निष्क्रियता दोघांतही ठासून भरलेली…..जनता पर्यायाच्या शोधात

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

शिरूर लोकसभा मतदारसंघात मावळते खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी अढळराव या दोघांतच प्रमुख सामना होईल, अशी शक्यता आहे. अढळरावांच्या तुलनेत कोल्हेंचे पारडे नक्कीच जड आहे. मात्र घोडामैदान जवळच आहे. मतदानापर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात काय गमतीजमती, चमत्कार होतील, यावरच सर्वकाही अवलंबून असणार आहे. त्यातच मराठा आरक्षणाची झळ दोघांनाही बसणार आहे. दरम्यान आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय समीकरण’ उचल खाण्याची शक्यता नाकारतां येत नाही.

दरम्यान या मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. कारण मावळत्या व माजी म्हणजेच या मामा खासदारांवर मतदारसंघातील जनता प्रचंड प्रमाणात नाराज आहे. या मामा खासदारांना मतदारसंघातील जनेतेने एवढी मोठी संधी दिली, परंतु त्यांना कामांच्या माध्यमातून संधीचे सोने काही करता आले नाही. ते निष्क्रीयच राहिले. दोघांकडेही विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीकोनाचा अभाव आहे.

अढळरावांना तर तीनवेळा संधी मिळाली. बैलगाडा शर्यतींचा भावनिक विषय करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून गैरफायदा घेणे, फक्त विरोध करायचा म्हणून विविध प्रकल्पांना विरोध करणे, अद्वातद्वा बोलून फुशारक्या, बढाया मारणे यातच त्यांची पंधरा वर्षे सरली. दुसरीकडे ‘रक्त सांडले तरी चालेल पण खेड तालुक्यात विमानतळ होऊ देणार नाही’ या तीनपाट व फालतू घोषणेमुळे तर खेड तालुक्याचे विकासाच्या रूपात मोठेच वाटोळे झालेले आहे. पश्चिम घाटावरील सदाहरीत जंगलाची नासाडी करणाऱ्या इनरकाॅन पवनऊर्जा प्रकल्पाला सुरूवातीला अढळराव यांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्याकडे लेखी तक्रार करून तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र पाच महिन्यांनी अढळरावांनी सदर प्रकल्प विकासाच्या दृष्टीने माझ्या मतदारसंघातील जनतेच्या हिताचा आहे, असे पत्र डाॅ. मनमोहन सिंग यांना लिहून आपली सुनियोजित तक्रार मागे घेतली व लगोलग सहाव्या दिवशी या पवनऊर्जा प्रकल्पाला केंद्राची परवानगी देखील मिळाली. संबंधित कंपनी व यांच्यात काहीतरी तडजोड झाल्याशिवाय तक्रार थोडीच मागे घेतली असणार? हा सर्व मामला मोठाच संशयास्पद आहे. यासंबंधीची सर्व कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत.

दरम्यान वारंवार जनतेची फसवणूक करणाऱ्या व स्वत:चेच हित पाहणाऱ्या अढळरावांना चौथ्यावेळी मात्र जनतेने चांगलेच पाणी पाजले. तरी महाशयांची हौस काही फिटली नाही. पाचव्यांदा खासदारकीच्या निवडणूकीत उभे राहण्यासाठी अक्षरश: याचकासारखे विरोधकांचे पाय धरण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांना निष्क्रियतेचे शिरोमणी म्हणून संबोधणे अधिक योग्य व समर्पक ठरेल.

विरोधी पक्षाचा खासदार असल्यामुळे कामे होत नव्हती, निधी मिळत नव्हता, असे तुणतुणे वाजवण्यात पहिली दहा वर्षे वाया गेली. पुढची पाच वर्षे राज्यात व केंद्रात भाजप व शिवसेनेची सत्ता येऊनही त्यांना फारसे विधायक असे काही करता आले नाही. म्हणजेच ही पाच वर्षे देखील अशीच वाया गेली. याचाच अर्थ विरोधी पक्षात असताना व सत्तेत असताना देखील यांना काहीच करता आले नाही. त्यामुळे यांना निष्क्रिय नाही तर काय म्हणायचे?
या निवडणूकीत अढळराव बळीचा बकरा बनणार हे बाकी नक्की. कारण जनमत त्यांच्या खुपच विरोधात आहे.

शिरूर मतदारसंघालगतच असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण व रांजणगांव सारखी दोन दोन मोठी औद्योगिक क्षेत्रे मतदारसंघात असूनही मामा जोडगोळीला मतदारसंघासाठी व मतदारसंघातील तरूणांच्या रोजगारासाठी काहीही करता आलेले नाही. मतदारसंघातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासह दोन पिढ्यांपासून प्रलंबित असलेले धरणग्रस्तांचे पर्यायी पुर्नवसन, बेरोजगारी, उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा, पायाभूत शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यात मामाला अपयशच आलेले आहे.

