शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनता परिवर्तनाच्या ‘मूड’ मध्ये. .??

amol kolhe 3

By अतुल दत्तात्रय काळे..

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यापूर्वी तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या दौऱ्यात देखील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मोठा प्रतिसाद दिला होता. उत्तरोत्तर या निवडणुकीची रंगत वाढतच चाललेली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव व डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. आढळराव यांच्या तुलनेत कोल्हे यांच्या गावभेट दौऱ्याला मतदारसंघात सर्वत्र मिळणारा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सध्यातरी कोल्हे यांचे पारडे निश्चितच जड झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. यापूर्वीच्या लोकसभेच्या झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये आढळराव यांच्या मतदारसंघातील गावभेट दौऱ्यांना, सभांना नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. ग्रामस्थ आढळराव यांची गावात येण्याची वाट बघत थांबायचे. सर्वच घटकांनी आढळराव यांच्यावर प्रचंड प्रेम केले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे आढळराव यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता. माझ्यापुढे कोणत्याच विरोधकांचा टिकाव लागू शकत नाही. माझ्याशिवाय या मतदारसंघात दुसरा कोण वाली आहे? या घमेंडीतच ते राहिले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित होईपर्यंत त्यांचे पायच जमिनीवर नव्हते.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतील अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषित झाल्यानंतरही आढळराव यांनी त्यांची टवाळी करण्याचेच काम केले. आढळराव थेट कोल्हे यांच्या जातीवरच घसरले. तीन वेळा खासदारकी उपभोगलेल्या आढळराव यांच्याकडून जातीचा उल्लेख लोकांना मान्यच झाला नाही. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सध्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वात महत्वाची जाणवणारी गोष्ट म्हणजे, अमोल कोल्हे यांना शेतकरी, सर्वसामान्य जनता विशेषतः महिला वर्षांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत कमालीचा फरक दिसत आहे.

चौकार मारण्याची जोरदार तयारी केलेल्या आढळरावांसाठी हे अनपेक्षित आहे. जे प्रेम आढळराव यांना जनतेकडून मिळत होते, त्याच प्रेमाचा वर्षाव आता अमोल कोल्हे यांच्यावर होत आहे. आढळरावांची क्रेझ, त्यांच्या भोवतालचे वलय कमी कमी होत आहे. याउलट कोल्हे यांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या गावभेट दौऱ्यांत स्थानिक महिला वर्ग, तरुणांची उपस्थिती लक्षणीय असते. त्यातुलनेत बहुतांश ठिकाणी आढळरावांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ग्रामस्थच गोळा होत नाहीत. आणि ही वस्तुस्थिती आहे. अनेक गावांमध्ये ग्रामस्थ आढळरावांना आमच्या गावांमध्ये काय विकासकामे केली? असा जाहीर सवाल करून पंधरा वर्षांचा हिशोब मागत आहेत. एकंदरीतच वारे उलट्या दिशेने वेगाने वाहत आहे. किंबहुना याची प्रचिती आढळराव व सेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मनोमन झाली असेल. त्यामुळे सेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. आणि याच उद्विग्नेतून कोल्हे यांच्यावर विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या पातळीवर टिका केली जात आहे.