश्नांवरून मोठे राजकारण करुन शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविली होती. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आढळराव यांनी केंद्रात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यास एक महिन्यात बैलगाडा शर्यती सुरु केल्या जातील. वेळप्रसंगी अध्यादेश काढून शर्यती सुरु केल्या जातील, असा शब्द शेतकरी, बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांना दिला होता. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आढळराव यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
दरम्यान सत्तापरिवर्तन होऊन देशात पाशवी बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजप-शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात आले. परंतु पाच वर्ष पुर्ण होऊन २०१९ ची लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरु आहे. तरीदेखील आढळराव यांना गेल्या पाच वर्षात बैलगाडा शर्यती सुरु करता आलेल्या नाहीत. या प्रश्नावरुन आढळराव यांनी केवळ स्वार्थाचेच राजकारण करुन फसवणूक केल्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. या शेतकऱ्यांचा आढळराव यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. तो त्यांच्यापासून कोसो मैल दूर गेलेला आहे. आढळराव यांच्यासाठी हा नक्कीच धोक्याचा इशारा आहे. बैलगाडा संघटनेचे काही ठराविक पदाधिकारी सोडले तर आढळराव यांच्यावर बहुतांश सर्वसामान्य बैलगाडा मालक व शौकीन नाराज आहेत. केंद्रात व राज्यात भाजप-सेनेची सत्ता असूनही आढळराव बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी उठवू शकलेले नाहीत. केवळ थापा मारण्याचेच काम आढळराव यांनी केल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरम्यान एरवी गावाकडे फारसा न फिरकणारा गावकरी कामानिमित्त परगावी कुठेही असला तरी यात्रेसाठी हमखास स्वतःच्या गावी जातो व गावकऱ्यांमध्ये रमतो. एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. या यात्रांमध्ये पारंपारिकपणे बैलगाडा शर्यती आयोजिक केल्या जातात. विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यात घाटातल्या बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. किंबहुना बैलगाडा शर्यती ह्याच यात्रांचे खरे आकर्षण ठरलेल्या आहेत. या शर्यतींमुळेच यात्रेला खऱ्या अर्थाने गर्दी जमून शोभा येते व यात्रेत एक वेगळ्याच प्रकारचा जोश निर्माण होतो. पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूचे शेतकरी, हवसे नवसे बैलगाडा शौकीन कुठल्याही आमंत्रणाची वाट न बघता बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आवर्जून घाटात हजेरी लावतात.
परंतु शर्यती दरम्यान बैलांना मारहाण केली जाते, त्यांचा छळ होतो, या संदर्भात काही प्राणीमात्र संघटनांनी मान. उच्च न्यायालय व मान. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे मान. न्यायालयाच्या आदेशाने बैलगाडा शर्यती बंद आहेत.तसे पाहिले तर शेतीप्रधान संस्कृतीमध्ये बैलांना मानाचे असे स्थान आहे. शेतकरी त्याची मनोभावे पूजा करतात. बैल हा शेतकऱ्याच्या घरातीलच एक सदस्य असतो. शर्यतीच्या बैलांचा तर संबंधित शेतकरी अगदी लहान मुलांसारखा सांभाळ करतात. त्याची निगा राखतात. ऊन,पाऊस यापासून त्याचे संरक्षण करतात. कुस्तीची मैदाने गाजवणाऱ्या पैलवानांना जसा खुराक दिला जातो, तसा गुळ, शेंगदाणे अगदी खारीक, बदाम, काजू यासारखा हेवा वाटणारा खुराक या शर्यतींच्या बैलांना दिला जातो. तसेच बाटलीने बैलांना दुध दिले जाते. त्यामुळे शर्यतीविना यात्रा हि कल्पनाच शेतकऱ्यांना सहन होत नाही. एवढे घट्ट नाते यात्रा व शर्यती यांचे झालेले आहे. काही बैलगाडा मालक तर शर्यतींच्या बैलांचे वाढदिवस साजरे करतात. बैल मृत झाल्यानंतर त्याचे दशक्रिया विधी घालून दरवर्षी वर्षश्राद्धहि घालतात. एवढे प्रेम शेतकरी या बैलांवर करतात.यात्रेच्या काळात लहान मुलांच्या खेळण्याची व विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने, हॉटेल्स इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. हे सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील छोटे छोटे व्यापारी आहेत. बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे या सर्वांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. अनेकांचा रोजगार बुडालेला आहे. त्यामुळे या शर्यती लवकर सुरु करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे.