मोदी-शहा पर्वाच्या ‘ऱ्हासास’ प्रारंभ

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

‘नीट’ परिक्षा पेपरफुटीच्या विरोधातील देशभरातील विद्यार्थ्यांच्या जंतरमंतरवरील उत्स्फूर्त आंदोलनाला जे काही अभूतपूर्व यश मिळालेले आहे, त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या बारा वर्षापासून देशाच्या सत्तेला घोरपडीसारखे चिकटून बसलेल्या मोदी-शहा राजवटीच्या ऱ्हासाची खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. देशातील ज्या भविष्याला झुरळ म्हणून हिणवले गेले, त्यांनीच भाजपला वठणीवर आणण्याचे काम केलेले आहे. एका अर्थाने सीजेपीने फळीफोड केलेली आहे.

दरम्यान भाजपमध्ये हा जो मस्तवालपणा आलेला आहे, त्याला देशातील तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण-तरूणींनी आंदोलनाच्या माध्यमातून एकाच फटक्यात जमिनीवर पार आडवे केलेले आहे. एवढे की भाजपच्या डोळ्यांसमोर आता अक्षरशः काजवे चमकू लागलेले आहेत.

आमच्या अभेद्य अशा पोलादी तटबंदीला कुणीच हलवू शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही, याच भ्रमात मोदी-शहा सरकार इतक्या वर्ष राहिले होते. परंतु शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनी, तरूण-तरूणींनी जोरदार धडक दिल्यामुळे मोदी शहांच्या या पोलादी तटबंदीला अक्षरशः तडे गेलेले आहेत. किंबहुना धडक एवढी जोरात बसलेली आहे की, पोलादी तटबंदी कधीही ढासाळू शकते. परिणामी यापुढे मोदी-शहांना आता यापुढे पाशवी बहुमताच्या जोरावर अपेक्षित असलेले प्रयोग करणे सहजसाध्य अंमलात आणणे अवघड होत जाईल. त्यांच्यावर मर्यादा येतील. विरोधी पक्ष विशेषतः काॅंग्रेस भविष्यात अधिक ताकदीने पुढे येईल. प्रादेशिक पक्षांना देखील अच्छे दिन येतील.

मोदी-शहा या जोडगोळीच्या पुढ्यात आंदोलन करणे नक्कीच सोपे नव्हते. ते ही त्यांच्या घरात घुसून. विद्यार्थ्यांनी हे अशक्य काम करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी नक्कीच ‘न भूतो न भविष्यती’ अशाच स्वरूपाची आहे. एक मात्र नक्की की, देशातील जनतेचा ‘मूड’ बदलत चाललेला आहे. त्यांना बदल हवाय. आणि हेच यावरून अधोरेखित होत आहे.

ब्रिटिश साम्राज्यावर सुर्य कधीही मावळत नसे’ असे एकेकाळी जगभर पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याबद्दल नेहमी बोलले जात होते.

अगदी तसाच काहीसा भ्रम भाजपने करून घेतलेला दिसतोय. आमची सत्ता चिरकाल आहे, आमच्या सत्तेचा दिवस कधीच मावळणार नाही, आम्ही अजेय आहोत. आमचा अश्वमेध कुणीच रोखू शकत नाही. आणि याच आत्ममग्नात, याच कैफात भाजप मश्गुल झालेला आहे. बेफाम झालेला आहे, तल्लीन झालेला आहे, समोरचे त्याला काहीच दिसेनासे झालेले आहे. एकप्रकारची वेगळीच धुंदी त्याच्या डोळ्यांवर आलेली आहे. भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात अहंकार निर्माण झालेला आहे. खरं असूनही एखाद्याला खोटं ठरवायचे वा खोट्याला खरं ठरवायचे, यात तर भाजपचा हातखंडाच.