चाकण, शिक्रापूर वाहतूककोंडी वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. या रस्त्यांनी प्रवास करणारे हजारो वाहनचालक व प्रवाशी तसेच स्थानिक लोकांच्या मनांत चाकण व शिक्रापूर परिसर वाहतूककोंडीची प्रचंड धास्ती बसलेली आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. या वाहतूककोंडीत अडकणे म्हणजे एकप्रकारचा मानसिक छळ सहन करणे असाच आहे. वाहतूककोंडी सुटावी यासाठी या मामाने कधी प्रामाणिक प्रयत्नच केलेसे नाहीत.

मामा फक्त स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पदाचा वापर करत बसले. मामाने बैलगाडा शर्यती व बैलगाडा घाट निर्मितीला प्राधान्य देऊन यांतच खरा विकास मानून घेतला. बैलगाडा शर्यतीत राजकारण घुसल्यामुळेच शर्यतींवर विविध संकटे आली. स्वत: एक उद्योजक असूनही अढळराव विकासकामांऐवजी बैलगाडा शर्यत व घाट यातच अधिक रमले गेले. कोल्हेंनी पण दुसरे काय केले? बैलगाडा शर्यतींच्या नावाखाली तरूण पिढींचे वाटोळे करण्याचे काम मामाने केले.

मामा स्वत:तच आत्ममग्न राहिले. जनतेला गृहीत धरत गेले. त्यामुळेच जनता या दोघांच्याही हातात नारळ द्यायला आसुसलेली आहे. म्हणूनच जनतेला एक सक्षम असा पर्याय हवा आहे. तो मग्रूर, उद्धट, उन्मत, चमकोगिरी न करणारा, खोटे न बोलणारा, थापाड्या व नौटंकीबाज नसावा. लोकांमध्ये मिळून मिसळून व त्यांची कामे करणारा हवा. कपड्यांची इस्री मोडणारा असावा , मेकअप न करणारा असावा. विशेष म्हणजे एकदा निवडून गेल्यानंतर अमावस्या, पौर्णिमेला व निवडणूकीच्या तोंडावर मतदारसंघात फेरफटका मारणारा नसावा. मतदारसंघातील जनतेच्या कामांसाठी, प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी तो नेहमीच उपलब्ध असावा. तगडा पर्याय मिळाला की, या दोघांचा पराभव निश्चिंत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत या दोघांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. त्याचाही हमखास फटका या मामा जोडगोळीला बसू शकतो.

तसे पाहिले तर सध्या कोल्हे देखील भलत्याच हवेत असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी जमीनीवर यायला हवे. भानावर यायला हवे. आजूबाजूची मोजकी कान भरी चांडाळ चौकटी सोडून यापूर्वीच लोकांत मिसळायला हवे होते. निवडून गेल्यानंतर पाच वर्षे त्यांना मतदारसंघातील जनतेची आठवण कधी आलीच नाही. पाच वर्ष मतदारसंघातील जनतेला त्यांचे दर्शन दुर्लभच झाले होते. ‘शिरुरचा खासदार दाखवा, अन एक हजार रुपये मिळवा’ तसेच ‘कुठे नेऊन ठेवला शिरुरचा खासदार’ अशीच परिस्थिती पाच वर्षे होती.

दरम्यान खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर गायब झालेले कोल्हे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात खेड तालुक्यात प्रकट झाल्याचे पाहून लोकं अक्षरश: गर्भगळीत झाली होती. आपण निवडून दिलेला व हरवलेला हाच का तो खासदार? अशीच लोकांची प्रतिक्रिया होती.

रंगीबेरंगी कपडे घालून भाषणबाजी करण्यापेक्षा कधीतरी भात खाचरातील चिखलमाती कपड्यांना लागू द्यायला पाहिजे होती. उन्हातान्हात रानांवनांत हिंडून हंडाभर पिण्याचे पाणी वाहणाऱ्या महिलांचे, लहान मुलामुलींचे हाल प्रत्यक्ष पाहून त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे होती. परंतु गुलाबी त्वचा काळवंडेल म्हणून पाच वर्ष हे महोदय अभावानेच मतदारसंघात आले.

‘मतदारसंघात हार-तुऱ्यांत रमणारा नव्हे तर मतदारसंघाच्या गळ्यात हारतुरे यावे यासाठी अहोरात्र झटणारा खासदार’ असे म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तीस हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्यांना चाकण ते मोशी दरम्यानच्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवता आलेला नाही.