सामाजिक जबाबदारीचे भान असायला हवे…!

lockdown

द्वारा….. अतुल दत्तात्रय काळे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगात मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. मृतांबरोबरच कोरोना बाधितांची संख्या ही दिवसागणिक प्रचंड वेगाने वाढत आहे.
दर्जेदार आरोग्य सेवा असलेले विकसित देशही या विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी व हतबल ठरत आहेत.

प्रामुख्याने इटली, स्पेन, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅण्ड, बेल्जियम, इराण या देशांना कोरोनाचा मोठाच तडाखा बसलेला आहे. या देशांत अतिशय कमी कालावधीत हजारो नागरिकांचे मृत्यू झालेले असून दररोज शेकडो नागरीक मृत्यूला कवटाळत आहेत.

दुसरीकडे भारतात विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या चिंताजनकरीत्या वाढतच आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून रात्रंदिवस मेहनत घेतली जात आहे.
मात्र पाच दहा टक्के लोकांकडून प्रशासनाच्या या मेहनतीला हरताळ फासला जात आहे. परिणामी सामाजिक जबाबदारीचे जराही भान नसलेले असे दिडशहाणे लोक स्वत:सह, स्वत:चे कुटुंब, आजूबाजूंच्या परिसरातील शेकडो नव्हे हजारो लोकांचा जीव जाणूनबूजून धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. असला फालतू आडदांडपणा काय कामाचा?

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने देखील कोरोनापुढे हात टेकले. तेथे आपली काय दशा होईल, याचे भान देखील या लोकांना नसावे? हे जरा अतिच झाले.

पाश्चिमात्य देश व अमेरिका या देशांतील लोकांनी सुरूवातीला जो निष्काळजीपणा केला, तोच आपण जाणूनबूजून करत आहोत. आरोग्य विभागासह सर्व शासकीय यंत्रणा जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहे. त्यांना सहकार्य करण्याची गरज असता, असे आडमुठे लोक एका गंभीर संकटाला आमंत्रण देत आहेत. 

चीनच्या वुहान शहरातील मासळी बाजारात उत्पत्ती झालेल्या कोरोनाचा प्रसार जगातील सर्व खंडातील बहुतांश देशांत झपाट्याने झाला. दररोज हजारोंच्या संख्येने बळी घेणाऱ्या कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.

वरील देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे जी मनुष्यहानी होत आहे, याला संबंधित देशांनी घेतलेला निष्काळजीपणाच अधिक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता चीनमधील वुहान शहरात कोरोनाने ज्या भीषण पद्धतीने शेकडो लोकांचे बळी घेतले, त्याकडे जगातील इतर देशांनी गांभीर्याने न पाहता, दुर्लक्षच करण्याचे काम केले. कारण चीनमधील फैलावलेला कोरोना आपल्या देशांत येणारच नाही, अशीच ठाम समजूत या देशांनी करून घेतलेली होती. आणि याचीच किंमत आज संपूर्ण जगाला चुकवावी लागत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दरम्यान भारतात देखील कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे भारत आज कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. तो अद्याप तिसऱ्या टप्प्यात म्हणजे समूहांमध्ये फैलावलेला नाही. काही तज्ञ मात्र कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याचे सांगत आहेत. याचे कारण म्हणजे ज्यांचा कोरोना बाधितांशी थेट असा कोणताही संबंध आलेला नाही, त्यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. त्यातच मुंबईच्या दाट लोकसंख्येच्या भागात कोरोनाची लागण झालेले रूग्ण मोठ्या संख्येने सापडत असून हे भयावह आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून युद्धपातळीवर केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारतात कोरोनाचा प्रसार एका मर्यादेत असला तरी त्याची वाढ नक्कीच चिंताजनक अशीच आहे.

भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. त्यातुलनेने येथील आरोग्य सुविधा जेमतेमच आहे.
दरम्यान कोरोनाच्या संसर्गाचे प्रभाव क्षेत्र अधिक प्रमाणात वाढू नये, यासाठी संपूर्ण देशातच टाळेबंदी घोषित करावी लागलेली आहे. मात्र कोरोनाच्या भीषणतेची जराही जाणीव नसलेले काही नागरीक टाळेबंदी असूनही मनसोक्त फिरत आहेत. त्यांना संचारबंदीची देखील भीती नाही.
आपल्या अशा या अगोचर व फुगीर वागण्यामुळे आपण प्रशासनाला व एकूणच संपूर्ण समाजालाच एका मोठ्या संकटात ढकलत आहोत, याचे सामाजिक भानही संबंधितांना नसावे, हे धक्कादायक म्हणावे लागेल. त्यामुळे देशांतील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच चाललेली आहे.

बाहेर न जाता घरातच कुटुंबियांसोबत सुरक्षित राहणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, हाच कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे शासनाकडून, प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. तसेच याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. परंतु काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत आहेत. धक्कादायक म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही हवसे, नवसे, गवसे मात्र गावभर, शहरभर फिरण्याची हौस भागून घेत आहेत.

जागतिक स्तरावर विचार केला तर, आरोग्य सेवेत इटली जगात दुसऱ्या क्रमांकावर असूनही तो देश कोरोनाच्या प्रादुर्भावाने हजारोंच्या संख्येने होणारे नागरीकांचे मृत्यू रोखू शकलेला नाही. अमेरीकेमध्ये देखील दररोज शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत असून बाधितांची संख्या लाखोंच्या घरात जात आहे.

त्यातच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘देशात सोशल डिस्टसिंग व अन्य सुविधा जर राबविल्या नसत्या तर २२ लाख लोकांचा मृत्यू होण्याचा धोका होता. परंतु सध्या आपले प्रशासन चांगले काम करत आहे. त्यामुळे कोरोना संकटामुळे एक लाख लोकांचा जरी मृत्यू झाला, तरी प्रशासनाने चांगले केलं असं म्हणावं लागेल.’ अमेरीकेसारख्या देशाच्या प्रमुखाने कोरोनामुळे एक लाख नागरिकांच्या मृत्यू अपेक्षित धरला असेल तर संकट किती गडद आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आरोग्य सेवेच्या बाबतीत विचार केला तर भारत जगात ११२ व्या क्रमांकावर आहे. त्यातच भारताची लोकसंख्या १३० कोटींच्यावर आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही.