खरा सामना गोरे व मोहिते यांच्यातच. देशमुख ‘जायंट किलर’ ठरणार?

election assembly

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे व राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यातच होत आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी बंड करुन उमेदवारी कायम ठेवल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे. एक मात्र नक्की की, देशमुख यांच्या उमेदवारीमुळे गोरे व मोहिते यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. देशमुखांना भाजपनेच बळ दिले असल्याचीही चर्चा आहे. एकंदरीतच मुकाबला तगडा होणार आहे. आमदार गोरे व त्यांच्या समर्थकांना वाटते तेवढी ही लढत सोपी नाही. गोरे व त्यांच्या कामाबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी असल्याचे दिसून येते.

दरम्यान तालुक्यातील काही सुज्ञ व जेष्ठ मतदार, व्यापारी व व्यावसायिक यांच्या बोलण्यात असेही दिसून येते की, ज्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे, कामाचा, सर्वसामान्य लोकांच्या हिताचा, भविष्याचा विचार केला तर एकही जण योग्य नाही. परंतू यापैकीच एकजण निवडून येणार आहे.  

‘आता नाही तर पुन्हा कधीच नाही’ या भूमिकेतून देशमुख मैदानात उतरले आहेत.

दर विधानसभा निवडणुकीपूर्वी खेड तालुक्यात संधीसाधू राजकिय वंचितांचा एक गट विद्यमान आमदारांविरोधात उभा राहत असतो. आमच्यापैकी कुणालाही एकाला उमेदवारी द्या, पण पुन्हा विद्यमान आमदाराला नको, हेच तुणतुणे संबंधितांकडून पक्षाच्या वरिष्ठांकडे वाजविले जाते. याही वेळेस काही जणांनी ते वाजवून पाहिले. परंतू उपयोग झाला नाही. 

मुळातच हि जी काही वंचितांची आघाडी आहे, त्यांचा तरी एकमेकांवर विश्वास आहे का? आणि याचे उत्तर नाही असेच आहे. यातीलच काही जणांनी अपक्ष उमेदवार देशमुख यांना थेट किंवा पडद्याआडून पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या वंचित हिंदोळ्याचा देशमुख यांना कितपत फायदा होतो, हे निवडणुकीनंतर कळेलच. देशमुख यांनी संबंधितांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. शेवटी ही मंडळी कुणाचीच नाही. स्वतःच्या फायद्यासाठीच ही मंडळी एखाद्याला घोड्यावर बसवितात. मुळातच तालुक्यात देशमुख यांना मोठा सुप्त विरोध आहे. विशेषतः तरुणांच्या पाठिंब्यावर ते विधानसभेची स्वप्न पाहत आहेत. देशमुख यांनी जरा दमानं घेऊन २०२४ ला विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी केली असती तर राजकीयदृष्ट्या ते अधिक बरे ठरले असते

सर्वात महत्वाचे म्हणजे देशमुख यांचे सहकारी असलेले जिल्हा परिषद सदस्य हे युती धर्म न पाळता त्यांच्यासोबत असले तरी मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांची कितपत साथ मिळते, हे पाहणे मोठ्या गमतीचे ठरणार आहे. कारण प्रत्यक्षात संबंधित महोदयांचा राजकिय पूर्वइतिहास बघितला, तर ते देशमुख यांना साथ देतीलच हे सांगणे खरोखरच अवघड आहे. शेवटी ते अजित पवार यांचे चेले आहेत. राष्ट्रवादीत असताना त्यांनी दिलीप मोहिते यांच्या विरोधात काय काय प्रताप केलेले आहेत, हे मोहितेंइतके कुणाला चांगले ठाऊक असणार? पक्षांतर्गत वरचढ होणाऱ्याला पायात पाय घालून पाडणे, वरिष्ठांचे कान भरविणे, कुरघोडया करणे, यात त्यांचे कर्तृत्व वाखावण्याजोगे आहे. तालुक्यात त्यांना अजिबात राजकीय विश्वासार्हता नाही. भाजपला आज सुगीचे दिवस आहेत, सत्ता आहे म्हणून ते भाजपवासी झालेले आहेत. यदाकदाचित भविष्यात भाजपचे जहाज बुडायला लागले, तर ते राष्ट्रवादीत जाणारे सर्वात पहिले असतील. असो. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. पाच वर्षे त्यांनी जनसंपर्क न तोडता लोकांमध्येच राहिले. त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केलेली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्याच फटकळ स्वभावामुळे नाराज झालेले काही गटतट, कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र असे असले तरी सर्वचजण मनापासून त्यांचे काम करतील ही शाश्वती नाही. कारण मोहिते पुन्हा एकदा आमदार झाले तर ते त्यांच्याशी जुळवून घेतलेल्या सर्वांशी प्रेमाने व सौहार्दतेने वागतील हि शक्यता फार अंधूकशी आहे. मोहिते जुने सर्व हिशोब चुकवून आपला मूळ स्वभाव सोडणार नाहीत, अशीही भीती संबंधितांना वाटत आहे. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर, दहा वर्षांच्या कार्यकाळात मोहितेंना देखील तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यात अपयशच आलेले आहे. स्वतःचे जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते मोठे करण्यात मोहितेंनी धन्यता मानलेली आहे. मोहितेंचे जवळचे नातेवाईक व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तालुक्यात चांगलीच मस्ती केलेली आहे. मोहिते निवडून आले तर ही मस्तीखोर पिलावळ पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश गोरे यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय मोहिते विरोधकांनी जी साथ दिली होती. त्यापैकी कितीजण आता त्यांच्यासोबत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे. पाच वर्षांत त्यांना माणसे सांभाळता आलेली नाहीत. कामांच्या माध्यमातून देखील त्यांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांनी कोट्यावधी विकासकामांची जी पत्रिका प्रसिद्ध केलेली आहे, त्या पत्रिकेची चिरफाड केली तर नेमके व खरे वास्तव समोर आल्याशिवाय राहणार नाही.

ज्या लोकप्रतिनिधीला स्वतःच्या घरासमोरील रस्ता पाच वर्षांत निट करता आला नाही, यातच सर्व काही आले. 

गंमत म्हणजे चाकण येथील आंबेठाण चौक ते वांद्रे या रस्त्याची काय दुर्दशा झालेली आहे? याची जाणीव कोणत्याच पक्षाला वा लोकप्रतिनिधीला नाही व होणार ही शक्यताही दिसत नाही. विद्यमान आमदार व पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुरेशराव गोरे यांचे स्वतःचे घर व जनसंपर्क कार्यालय, याच रस्त्यावर आहे. दुसरे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते यांना देखील स्वतःच्या कारखान्यात जाण्या येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तिसरे उमेदवार व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचे गांव देखील याच रस्त्यावर आहे. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे यांचे गाव देखील याच रस्त्यावर आहे.

डोंगराएवढया विकासाच्या थापा मारणाऱ्या या लोकप्रतिनिधींना स्वतःच्या गावाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करता येत नसेल तर हि मंडळी कोणत्या तोंडाने जनतेकडे मतांचा जोगवा मागत आहेत?