ही निवडणूक सर्वस्वी सर्वसामान्य जनतेच्या हाती..परिवर्तन अटळ.. डॉ. अमोल कोल्हे..

Dr kolhe

गेल्या पंधरा वर्षांत खासदार आढळराव यांनी मतदारसंघातील जनतेला फक्त फसविण्याचेच काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संसदेत कधीही आवाज उठविला नाही. सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळेच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली असून यंदा परिवर्तन अटळ असल्याचा दृढ विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकताच खेड तालुक्यातील चाकण, वाडा व चास या प्रमुख गावांना गावभेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या गावभेटी दौऱ्याला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राम कांडगे, अशोक पवार तसेच मंगलदास बांदल, बाबा राक्षे, हिरामण सातकर, कैलास सांडभोर, बाळशेठ ठाकूर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, माझे विरोधक सातत्याने माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक स्वरुपाची टिका करत आहेत. ‘स्वराज्य रक्षक’ मालिकाही बंद करण्यासाठी ते प्रयत्नशील  आहेत. परंतु मी मात्र माझी संस्कृती सोडणार नाही. कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. खासदार हे कामांच्या बाबतीत पूर्णपणे निष्क्रिय ठरले असून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मालिकेतून मांडल्यानंतर मी मालिका विश्वातुन बाजूला होणार असल्याने पूर्ण वेळ समाजसेवेसाठी देणार आहे. जे पंधरा वर्षात झाले नाही, ते पाच वर्षात करण्याचा माझा प्रयत्न राहील, असा शब्द डॉ कोल्हे यांनी यावेळी दिला.पुढे बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, विमानतळ दुसरीकडेल गेल्यामुळे तब्बल सव्वा लाख रोजगार बुडवण्याचे पातक यांनी केले आहे. विमानतळ प्रश्नावरून यांनी सातत्याने कोलांटउडयाच मारण्याचे काम केले आहे. दूरदृष्टी न दाखवल्याने मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले आहे.