खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदार दहशतीच्या छायेत?
द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मतांसाठी काही उमेदवारांकडून त्यांचे बगलबच्चे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गावगणंग व सराईत गुन्हेगारांना हाताशी धरुन मतदारांवर दहशत निर्माण करुन त्यांना धमकावले जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. तसेच विरोधी उमेदवारांसाठी काम करणाऱ्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील दमबाजी केली जात असल्याचेही समजते. या लोकांविरुद्ध उघडपणे व जाहीरपणे तोंड उघडण्याची हिम्मत होत नसल्यामुळे मतदार दहशतीच्या छायेत आहेत.
त्यामुळे निवडणूक निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक व पोलिस प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशाही काही लोकप्रतिनिधींचा व बड्या धेंडांचा थेट हस्तक्षेप या तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक कधी नव्हे एवढ्या धोकादायक वळणावर गेली आहे.
दर विधानसभा निवडणुकीत याच पश्चिम भागातील मतदानावर तालुक्याचा आमदार ठरत असतो. हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. काही उमेदवारांनी हि निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळेच या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघा काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
तसे पाहिले तर खेड तालुक्याचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग पडतात. तुलनेने पश्चिम भाग हा दुर्गम, डोंगराळ व आदिवासीबहुल आहे. पश्चिम भागातील एकुण आदिवासी गावांची संख्या हि २७ इतकी आहे. हा समाज अत्यंत गरीब व कष्टकरी असून अद्यापही बहुसंख्य आदिवासी बांधव प्रार्थमिक सुख-सुविधांपासून वंचितच आहे. त्यांच्यापर्यंत काही पोहचतच नाही. दरम्यान कोणतीही निवडणूक असो, या समाजातील म्हणा किंवा या भागातील अन्य समाजातील पुढाऱ्यांना हाताशी धरुन साम, दाम, दंडाचा वापर करुन हव्या त्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करुन घेतले जाते.
अलिकडच्या काळात ज्याच्याकडे प्रचंड पैसा, तोच निवडणुकीत उभा राहू शकतो. सर्वच राजकीय पक्ष अशाच गडगंज पैशावाल्या लोकांना उमेदवारी देण्यात धन्यता मानत आहेत. कशाही पद्धतीने निवडून येणे, हिच त्याची पात्रता असावी लागते. भले तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा का असेना.
खेड-आळंदी या मतदारसंघात निवडणूक लढवत असलेले काही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. एका उमेदवाराने तर पश्चिम भागात चक्क ट्रक भरुन दारु आणलेली असल्याची जोरदार चर्चा आहे. मतदारांना दारु, जेवणाबरोबरच पैशांचे देखील वाटप केले जात आहे.
दरम्यान या भागातील एकगठ्ठा मतदानावर जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांचा डोळा आहे. या भागातून जेवढी जास्तीत जास्त मतांची आघाडी मिळेल, त्यावरच उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध पर्यायांचा वापर केला जात आहे. प्रचाराच्या नावाखाली या भागात गावगुडांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ठराविक उमेदवारालाच मते द्या, यासाठी मतदारांवर दबाव आणला जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची अडवणूक केली जात आहे.
दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार निवडून आले तर तालुक्यातील जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे भावी पिढयांचे नुकसान टाळण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती वेशीबाहेरच ठेवली पाहिजे.