भाजपच्या कोणत्याच नेत्यांविरोधात देशातील विरोधी पक्षांसह, सर्वसामान्य नागरीक, विरोधी विचारसरणीचे लोकं, विचारवंत, समाजातील विविध विषयांतील तज्ञ वा अभ्यासक यांनी काहीच बोलायचे नाही, विरोधी मत व्यक्त करायचे नाही, असा एक दंडकच संबंधित पक्षाने निर्माण केलेला आहे. कुणी काही बोलले तर चहूबाजूंनी त्यांच्यावर तूटून पडायचे, अंत्यत खालच्या स्तरावर बोलायचे. हाच भाजपवाल्यांचा धंदा बनलेला आहे. बाकी शिव्या देण्यासाठी त्यांची आयटी सेल आहेच. भाजपच्या या तथाकथित आयटी सेलने एवढे प्रचंड प्रमाणात अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे की, ते आता भाजपच्याच बोकांडी बसलेले आहे. बाकी भाजपच्या अगदी लिंबू टिंबू वा गल्लीतल्या कार्यकर्त्यांना देखील आकाशपाताळ एक झालेले आहे. तो उन्मत झालेला आहे. त्यामुळेच देशातील जनता त्यांना कंटाळलेली आहे.

थोडक्यात काय तर या लोकशाहीप्रधान देशात भाजपचा म्हणजेच मोदी-शहांचा एकछत्री हूकूमशाही सदृश्य अंमल सुरू असल्याचे बोलले जाते.

जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन हे फार फार तर आठ पंधरा दिवस चालेल, असेच भाजप सरकारला वाटले असणार. त्यामुळे त्यांनी  या आंदोलनाला फारसे महत्त्व न देता आंदोलनच बेदखल करून टाकले. विद्यार्थ्यांना भेटण्याची वा त्यांच्याशी संपर्क साधण्याची साधी तसदी देखील सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. गेली बारा वर्ष भाजपने देशातील विरोधकांना, विरोधातील प्रत्येकाला जसे कस्पटासमान समजले, तसेच या विद्यार्थ्यांना देखील अशाच पद्धतीने वागवले. आमचे कुणी काहीच वाकडे करू शकत नाही, याच आविर्भावात ते राहिले.

एकंदरीतच विद्यार्थी आंदोलनामुळे भाजपच्या जहाजाला भले मोठे भगदाड पडलेले आहे. त्यामुळे ते कधीही पाण्यात बुडू शकते. आणि हा धोका ओळखून विशेषतः इतर पक्षातील नेते की ज्यांनी स्वत::च्या देहाची तथा शरीराची विक्री करून भाजपात सामिल झाले तथा भाजपच्या चरणी लोटांगण घातले ते नेते आता किनाऱ्यावर सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करतील.

मुळातच भाजपवाल्यांना कुणाचेच काही सहन होत नाही की यांना वरचढ झालेले कुणी चालत नाही. आणि हेच खरे यांचे अवघड जागेचे दुखते आहे. काहीतरी लादायचे असेल तर जनतेला गृहीत धरायचे. तर कधी कधी गृहीतच वा खिजगणतीतही धरायचे नाही, याच दुहेरी अस्राचा वापर भाजप करत आलेला आहे. आपल्याच लोकांविरूद्ध सत्तेचा दुरुपयोग करणे, यात भाजपला विशेष आनंद मिळतो.

विरोधी पक्षातील आमदार, खासदार फोडणे, वेळप्रसंगी कुणाची जिरविण्यासाठी पक्षच फोडणे, याला राजमान्यता मिळालेली आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षातील ज्या ज्या नेत्यांवर वारेमाप आरोप केले होते, कालांतराने त्यांनाच भाजपात घेऊन त्यांचे शुद्धीकरण केले. याबद्दल देखील जनतेत प्रचंड नाराजी आहे.

विरोधकांची अगदी ती महिला असली तरी तिची यथेच्छ टिंगल टवाळी करणे हा भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांसहीत सर्वांचाच आवडीचा विषय. एखाद्याला देशद्रोही ठरवणे, पाकिस्तानी, चीनी एजंट, हस्तक म्हणणे तसेच विरोधातील लोकांना पाकिस्तानातून फंडीग होते, हे तर भाजप नेत्यांच्या तोंडी असलेले परवलीचे शब्द.

उदाहरण द्यायचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसचे शशी थरूर यांच्या पत्नीची ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ असा केलेला उल्लेख असो की कॉंग्रेसच्याच रेणुका चौधरी यांची भर संसदेतच ‘शुर्पणखा’ म्हणून केलेली हेटाळणी. यावेळी पंतप्रधानांसह भाजपचे सर्व मंत्री, खासदार बाके वाजवून मोठ मोठ्याने हसत मोदींना साथ देत होते. तसेच एका प्रचारसभेदरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची ‘दीदी ओ दीदी’ म्हणून केलेली संभावना.

