‘जो बूॅंद से गयी वो हौद से नहीं आती’
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

माजी खासदार शिवाजी अढळराव यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात तथा अजित पवार गटात प्रवेश देऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यास राणा भीमदेवी थाटात जाहीर वल्गना करून विरोध करणारे आमदार दिलीप मोहिते हे आपली बोथट झालेली, गंजलेली, शेंडा व बुडखा नसलेली तलवार म्यान करून शेवटी शेपूट घालतीलच (माघार घेतील) याची पुरेशी कल्पना व ठाम विश्वास तालुक्यांतील जनतेला व मोहिते भक्तांना होताच. यात आश्चर्य वाटण्याचे काहीएक कारण नाही. मोहीतेंनी सुतळी बाॅम्ब फोडण्याचा आव आणला होता. परंतू प्रत्यक्षात तो सुतळी बाॅम्ब नव्हताच. तो पाण्यात भिजवलेला लवंगी फटाका निघाला.
गेली वीस वर्ष मोहिते व अढळराव यांच्यातील प्रचंड राजकीय संघर्ष मतदारसंघातील जनतेने पाहिलेला आहे. अनेकदा दोन्ही नेते अगदी हमरीतुमरीवर आलेले होते. मोहिते यांनी यापूर्वी अढळराव यांच्यावर टिका करताना, ‘ज्यांनी मला तुरूंगात डांबण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठविण्यासंदर्भात भूमिका घेतली, प्रयत्न केले, असा जाहीर आरोप केला होता. तसेच अढळराव यांचा प्रचार करण्याऐवजी पक्ष सोडेल, राजकारण सोडेल, राजकिय संन्यास घेईन, पण अढळराव यांच्याशी कदापी मनोमिलन करणार नाही, अशी ठाम भूमिका मोहितेंनी घेतली होती. परंतू लवकरच त्यांच्यात नेमका काय आमुलाग्र बदल झाला, मतपरिवर्तन झाले की त्यांच्यावर नरमाई घेण्याची वेळ यावी? गेल्या आठ दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे, मोहिते व अढळराव यांच्यात नेमकी काय राजकीय वा अन्य ‘तडजोड’ झाली, की मोहितेंनी अढळराव यांच्याशी जूळवून घेतले? की पक्ष जो उमेदवार देईल, त्याचा प्रचार करण्याची उपरती त्यांच्यावर आली? असे विविध प्रश्न सर्वसामान्यांत विचारले जात आहेत. मोहितेंना आपल्या ठाम भूमिकेपासून जर पलायनच करायचे होते, तर त्यांनी उगीच दंडात बेडकुळ्या आणायची काहीच गरज नव्हती. माघार घेतल्यामुळे मोहितेंचेच जास्त राजकीय नुकसान होणार आहे. खेड तालुक्यांतील जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवेल अशी परिस्थिती नाही. हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची काहीही गरज नव्हती. मोहितेंच्या या पलटीमुळे खेड तालुक्यांतील सर्वसामान्य जनता तर नाराज झालीच परंतू मोहितेंचे काही हितचिंतक, समर्थक देखील नाराज झाल्याचे दिसते.
एक मात्र नक्की की काहीतरी पदरात पाडून घेतल्याशिवाय मोहिते अढळरावांना सहन करून घेणार नाहीत. कदाचित मंत्रीपद व येत्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीवर मोहितेंची तडजोड झाली असेल. अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटातील एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांसारखं एक दिवस का होईना मोहितेंना मंत्रीपदावर बसायचेच आहे. मंत्रीपदाचा त्यांचा तो हट्ट लपून राहिलेला नाही. आठ पंधरा दिवस वा महिना दोन महिने जरी मंत्रीपदाची झूल व ऊब मिळाली की मोहितेंना आपल्या राजकीय जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अढळरावांच्या विरोधामागे मोहितेंचे जनहित नक्कीच नाही. त्यांना केवळ आणि केवळ आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे. स्वत:च्या तुंबड्या भरून घ्यायच्या आहेत.
दरम्यान दोन वर्षांपूर्वीच्या खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीवरून मोहिते व अढळराव यांच्यात जोरदार हल्ले, प्रतिहल्ले झाले होते. एकमेकांनी अक्षरश: कंबराखाली वार केले होते. त्यावेळी अढळराव यांनी खंडण्या, विनयभंग, खून, गुंडगिरी मोहितेंच्या नसानसात भरलेली असून त्यांना पक्षात काहीही किंमत नसल्याचा आरोप केला होता. तसेच बालिश व थिल्लर म्हणून संभावना केली होती. दुसरीकडे आमदार मोहिते यांनी आरोप सिद्ध केले नाही तर अढळराव यांनी तालुक्यात तोंड काळं करून फिरावं असा हल्लाबोल केला होता. मात्र मोहितेंवर एवढे सारे आरोप करूनही अढळरावांना शेवटी मोहितेंच्या राजवाड्याचे (गढीचे) उंबरठे झिजवण्याची वेळ आली.
दोघांनीही वीस वर्षांची राजकिय दुश्मनी एका क्षणांत संपुष्टात आणली, याचे खरेतर कौतुकच केले गेले पाहिजे.
टिंब टिंबला नाही बायको अन् टिंब टिंबला नाही नवरा, अशाच स्वरूपाचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे शिवाजी अढळराव व सहकारमंत्री दिलीप वळसे दोघेही एकाच तालुक्यांतील. दोघांची मैत्रीही नजर लागावी अशीच होती. दरम्यान अढळरावांची राजकीय महत्वकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच २००४ मध्ये तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास अढळराव तीव्र इच्छूक होते. परंतू अढळरावांच्या उधळू पाहणाऱ्या वारूला वळसेंनी अडथळा निर्माण केल्यामुळे अढळरावांनी वळसेंसोबतच्या मैत्रीला तिलांजली देऊन शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. गेली वीस वर्ष दोघांत कमालीचा संघर्ष पाहावयास मिळाला.
कंदील मंत्री म्हणून ज्या दिलीप वळसेंना अढळरावांनी हिणवले, पण स्वत:वर वेळ येताच अढळराव त्याच कंदील मंत्र्याच्या म्हणजेच दिलीप वळसेंच्या गाडीत बसले. खासदारकीसाठी अढळराव किती मिन्नतवाऱ्या करत फिरत आहेत, हे बघून त्यांची दयाच येते.
‘माझ्या विरोधात उभे राहू नये म्हणून भीतीने शरद पवार माढ्याला पळून गेले, बराक ओबामा जरी माझ्याविरोधात उभे राहिले तरी मीच निवडून येणार, अशी मखलाशी मारणाऱ्या व स्वत:चेच ऊर बदडून काढणाऱ्या अढळरावांना मतांच्या जोगव्यासाठी दिलीप मोहिते व दिलीप वळसेंच्या चरणी लोटांगण घेण्याची वेळ का यावी? ही मर्दुमकीची भाषा एवढ्या लवकर ओसरली?
दरम्यान वळसे व मोहिते एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात फारसे पटत नाही. त्यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष आहे. एकंदरीतच वळसे, मोहिते व अढळराव हे तिघेहीजण एकमेकांचे कडवे विरोधक. तरीदेखील ते तिघे केवळ एकमेकांच्या फायद्यांसाठी एकत्र आलेले आहेत.
गमंत अशी की ज्यावेळी वळसे, अढळराव व मोहिते हे तिघे निवडणूक प्रचारासाठी गळ्यात गळे घालून एकत्र फिरतील, तेव्हा ते चित्र खुपच ‘वि’चित्र असेल, यात शंकाच नाही. त्यामुळे मतदारांनी या तिघानांही यावर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत कायमचे घरी बसवून यांची मक्तेदारी मोडीत काढण्याची वेळ समीप आलेली आहे.
असो, हे वागणं बरं नव्हं…! कारण ऐटीत तोरा दाखवणाऱ्यांची गावागावांत भलतीच शोभा झालेली आहे.
‘जो बूॅंद से गयी वो हौद से नहीं आती’