कार्यकर्त्यांना ताकद न देणे व गाफिलपणा नडला.
द्वारा… अतुल दत्तात्रय काळे
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीपराव मोहिते यांनी शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा ज्या पद्धतीने दारुण पराभव केला, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, हे मोहिते यांच्या नेत्रदीपक विजयाने सिद्ध झाले आहे. मुळातच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते यांना सत्तर हजारांपेक्षा अधिक मतदान मिळाले होते. त्यामुळे पूर्वीचे ‘ते’ मतदान ‘पार’ करुन तब्बल सव्वीस हजारांपेक्षा अधिकचे मतदान मिळविणे, हे नक्कीच सोपे नाही. त्यामुळेच मोहितेंचा हा विजय ‘खासमखास’ असाच आहे.
राज्य शासनाविरोधात ग्रामीण भागातील जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी होती, रोष होता, चीड होती, त्याचे प्रतिबिंब मोहितेंच्या या विजयात आहे. विशेषतः भाजपच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, सत्तेचा जो उन्माद, मस्तवालपणा, फाजील आत्मविश्वास व फुगीरपणा आला होता, त्याचा अतिरेक झाला होता. याचा सर्वसामान्य जनतेला प्रचंड तिटकारा आला होता. त्याचेही प्रतिबिंब या विजयात आहे. तसेच पुढील एक हजार वर्षे देशात व राज्यात फक्त आणि फक्त भाजपचीच सत्ता येणार, असाच काहीसा गैरसमज व भ्रम निर्माण झालेला आहे. तो निघण्याची गरज आहे. दरम्यान मोहितेंच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रमुख वाटा असून तो नाकारता येणार नाही.
या निवडणुकीसाठी मोहिते यांनी पाच वर्षांपासून म्हणजेच गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून जोरदार तयारी सुरु केली होती. त्यातच माजी आमदार गोरेंची काम करण्याची पद्धत मोहितेंच्या पथ्यावर पडत गेली. त्यानंतर निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी बेरजेचे राजकारण करत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व गटतट एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कामांच्या बाबतीत विचार केला तर मोहिते हे गोरेंपेक्षा निश्चितच उजवे ठरतात. गेल्या पाच वर्षांत मोहिते यांनी तालुक्यातील जनसंपर्क जराही कमी होऊ दिला नाही. त्यांनी मतदारसंघाची बांधणी चांगल्या पद्धतीने केली. सर्वात महत्वाचे म्हणजे मोहिते यांनी आपल्या सैलभर झालेल्या ‘वाणी’वर बऱ्यापैकी नियंत्रण आणले. त्याचाही फायदा त्यांना झाला.
तसेच ‘ईडी’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राभर प्रचार करुन सत्ताधाऱ्यांविरोधात एकहाती रान तापविले, त्यामुळे पवार यांना मानणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोहिते यांना चांगली साथ दिली. प्रचारादरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ दिसली. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अस्तनीतल्या निखाऱ्यांनी’ गद्दारी केल्याचे दिसून आले. काही जणांनी ‘धनुष्य’ हाती पेलले, तर काही जणांनी ‘कपबशी’ला आधार दिला.
दरम्यान मोहिते यांना तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा मोठी संधी दिलेली आहे. आजही तालुक्यात अनेक मुलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. तीन तीन धरणे असूनही तालुक्यातील मोठी जमीन सिंचनापासून वंचितच आहे. हजारो धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे. तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत निर्माण होऊनही स्थानिक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झालेला नाही. महत्वाचे म्हणजे चाकण येथील वाहतूककोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची गरज आहे. असो.
आपण, खेड तालुक्यातील सर्व जनतेचे लोकप्रतिनिधी आहात. ज्यांनी मतदान दिले ते सर्व मतदार, तसेच ज्यांनी मतदान दिले नाही, ते ही सर्व मतदार, खेड तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे ‘हलक्या कानाचे’ राहून चालणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या निवडणुकीत गावोगावच्या ज्या गणंग व गावाला नकोशा असलेल्या कार्यकर्त्यांमुळे व जवळच्या नातेवाईकांमुळे पराभव झाला होता, अशांना दूर ठेवण्याची गरज आहे. अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’.
