बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार..

shrutika

आंबेगांव…. आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या लहानग्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रृतीका महेंद्र थिटे (वय-५) असे या घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव असून श्रृतीका मुळची खेड तालुक्यातील जऊळके या गावची रहिवासी आहे. पाच दिवसांपूर्वीच श्रृतीकाची आई स्वाती महेंद्र शिंदे या आपल्या आईकडे माहेरी बाळंतपणासाठी आल्या होत्या.

याबाबतची माहिती अशी की, रविवार दि, २४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्रृतीकाची आई व आजी घरासमोरील शेतात जनावरांसाठी मका कापत होत्या. त्यावेळी श्रृतीका बाजूलाच खेळत होती. दरम्यान मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक श्रृतीकावर हल्ला करत तिला तोंडात पकडून मक्याच्या शेतात फरपटत नेले. हे पाहताच श्रृतीकाच्या आई व आजीने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. बिबट्याने श्रृतीकाला तिथेच टाकून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात श्रृतीकाच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. जखमेतून प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्रृतीकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.