दहा वर्षांत किती जणांचे अश्रू पुसले?

election

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे

जनतेसमोर हुंदका फुटणे, भावनाविवश होऊन डोळ्यांत पाणी येणे (आणणे) हा नवीनच ‘ट्रेंड’ हल्ली राजकारणात चांगलाच बाळसे धरु पाहत आहे. राजकारणी देखील संवेदनशील असतातच. त्यांना देखील भावना असतात. याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण ज्या राजकीय व्यक्तींनी शेकडो नव्हे हजारो कुटुंबांच्या डोळ्यात पाणी आणले, अनेकांना आयुष्यातून उठविले, गरिबांच्या जमीनी हडप करून त्यांना देशोधडीला लावले, खोट्या केसेस दाखल करुन अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद केले, अशा राजकीय व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येणे हे निव्वळ नाटकच म्हणावे लागेल. याला मगरीचे अश्रू म्हणतात. परंतु सर्वसामान्य जनता या खोट्या अश्रूंना मुळीच भीक घालणार नाही की फसणारही नाही. 

सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रचार करताना उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे. निवडून येण्यासाठी अनेक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना सामोरे जात आहेत. काही जणांकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला जात आहे. अखेरची निवडणूक म्हणून काही उमेदवार मतदारांना भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. असो..

मतदार सुजाण व सुज्ञ आहेत. क्षणिक विचार न करता मतदार देखील भविष्याचा व पाच वर्षांचा विचार करुनच योग्य तो उमेदवार निवडतील.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर, या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. तसेच प्रचाराची पातळी देखील खालच्या स्तरावर गेलेली आहे. एकमेकांच्या वर्णावरुन काही उमेदवारांचा घाणेरड्या शब्दांमध्ये उल्लेख केला जात आहे.

दरम्यान सर्वात गमतीचे व अनपेक्षित म्हणजे, एका उमेदवारांकडून निवडून देण्यासाठी मतदारांना अतिशय भावनिक आवाहन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित उमेदवारांच्या डोळ्यांमध्ये चक्क पाणी येऊन त्याला हुंदका फुटला. का तर त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून. हे बघून उपस्थितीतांची मने हेलावून गेली. वातावरण एकदम भावनिक बनले. दुसरीकडे संबंधित उमेदवाराचा हुंदका बघून तालुक्यातील बहुसंख्य लोकांना, मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. कोणाचाच कोणावर विश्वास बसेना. आपण जे बघतोय, जे ऐकतोय ते वास्तव आहे की काल्पनिक? हेच कुणाला कळेनासे झाले आहे. संबंधित दृश्य पाहून सोअमा गोअमा काअपसे या तीन जीवलग मित्रांना तर चक्कर आल्यामुळे त्यांना पदरवाडी येथील सुपर ड्युपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ते तिघेही हास्य सागरात बुडाल्याचे समजते.

म्हणे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले? हा युक्तिवाद जरा अतीच झाला आहे. 

मुळातच ज्या उमेदवारांने यापूर्वीच्या त्याच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पक्षांतर्गत तसेच इतर पक्षांतील राजकिय विरोधक असो वा स्वतःच्या विरोधकांशी सहानुभूती वाटणारे सर्वसामान्य नागरीक कि ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा लोकांवर असंख्य खोटे गुन्हे दाखल करायला लावून त्यांना किती त्रास दिला, त्यामुळे स्वतःवर गुन्हा दाखल झाला म्हणजे आभाळ नाही कोसळले. जसे यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, अशाच आविर्भावात ते बोलत आहेत.

हे जनता व पक्षांतर्गत विरोधक विसरलेले नाहीत. ते फक्त योग्य वाट पहात होते. 

चाकण परिसरातील एका गावात घडलेल्या घटनेत तर संपूर्ण गावांतील कर्त्या पुरुषांसह तरुणांवर जन्माची अद्दल घडविण्याच्या दृष्टीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला होता. संबंधित घटनेशी दुरान्वयेही ज्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यातील बहुसंख्य ग्रामस्थ कामानिमित्त परगावी वा बाहेर गेलेले होते, अशा ग्रामस्थांवर देखील खोटे गुन्हे नोंदवायला भाग पाडले होते. त्यावेळी संबंधित ग्रामस्थांच्या घरच्या लोकांच्या डोळ्यांतील अश्रू यांना नाही दिसले. तुम्ही स्वतःला भावनाप्रधान समजता तर त्या निष्पाप लोकांच्या घरच्या महिलांच्या, लहान लहान मुलांच्या डोळ्यातील पाणी बघून तुमच्या डोळ्यात पाणी आले होते का? 

इनरकॉन पवनउर्जा प्रकल्पाला असलेला विरोध दडपण्यासाठी पोलिस यंत्रणेचा, स्वतःच्या गावगुडांचा वापर करुन पश्चिम भागातील गोरगरीब ग्रामस्थांना किती अतोनात छळण्यात आले? त्यांना किती मानसिक त्रास दिला, हे संबंधित ग्रामस्थ विसरलेले नाहीत. त्यावेळी रात्री अपरात्री पोलिस पकडायला घरी येतील, या भीतीने तरुण रानावनात झोपायचे. इनरकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडून काही स्थानिक ग्रामस्थांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करताना तुमच्या डोळ्यात कधी पाणी आले का? की हुंदका फुटला? जरा आठवून तर पहा.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील मतदान झालेली सर्व गावे व केंद्रांची यादी संबंधित महोदयांनी त्यांच्या कार्यालयात लावली होती, हे तमाम लोकांच्या स्मरणात आहे. जे ग्रामस्थ त्यांच्याकडे काही कामानिमित्त वा कामे घेऊन जात असत, संबंधित ग्रामस्थांना हे महोदय सुरवातीला त्याच्या गावाचे वा वाडीचे नाव विचारत. जर त्या ग्रामस्थांच्या गावात ह्या महोदयांना कमी मतदान झालेले असेल, तर महोदय त्यांना म्हणायचे कि, तुझ्या गावात मला इतके इतके कमी मतदान झालेले आहे. त्यामुळे मी तुझे काम कसे करु? ज्या विरोधी उमेदवाराला तु मतदान केले आहे, त्याच्याकडे जा व तुझे काम करुन घे. अक्षरशः संबंधितांना त्या कार्यालयातून हाकलून दिले जायचे. लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा केवढा हा उन्मत्तपणा?

तालुक्यातील जनतेवर यांचे बेगडी प्रेम आहे. निवडून येण्यासाठी भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी यांची ही सारी धडपड सुरु आहे. निवडून गेल्यानंतर ते त्यांचा मारकुटा स्वभाव बदलणार नाहीत की सोडणारही नाहीत. सत्ता असताना तुम्ही तालुक्यातील किती जणांशी प्रेमाने बोलला? आता तुम्हाला प्रेमाचा पाझर फुटला आहे? हे प्रेम पुतणा मावशीचे आहे. 

शेवटची संधी म्हणून निवडून द्या, असे आर्जव संबंधित उमेदवार मतदारांना करत आहे. यापूर्वी तुम्हाला तालुक्यातील जनतेने दोनदा संधी दिली होती. परंतू तुम्हाला संधीचे सोने करताच आले नाही. संधीचा उपयोग फक्त स्वतःचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते यांच्याच भल्यासाठी केला.  

स्वतःवरील खोट्या? गुन्ह्याचे राजकिय भांडवल करुन सहानुभूती मिळविण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे. बाकी काही नाही. तालुक्यातील जनता दुधखुळी नाही.