भीमाशंकर अभयारण्याची लचकेतोड सुरूच..

bhima nadi

द्वारा….. अतुल दत्तात्रय काळे

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या नावाखाली मंदिर परिसरात विविध विकास कामांच्या माध्यमातून भीमाशंकर अभयारण्याची वाट लावण्याचा प्रकार सुरू आहे.

सर्वात गंभीर म्हणजे भीमाशंकर मंदीराजवळून वाहणाऱ्या भीमा नदीचे पात्र भूमिगत पद्धतीने आखीव रेखीव दगडांमध्ये बांधले जात आहे. यासाठी मंदिराच्या पाठीमागे व खालील बाजूस स्मशानभूमीपर्यंत नदीचे पात्र खोलवर खोदण्यात आलेले आहे.

दरम्यान काही वर्षांपूर्वी मंदिराला खेटूनच असलेल्या भीमा नदी पात्रातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र मोठ्या दगडांमध्ये बांधून भूमिगत करण्यात आले होते. मात्र सध्या देवस्थान परिसर विकास आराखड्याअंतर्गत नदीचे पात्र उकरून जूने पक्के दगडी बांधकाम काढून टाकण्यात आले व त्याजागी नवीन बांधकाम केले जात आहे. मुळातच मोठ्या प्रमाणात खोदाई करून सुस्थितीतील दगडी बांधकाम काढून टाकून त्याजागी नवीन लहान लहान दगडांमध्ये बांधकाम करण्याची गरजच काय होती? या खोदाईमुळे मंदिर व परिसराला धोका पोहचलेला आहे.
कारण हा सर्व भाग अतिपावसाचा म्हणून ओळखला जातो. पावसाळयात येथे धो धो पाऊस कोसळत असतो. पावसाचे पाणी बंदिस्त नदी पात्रात मावत नाही. ते पात्र सोडून वाहते. मंदिर खोल दरीत वसलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मंदिराजवळून पावसाचे पाणी प्रचंड वेगात वाहत असते.

दुसरीकडे मंदिर परिसरात देवस्थानच्या काही विश्वस्तांकडून बेकायदा धर्मशाळेच्या बांधकामासाठी घनदाट वृक्षराजी तोडून जमीन सपाट केली जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलेले आहे. तोडण्यात आलेली झाडे रातोरात गायब केली जात आहेत. अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातच हा सर्व गंभीर प्रकार सुरू असूनही त्याकडे जाणूनबूजन दुर्लक्ष केले जात आहे. तसेच देवस्थानच्याच एका बड्या पदाधिकाऱ्याकडून येथे एक मोठे बांधकाम सुरू आहे.

‘लाॅकडाऊन’मुळे राज्यातच नव्हे तर देशातच बांधकामांवर गदा आलेली आहे. मात्र असे असूनही भीमाशंकर येथे जोरात बांधकामे सुरू आहेत. या कामांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गेल्या आठवड्यात महसूल विभागाचे अधिकारी बेकायदा कामांची पाहणी करण्यासाठी व संबंधितांना नोटीसा देण्यासाठी गेले होते. परंतु त्या लोकांनी अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोटीसा स्विकारण्यास नकार दिला. परिणामी त्या अधिकाऱ्याला नोटीसा न बजावताच माघारी फिरावे लागले.

एकंदरीतच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामे व अन्य बेकायदा बांधकामांमुळे भीमाशंकर मंदिर धोक्याच्या उंबरठयावर उभे आहे.

मुळातच मंदिराच्या आजूबाजूची सर्व जमीन ही खाजगी मालकीची आहे. संबंधित जमीन मालक व महाराष्ट्र शासन यांच्यात या जमीनीच्या मालकी हक्कावरून वाद असून न्यायालयात दावा प्रलंबित आहे. संबंधित बेकायदा जमीन सपाट करणाऱ्या विश्वस्तांचा त्या जमीनीशी काहीही एक मालकी हक्क नाही. असे असूनही वादग्रस्त जमीनीत बेकायदा पद्धतीने बांधकामे कशी केली जात आहेत? या गोष्टींची कल्पना शासनाच्या संबंधित विभागांना वा देवस्थानच्या अन्य विश्वस्तांना नाही असेही नाही. मात्र संबंधितांकडून याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते. गंमत म्हणजे खेड तालुक्याचे तहसीलदार हे भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त आहेत.

दुसरीकडे खेड व आंबेगांव या दोन तालुक्यांचे लोकप्रतिनिधी सर्वस्वी कामगारमंत्री नामदार दिलीपराव वळसे व दिलीपराव मोहिते यांचा देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये समावेश आहे. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे देखील विश्वस्त आहेत. तिघेही आजी माजी लोकप्रतिनिधी कामांच्या बाबतीत ‘कार्यसम्राट’ म्हणून ओळखले जातात. परंतु भीमाशंकर मंदिर परिसरात ज्या काही चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, त्याकडे या लोकप्रतिनिधींचे फारसे लक्ष नाही. कदाचित कार्यबाहुल्यामुळे त्यांना शक्य नसावे. लोकप्रतिनिधींच्या उदासीन व बोटचेपी भूमिकेमुळे चुकीचे कामे करणाऱ्या विश्वस्तांना बळ मिळत आहे.

