मोहितेंच्या विरोधामागे विधानसभेचे गणित
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट कोणत्याही परिस्थितीत सोडेल, अशी सुतराम शक्यता नाही. असे असले तरीही स्वत:च्याच बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना या मतदारसंघात खासदार अमोल कोल्हेंविरोधात लढण्यासाठी दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. एकप्रकारे ही नामुष्कीचीच गोष्ट ठरते.
दरम्यान अजित पवार गटाकडे लोकसभेसाठी नाम. दिलीप वळसे व आमदार दिलीप मोहिते हे दोन पर्याय उपलब्ध असले तरी ते दोघेहीजण विधानसभेचे मैदान सोडून लोकसभेच्या आखाड्यात उतरतील, एवढी हिंमत त्यांच्यात निश्चितच नाही. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मैदानातून पळ कसा काढायचा, हे बाकी वळसे यांच्याकडूनच शिकावे.
दुसरीकडे स्वत:च्या घरचीच बस असली तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार पार्थ पवारांना लोकसभेचे ‘तिकिट’ देतील, ही शक्यता वाटत नाही. कारण या लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून पार्थ पवार ‘चालतील’ अशी परिस्थिती नक्कीच नाही.
माजी आमदार विलास लांडे यांची देखील या मतदारसंघात डाळ शिजणार नाही.
अजित पवारांकडे खासदार कोल्हेंना टक्कर देऊ शकेल, असा सक्षम उमेदवार सध्यातरी दिसत नाही. त्यामुळेच अजित पवारांना कोल्हेंना तगडी लढत देणारा उमेदवार हवा आहे. आणि त्यासाठी शिवाजी अढळराव हे एक पर्याय उपलब्ध आहेत. वीस वर्ष ज्यांच्या विरोधात भांड भांड भांडले, एकमेकांवर कंबरेखाली वार केले, विरोधांचे राजकारण केले, आज त्यांच्याच गळ्यात गळा घालण्याची वेळ अजित पवारांवर आलेली आहे.
दुसरीकडे सुरूवातीला शरदराव पवारांची मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेस व त्यानंतर मूळ शिवसेना व सध्या शिंदेच्या शिवसेनेत गटांगळ्या खाणाऱ्या शिवाजी अढळराव यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत झालेला दारूण पराभव ते अजूनही पचवू शकलेले नाहीत. शिरूर लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे येणे कठीण दिसत असल्यामुळेच अढळरावांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. त्यादृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गेली वीस वर्ष अढळराव व विशेषत: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे, दिलीप मोहिते यांच्यातून विस्तव जात नव्हता. तेच अढळराव आता मुंडावळ्या बांधून या नेत्यांच्या मांडीवर बसायला तयार झालेले आहेत.
परंतू अढळरावांना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश देण्यास खेड-आळंदी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी भर बैठकीतच ठाम व उघडपणे विरोध दर्शवून अढळरावांच्या पक्षप्रवेशास अपशकुन घातला आहे. दरम्यान अढळराव राष्ट्रवादीत आले तर वळसेंना बरेच आहे. कारण लोकसभेला उभे राहण्याच्या अवघड भानगडीतून त्यांना सहीसलामत दूर राहता येईल. तसेच विधानसभेला अढळरावांची मदत घेता येईल, ही रणनिती वळसेंची असणार आहे.
एकंदरीतच मोहितेंच्या अढळराव विरोधामागे आगामी विधानसभेचेच गणित अवलंबून आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यदाकदाचित अढळराव खासदार म्हणून पुन्हा निवडून आले तर ते आगामी विधानसभेला खेड-आळंदीतून मोहितेंना पुन्हा उमेदवारी देण्यास नक्कीच तीव्र विरोध करतील. आणि हीच भिती मोहीतेंना सतावत आहे. कारण अढळराव व मोहिते यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रृत आहे. पूर्वी व आताही दोघानीं एकमेकांना तीव्र विरोध केलेला आहे. दोघांच्याही भूमिका कायमच एकमेकांच्या विरोधाच्याच राहिलेल्या आहेत. अढळरावांनी नेहमीच खेड तालुक्यांतील मोहिते विरोधकांना बळ देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळेच अढळरावांवर विश्वास ठेवून मोहिते त्यांना मदत करण्यास कदापी तयार होणार नाहीत. म्हणूनच त्यांचा अढळरावांना तीव्र विरोध आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अढळरावांना विरोध करण्यामागे मोहितेंचे जातीय समीकरण देखील लपलेले आहे. याठिकाणी त्याचा अधिक ऊहापोह करणे संयुक्तिक होणार नाही.
त्यातच २००९ च्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी अशोक खांडेभराड हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असूनही अढळरावांनी स्वपक्षाच्या उमेदवाराला मदत न करता अपक्ष रामदास ठाकुर यांना सर्व ताकदीनीशी मदत केली होती. परिणामी अशोक खांडेभराडांना पराभव स्विकारावा लागला होता. एका अर्थाने अढळरावांनी स्वत:च्याच उमेदवाराला पाडण्यासाठी जाहीरपणे अपक्ष उमेदवाराला मदत केल्याच्या चर्चा अजूनही मतदारसंघात चालू आहेत.
असो घोडामैदान जवळ आहे. सध्या राजकारणाचा स्तर अत्यंत घसरलेला आहे. स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या ज्या तथाकथित नेत्यांनी आयुष्यभर भाजप, मूळ शिवसेना पक्ष यांची टिंगलटवाळी केली, त्यांना जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले, तेच नेते आज शहाजोगपणाचा आव आणून त्या पक्षांच्या वळचणीला जाऊन सत्ता, विविध पदे, आमदारकी, खासदारकी उपभोगत आहेत.