वांझोट्या विकासाच्या बाता मारणाऱ्यांनो, चाकण वाहतूककोंडी हे तुमचेच ‘अपत्य’

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

मतदारसंघात हजारो कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे छातीठोकपणे दावे करणाऱ्या आमदार दिलीप मोहिते, खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी अढळराव या आजी व माजी लोकप्रतिनिधींना चाकण वाहतूककोंडीवर मात्र वर्षानुवर्षे काहीच उतारा सापडलेला नाही, हे बाकी सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. 

या रस्त्याने प्रवास करणारे हजारो वाचनचालक व प्रवाशी तसेच स्थानिक लोकांच्या मनांत चाकण परिसर वाहतूककोंडीची प्रचंड धास्ती बसलेली आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. या वाहतूककोंडीत अडकणे म्हणजे एकप्रकारचा मानसिक छळ सहन करणे असाच आहे. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या व होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे, याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. वर्षानुवर्षे हे असेच चालू आहे. आणि या समस्येला सर्वस्वी वरील लोकप्रतिनिधीच सर्वार्थाने जबाबदार आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वाहतूककोंडीच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आजपर्यंत फारसे प्रयत्नच केले गेले नाही. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढत गेली. परिणामी वाहनचालक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंधन व पैशांची नाहक नासाडी होत आहे. या वाहतूककोंडीचा फटका कित्येकदा ॲम्ब्युलन्सला देखील बसतो. प्रामुख्याने या वाहतूककोंडीला महामार्गाच्या कडेला तसेच चौकांमध्ये बेशिस्त व मुजोर वाहनचालकांकडून लावली जाणारी वाहने व प्रवाश्यांची अवैध वाहतूक करणारी वाहने देखील जबाबदार आहेत. परंतु या वाहनांवर ठोस कारवाई करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी व कुचकामी ठरत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती गहन होत गेली. 

चाकण वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यात मोहिते, कोल्हे व अढळराव या त्रिकुटाला अपयशच आलेले असून मतदारांनी या तिघांना पुन्हा जनसेवा करण्याची संधी न देतां त्यांना घरीच बसविणे अधिक इष्ट ठरेल. 

आमदार दिलीप मोहिते यांची तर ही शेवटची विधानसभा पंचवार्षिक निवडणूक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांनीच स्वत: ‘ही माझी शेवटची निवडणूक असून मला यावेळी निवडून द्या’ असे आर्जव मतदारांना केले होते. आर्जव करताना त्यांनी आसवांना देखील वाट मोकळी करून दिल्याचा इतिहास खेड तालुक्यातील जनतेने ‘याची देही याची डोळा’ पाहिलेला आहे. 

तसेच अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात केलेल्या प्रचंड प्रमाणातील विकासकामांमुळे मतदार त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा संधी देतील, ही शाश्वती नाही. सदर महोदय नेमके मतदारसंघात कधी येतात व कुठे जातात, याचा काहीच थांगपत्ता शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला कि ज्यांनी या महोदयांना निवडून दिलेले आहे, त्यांना आजपर्यंत लागलेला नाही. हे महोदय फक्त भाषणबाजीतच पटाईत आहेत. कोल्हेंना चांगली संधी मिळूनही त्यांना संधीचे सोने काही करता आलेले नाही की खासदार म्हणून मतदारसंघात अजिबात प्रभाव पाडतां आलेला नाही. एक बोलघेवडा खासदार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. 

तसेच याच महोदयांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी म्हंटले होते की, मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तब्बल ३३ ते ३५ हजार कोटी रूपये मंजूर करून घेतले आहे. 

इतरांचे जाऊन द्या हो, परंतू एकाच पंचवार्षिकमध्ये रेकाॅर्डब्रेक तीन तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळवलेले पुणे जिल्ह्याचे सुपुत्र व पालकमंत्री नामदार अजित पवारांना देखील चाकण वाहतूककोंडीच्या अवघड दुखण्यावर अजून तरी मार्ग काढता आलेला नाही. दुसरीकडे शेजारच्या आंबेगांव तालुक्याचे मंत्रीमहोदय नाम दिलीप वळसे यांचेबद्दल न बोललेलेच बरे. 