तसेच वन्यजीव विभागाच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जंगलाच्या या नासाडीची कल्पना असूनही त्यांना या घटनेचे जराही गांभीर्य नाही. अभयारण्याची कितीही नासाडी झाली तरी चालेल, परंतु अभयारण्याच्या संरक्षण व संवर्धनाकडे जराही लक्ष द्यायचे नाही, असा चंगच वन्यजीव विभागाच्या स्थानिक तसेच मुंबई, नागपूर व पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधलेला दिसतो.

भीमाशंकर अभयारण्य हे अतिशय समृद्ध अशा वनसंपदेच्या बाबतीत पश्चिम घाटातील एक महत्वाचा हाॅटस्पाॅट आहे. मात्र याची किंमत वा जाणीव कुणालाच नाही. वन्यजीव विभागाला तर मुळीच नाही. कारण या विभागाला जराही जाणीव असती तर, करोडो रूपये खर्चून
अभयारण्य क्षेत्राची नासाडी करणारी विकासकामे केलीच नसती. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘महादेव वन’. चांगल्या जंगलाचा नाश कसा करायचा, हे महादेव वनाची निर्मिती पाहून लक्षात येते.

अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या विकासकामांमुळे भीमाशंकर अभयारण्याला प्रचंड असा धोका पोहचलेला आहे. हे धोकाग्रस्त अभयारण्य म्हणून ओळखले जाते.

या परिसरातील लोकप्रतिनिधी व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनीच भीमाशंकर अभयारण्याचा गळा घोटण्याचे काम केलेले आहे.

वन्यजीव विभागाने फालतू व अनावश्यक विकासकामांच्या माध्यमातून व केवळ आर्थिक मलिदा मिळावा, म्हणून अभयारण्य क्षेत्रात वन्यजीवांना व जंगलातील विविध वनस्पतींना धोका निर्माण होईल, अशाच पद्धतीने कामे केलेली आहेत.

२०१५ मध्ये एका विश्वस्ताने स्वत:च्या फायद्यासाठी देवस्थानच्या मालकीच्या जुन्या धर्मशाळेच्या काही खोल्या पाडल्या होत्या. याबाबत काही विश्वस्तांनी देवस्थानचे तत्कालीन कार्यकारी विश्वस्त तथा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. नंतर तो विषय दाबण्यात आला.
तसेच सर्वात धक्कादायक म्हणजे मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या कायदेशीर आदेशांची भीमाशंकर न्यासाच्या काही विश्वस्तांनी बुद्धी:पुरस्पर अवज्ञा केल्यामुळे संबंधित दहा विश्वस्त कारवाईस पात्र ठरले होते. दोषारोपपत्र निकालात निघेपर्यंत सर्व दहा विश्वस्तांना निलंबाधिन ठेवण्याची शिफारस आयुक्त कार्यालयातील निरिक्षकांकडून
करण्यात आली होती.
तसेच संबंधित निरिक्षकांनी बेकायदा दानपेटीसह अनेक गैरप्रकारांचा पर्दाफास करून दहा विश्वस्तांचे अनेक कारनामे उघडकीस आणले होते. तरी देखील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान संबंधित विश्वस्तांची लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्याशी नेमकी काय गुतरूत आहे? की एवढा सारा सावळागोंधळ असूनही संबंधित लोकप्रतिनिधी तोंडावर बोट ठेवून मूग गिळून गप्प आहेत? अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थ व भाविकांमध्ये आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी देवस्थानच्या कारभारात लक्ष घालून विश्वस्तांची मनमानी व मुजोरपणा मोडीत काढावा, अशी मागणी होत आहे.

भीमाशंकर मंदिराच्या चोहोबाजुला वरच्या भागात असलेल्या डोंगराच्या उतारावर जिथे जागा मिळेल तेथे ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. विनापरवाना हि बांधकामे करण्यात आलेली आहेत. अनेकांनी तीन तीन मजली पक्की बांधकामे केलेली आहेत. त्यामुळे बांधकामांच्या रूपाने भीमाशंकर येथील हा अवजड भार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. काहीजणांनी तर डोंगर पोखरून थेट डोंगराला लागुनच घरे बांधलेली आहेत. परिणामी डोंगरावरील माती भुसभुशीत झालेली असून झाडांचे मूळ उघडे पडलेले आहेत. झाडांचा आधारच कमजोर झालेला आहे. महत्वाचे म्हणजे याठिकाणी जमिनीत मातीचे प्रमाण अधिक आहे. एका अर्थाने निसर्गावर मात करण्याच्या नादात येथे प्रमाणापेक्षा अधिक मानवी हस्तक्षेप सुरु आहे. या सर्व गोष्टींचा मंदिराला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे त्यावर त्वरित नियंत्रण आणण्याची गरज आहे.