शिरूर लोकसभा मतदारसंघातील ‘पक्षीय खिचडी’
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात
सर्वच पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी चालू आहे. सध्या ही जागा मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूटून निघालेल्या व भाजप-शिंदेच्या शिवसेनेशी घरोबा केलेल्या अजित पवार गटाने महायुतीतून या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा सांगितलेला आहे. तसेच भाजप देखील ‘शिरूर’साठी बाह्या सावरून बसलेला आहे. असे असले तरी भाजपसाठी ही लढत नक्कीच सोपी असणार नाही.
दुसरीकडे मूळ शिवसेनेतून विभक्त होऊन वेगळी चूल मांडलेल्या शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे माजी खासदार शिवाजी अढळराव यांनी पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसली असून युद्धपातळीवर प्रयत्न चालवलेले आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेतील, अशी चिन्हे नाहीत. एकंदरीतच ‘मी पुन्हा येईन’ या जोमात त्यांची तयारी सुरू आहे. मात्र महायुतीतील अजित पवार गट व भाजपच्या दांडगाईपुढे शिंदेच्या शिवसेनेची डाळ शिजेल, अशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे शिवाजी अढळराव नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
भाजप, शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट यांची सध्या युती असली तरी या जागेसाठी तिघेही तीव्र इच्छूक असून त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. घोडा मैदान जवळ आहे. त्यामुळे ऐनवेळी ‘शिरूर’ मतदारसंघ कुणाकडे जाईल व कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून वा गटाकडून निवडणूक लढवेल, हे सांगणे आता तरी कठीण दिसत आहे. दरम्यान अजित पवारांची दादागिरी भाजप व शिंदेंची शिवसेना सहन करतील की कसे, यावरच महायुतीचे भविष्य ठरणार आहे. तसेच लोकसभा निवडणूकीपर्यंत ही महायुती टिकेल की नाही, हेही काही सांगता येत नाही.
दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्यातुलनेत तगडा उमेदवार नाही.
याचाच अर्थ मुळ राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष ( शरद पवार), मुळ शिवसेना पक्ष ( उद्धव ठाकरे) व काॅंग्रेस पक्ष विरूद्ध
भाजपा, शिवसेना ( शिंदे गट) व राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून फूटून निघालेला अजित पवार गट यांच्यात या जागेसाठी मोठी तीव्र लढाई पाहावयास मिळू शकते.
एकंदरीत या मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी अढळराव तसेच अन्य इच्छूकांना दलबदलूपणा करण्याचा चांगलाच अनुभव असल्यामुळे कोण कुठे कोलांटउडी मारेल, हे येणाऱ्या दिवसात कळेलच. कारण सध्याचे राजकीय वातावरण एवढे प्रदूषित व गढूळ झालेले आहे की कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही.
अमोल कोल्हे आज जरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासोबत असले तरी ते अजित पवार यांच्याशीही संधान बांधून आहेत. तसेच कोल्हे हे भाजपच्या दारात देखील तिष्ठत बसलेले आहेत. याचाच अर्थ कोल्हे हे एकाचवेळी शरद पवारांचा पक्ष, अजित पवार गट व भाजप या तिन्ही डगरींवर पाय ठेऊन आहेत. कोल्हेंचा पिंडच मुळी अभिनेत्याचा असल्यामुळे त्यांना अशा भूमिका साकारणे अवघड जात नाही. त्यांचा ‘छुपा रूस्तम’ कार्यक्रम जोरात सुरू आहे.
कोल्हेंना चांगली संधी मिळाली, परंतू त्यांना मतदारसंघासाठी काहीही ठोस करता आलेले नाही. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर गायब झालेले कोल्हे नुकतेच खेड तालुक्यात प्रकट झाल्याचे पाहून लोकं अक्षरश: गर्भगळीत झाल्याचे दिसले. आपण निवडून दिलेला व हरवलेला हाच का तो खासदार? अशीच लोकांची प्रतिक्रिया होती. एक अत्यंत निष्क्रिय खासदार म्हणूनच कोल्हे ओळखले जातील, असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरणार नाही.
दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला तर त्या गटाकडे सहकारमंत्री दिलीप वळसे व आमदार दिलीप मोहिते हे दोन उमेदवार आहेत. या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणे अधिक योग्य ठरेल. परंतू असे घडेल अशी सुतराम शक्यता वाटत नाही. कारण वळसे व मोहिते यांना विधानसभेतच अधिक रस असून काहीकेल्या त्यांना तालुका सुटतच नाही. दोघेही कातडी बचाव धोरणात प्रविण आहेत. त्यातच दिल्लीची थंड हवा त्यांना मानवेलच, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जर अजित पवांराकडे गेला तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असू शकतात. आणि तसे झाले तर माजी खासदार शिवाजी अढळराव हे शरद पवारांच्या गोटात जाऊन महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेतील. जर भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार असतील. लांडगे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे लढले तर अढळराव अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील आणि यावरच निवडणूकीची रंगत व गंमत ठरेल. कामांच्या बाबतीत विचार केला तर कोल्हेंच्या तुलनेत अढळराव नक्कीच सरस आहेत. तसेच कोल्हे व लांडगे यांच्या तुलनेत अढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांची चांगलीच जाणीव असून जनसंपर्कही दांडगा आहे.
अशीही शक्यता नाकारतां येत नाही की अमोल कोल्हे हे लांडगे यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार असू शकतात. माजी खासदार शिवाजी अढळराव व आमदार महेश लांडगे अशी दुरंगी लढत झाली तर ती चांगलीच अटितटीची होऊ शकते. या मतदारसंघात भाजपने कितीही जोर लावला तरी लढत नक्कीच एकतर्फी होणार नाही.
दुसरीकडे सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात मोहितेंनी ही माझी शेवटची निवडणूक असून यावेळी मला निवडून द्या, अशी अक्षरश: डोळ्यात पाणी आणून मतदारांपुढे मतांसाठी झोळी पसरली होती. आमदार दिलीप मोहिते शब्दाला पक्के आहेत, असे त्यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. त्यामुळे मोहिते आपणच दिलेल्या शब्दाला नक्कीच जागतील, अशी चर्चा आहे. विधानसभेऐवजी लोकसभेला त्यांनी पसंती दिली तर खेडची जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. समजा जर मोहिते आपल्या शब्दाला जागले नाहीत तर मतदार त्यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून देऊन त्यांना डोक्यावरून खाली कधी ‘उतरवतील’, हे त्यांना कळणार पण नाही.
दिलीप वळसे यांचा विचार केला तर ते नेहमीप्रमाणेच दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्याचा सराव करतील. एकीकडे पक्षाचे राज्य पातळीवरचे नेते समजायचे व लोकसभेला शिरूरमधून पळ काढायचा, हे बरं नव्हे. मंत्रीपद व अन्य काही संवेदनशील कारणांसाठी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे तालुक्यातील लोकं धडा शिकवू शकतात, याची वळसेंना चांगलीच जाणीव आहे. त्यातच स्वत:ची ग्रामपंचायत देखील त्यांना राखतां आली नाही. त्यामुळेच ‘झाले गेले गंगेला मिळाले’ या भूमिकेतून वळसे अढळरावांशी जूळवून घेत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या दोघेहीजण जुन्या मैत्रीला उजाळा देत असून त्यांच्यात प्रेमाचा पुन्हा पान्हा फूटू लागलेला आहे. वळसे कदाचित विधानसभेला त्यांच्या मुलीला रिंगणात उतरवून अढळरावांना लोकसभेला मदत करतील. वळसे यांनी मोठे मन दाखवून उमेदवारी स्वत:च्या घरातच न ठेवता एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिली तर ते अधिक योग्य ठरेल. परंतू तालुक्यात आपल्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे, या महत्वकांक्षेतून वळसे यांनी स्वपक्षातील अनेकांचे खच्चीकरण केलेले आहे. माजी खासदार शिवाजी अढळराव, अरूण गिरे व देवदत्त निकम ही काही ठळक उदाहरणे देतां येईल.
असो शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी अढळराव व आमदार महेश लांडगे यांच्यात तिरंगी लढतीचीच अधिक शक्यता आहे.