भाजपच्या स्व. गिरीष बापट व नाम. चंद्रकांत पाटील या दोघांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेले आहे. तसेच अलिकडच्या काळात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांचे, केंद्रीय मंत्र्याचे दौरे शिरूर लोकसभा मतदारसंघात वाढत चाललेले आहेत. मात्र विकासाच्या ध्यासाने पछाडलेल्या भाजपच्या धुरीणांना देखील अजूनपर्यंत चाकण वाहतूककोंडीच्या समस्येची जाणीव झालेली दिसत नाही. 

एकंदरीतच चाकण वाहतूककोंडीच्या दिर्घकालीन समस्येला सर्वच पक्ष जबाबदार आहेत. 

दरम्यान कागदोपत्री या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी कितीही हजारो कोटींची तजवीज केलेली असूद्या, परंतू प्रत्यक्षात मात्र दृष्टीपटलावर ‘आ’ वासून उभी राहीलेली भयंकर अशी वाहतूककोंडीच पाहावयास मिळते. 

चाकण परिसर हा देशातील एक महत्वाचे औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित झालेले आहे, होत आहे. तरीदेखील विकासाच्या लोणकढी थापा मारणाऱ्या जिल्ह्यातील प्रस्थापित व या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्यांना रस्त्यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यात जराही स्वारस्य नाही. याला सर्वच पक्ष जबाबदार आहेत. ज्याला त्याला फक्त औद्योगिक नगरीतील कंपन्यांमधून विविध प्रकारच्या कामांची ठेकेदारी दडपशाही पद्धतीने मिळविणे व सातबारा निर्माण करणे, यातच अधिक रस राहिलेला आहे. 

विकासाच्या केवळ वांझोट्या गप्पा मारून मतदारसंघातील जनतेला झुलवत ठेऊन आपला व आपल्या जवळच्या सग्यासोयऱ्यांचा, पंटरांचा राजकीय व विविध स्वरूपाचा विकास कसा साधायचा, हेच यांच्या विकासाचे खरे गमक राहिलेले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग व शिक्रापूर-तळेगांव या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे चाकण परिसरात सातत्याने होणारी वाहतूककोंडीची समस्या एकप्रकारे पाचवीलाच पुजलेली आहे. प्रामुख्याने चाकण मधील आंबेठाण चौक ते चिंबळी यादरम्यान खऱ्या अर्थाने वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप या रस्त्याने प्रवास करणारे हजारो वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यातच चाकण तळेगांव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे तसेच वाहनचालक व प्रवाशांचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु या रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. 

या महामार्गाने दररोज प्रवास करणारे हजारो वाहनचालक व प्रवाशी दररोजच्या वाहतूककोंडीला वैतागलेले असून अक्षरश: मेटाकुटीस आलेले आहेत. परंतू हा सर्व शारीरिक व मानसिक त्रास (छळ) सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात आता काहीच नाही. 

गमंत म्हणावी की राजकीय अपरिपक्वपणा म्हणायचा, ज्या लोकप्रतिनिधी व अन्यांना चाकण वाहतूककोंडीची समस्या वर्षानुवर्षे सोडवता आलेली नाही, तेच लोकं आज चाकणपर्यंत मेट्रोचा मार्ग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

एकिकडे रिंगरोडसाठी हजारो कोटींची तजवीज करायची व दुसरीकडे केवळ कागदोपत्री पुणे नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे चित्र रेखाटायचे यातच सत्ताधाऱ्यांना अधिक रस आहे. 

मध्यंतरी चिंबळी येथील गायकवाड वस्ती, बर्गे वस्ती तसेच भारत फोर्ज कंपनी समोर वाहतूककोंडीवर एक प्रभावी उपाय म्हणून अशास्रीय पद्धतीने रस्ता दुभाजक तोडून वाहने महामार्ग ओलांडून अलिकडे पलिकडे जाण्यासाठी जी नस्ती उठाठेव केलेली आहे, त्याने नेमका काय फरक पडला, हे समजावयास मार्ग नाही. एकमात्र नक्की की या उपाययोजनेमुळे वाहतूक सुरळीत न होता उलट वाहतूककोंडीची समस्या अधिकच जटिल बनल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वाहनचालक अचानक दुभाजक ओलांडतात. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होतो. यामुळे अपघाताची शक्यता देखील नाकारतां येत नाही. दरम्यान ज्या कुणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना प्रत्यक्षात अमलांत आणली गेलेली आहे, त्या संबंधित महोदयांचे जाहीर कौतुक निश्चितच केले गेले पाहिजे.