एक मात्र नक्की की, आम्हीच खरे सर्वज्ञानी, आम्हालाच सर्वकाही कळते, आमची बरोबरी कुणीच करू शकत नाही, आम्ही ठरवू तीच पूर्वदिशा, असे समजणाऱ्या भाजपच्या मनसूब्यांना जबर धक्का बसलेला आहे. या आंदोलनामुळे भाजपचे ‘बुरेदिन’ सुरू झालेले आहेत. भाजपचा आत्मविश्वास ढळायला सुरवात झालेली आहे.

विशेषतः नोटबंदी व लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या संसाराची फरफट झाली, व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या, अनेकजण कर्जबाजारी झाले. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात या सरकारबद्दल जो राग होता, चीड होती, संताप होता, तो देखील या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. म्हणूनच देशातील बहुसंख्य जनतेने या विद्यार्थी आंदोलनाला थेट पाठिंबा देऊन ते रस्त्यावर उतरले.
या आंदोलनाच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली ती म्हणजे, या सरकार विरोधात आता लोकं बोलायची हिंमत करू लागलेले आहेत. व्यक्त होऊ लागलेले आहेत. आणि उत्तरोत्तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे.

या आंदोलनाचा अजून एक सर्वांत मोठा फायदा असा होणार आहे की, सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगासह अन्य काही स्वायत्त संस्था की ज्या गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या म्हणजेच मोदी-शहांच्या पोलादी पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या आहेत, त्या आता पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच धडपड करतील. कारण या आंदोलनाचा धसका केंद्र तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्थांनी घेतलेला आहे. मोदी-शहा जोडगोळीला जिथे पोरांनी जुमानले नाही, त्यांचा अहंकार मोडून काढला, तिथे आपली काय बिशाद? अशीच अवस्था या संस्था प्रमुखांची झालेली असणार. जनतेच्या आक्रोशापुढे नमते घेऊन ते आता चुकीच्या गोष्टींबद्दल सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत नक्कीच दाखवतील. ते आता ताळ्यावर येतील. सत्ताधाऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्यांना आता जनतेला उत्तर देणे भागच आहे.

तसेच भाजपच्या वळचणीला गेलेले जे जे पक्ष आहेत, त्यांचे भवितव्य आता कठीण होणार आहे. चहापेक्षा किटली गरम अशीच संबंधितांची अवस्था आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २०२२ मध्ये स्वतःच्या बुडाजवळील श्रीलंकेत आर्थिक संकट, महागाई व जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईविरोधात झालेले नागरीक व तरूणांचे जनआंदोलन. २०२४ मध्ये बांगलादेशात झालेले विद्यार्थी आंदोलन. तसेच गेल्यावर्षी (२०२५) नेपाळमध्ये सोशल माध्यमांवर घातलेली बंदी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, आर्थिक विषमता याविरोधात झालेले तरूणांचे आंदोलन. या तिन्हीं देशात विद्यार्थी-तरूणाईने ज्या पद्धतीने सत्ता उलथवून टाकल्या, त्याचे जराही भान वा चिंता भारताच्या सत्ताधाऱ्यांत दिसली नाही. कारण विद्यमान सत्ताधाऱ्यांमध्ये कमालीचा उद्दामपणा ठासून भरलेला आहे. विरोधातील कुणालाच काही किंमत द्यायची नाही, विरोध जागच्या जागी मोडून काढायचा, हेच यांचे तत्व अन् हाच यांचा खाक्या.

श्रीलंका, बांगलादेश व नेपाळमध्ये जे झाले तशी हिंमत भारतात कुणीच करू शकत नाही. कारण देशातील सर्व प्रमुख संस्था भाजपच्या बटीक झालेल्या आहेत. भाजप सरकार विरोधकांशी ज्या पद्धतीने अतिरेकी व्यवहार करत आहे, त्यामुळेच सर्वसामान्य लोकांमध्ये देखील एकप्रकारचे भीतीचे वातावरण आहे. आणि इथेच त्यांची चूक झाली. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, तरुणांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने अत्यंत निर्दयीपणे लाठीमार केला, अश्रूधुराचे नळकांडे फोडले, पॅलेट गनचा वापर केला, ही सत्ताधाऱ्यांची दुसरी मोठी चूक झाली. पोलिसांनी मुलींना, तरूणींना देखील सोडले नाही. कपडे फाडू फाडू, खाली पाडू पाडू त्यांना मारले. हा अत्याचार बघून मग देशातील बहुसंख्य जनता रस्त्यावर उतरली.