‘हि निवडणूक माझी शेवटचीच निवडणूक असेल’ या जनतेला व तमाम पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या वचनाचे विस्मरण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे विस्मरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सकाळी काय खाल्ले हे ही काहींना आठवत नाही. आता तर पाच वर्षांचा प्रदीर्घ काळ जाणार आहे. एवढीच माफक अपेक्षा इच्छूक मंडळी व्यक्त करत आहेत. असो.
शिवसेनेच्या सुरेश गोरे यांना ‘ठरवून’ पाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी शेजारच्या मतदारसंघातून मोठे सहकार्य करण्यात आले होते. तसेच भाजपचा बंडखोर ज्या पूर्ण क्षमतेने युती धर्माला तिलांजली देऊन उभा करण्यात आला, ती गोरेंना पाडण्याची पहिली पायरी होती. भाजपचे कार्यकर्ते उघडउघड बंडखोराचा प्रचार करत होते. बंडखोर चालवा, असाच संदेश संबंधितांना ‘वरच्या’ पातळीवरुन देण्यात आला होता, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. एकंदरीतच काहीही करुन गोरेंना पाडायचेच होते, यासाठी तालुक्याबाहेरची (शेजारची) मंडळी अधिक प्रयत्नशील राहिली. याचा अंदाज गोरेंना आलाच नाही. ते गाफीलच राहिले.
असे असले तरी ‘मिळालेल्या चांगल्या संधीचे सोने करताच आले नाही’ असेच माजी आमदार सुरेश गोरे यांच्या बाबतीत म्हणता येईल. गोरे हे पाच वर्षे एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्यांसारखेच वागले. कुणाला पटो अथवा न पटो. परंतू गोरेंनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेले आहे. गोरे हे शांत स्वभावाने आहेत. मात्र राजकारणात शांत असून जमत नाही. शांत असले तरी ‘थंडपणा’ असावा लागतो. गोरे हे पूर्वाश्रमीचे शरद पवार व आमदार दिलीप वळसे यांचे ‘राजकीय शिष्य’ असूनही त्यांचे राजकीय गुण फारसे आत्मसात करता आले नाही, असेच म्हणावे लागेल.
मुळातच राजकारणात ‘अरे ‘ रा ‘कारे’ म्हणायचेच असते. सेनेत व सत्तेत असूनही गोरेंना आक्रमकपणा दाखवता आला नाही. आमदार झाल्यानंतर गोरे यांच्या आजुबाजुला जो कोंडावळा निर्माण झाला होता, त्यातून त्यांना बाहेरच येता आले नाही. निवडून गेल्यानंतर फारच कमी दिवसांत त्यांनी मुळच्या शिवसैनिकांना सोडले. मदत करणाऱ्या व अडचणीतील कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते, बळ द्यायचे असते, रात्र अपरात्री त्याच्यासाठी धावून जायचे असते, लागेल ती मदत द्यायची असते, यात गोरे कमी पडले. विशेषतः महसूल व पोलिस ठाण्यासंबंधी प्रकरणांमध्येच कार्यकर्त्यांना व जवळच्या लोकांना खरी मदत लागत असते. लोकप्रतिनिधींकडून चुकीच्या कामांची अपेक्षा ठेवणे पण चुकीचे आहे. परंतू योग्य व कायदेशीर कामांसाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करायचाच असतो. हे गोरेंना जमलेच नाही. सर्वसामान्य लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा देखील फार नसतात. त्यांच्या पाठीशी उभे राहायचे असते. यात गोरे कमीच पडले. याबाबतीत नवनिर्वाचित आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. मुळातच गोरे यांचे सल्लागार मंडळ जमीनीवर काम करणारे नव्हते. स्वतः गोरे हे एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यांसारखे कागदोपत्री काम करण्यातच अधिक गुंतले. गोरेंना राजकीय प्रवाहात टिकायचे असेल, पुन्हा उभारी घ्यायची असेल तर, कष्टाची तयारी ठेवावीच लागेल.
या निवडणुकीत गोरे निवडून आले असते तर आज त्यांना मोठी संधी मिळाली असती. माजी खासदार शिवाजीराव अढळरावांना खेड तालुक्यात पिछाडी मिळूनही गोरेंना परिस्थितीची कल्पना आली नाही. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आमदार दिलीप मोहिते हे जसे स्वतः जबाबदार आहेत, तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला स्वतः सुरेश गोरेच जबाबदार आहेत.
सुरेश गोरे यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘आजी’ चा ‘माजी’ झाला व ‘माजी’ चा ‘आजी’ झाला.