बोटा येथील हॉटेल अपूर्व कामत समोरील दुभाजक तातडीने बंद करण्याची मागणी.
अपघाताला निमंत्रण देणारा पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर) गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल अपूर्व कामत समोर धोकादायक पद्धतीने खुला केलेला रस्ता दुभाजक घालून तातडीने बंद करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे. पुणे-नाशिक दरम्यान दररोज हजारो लहान मोठी वाहने धावत असतात.
बोटा गावाच्या हद्दीत नाशिकच्या बाजूला महामार्गाला खेटुनच अपूर्व कामत हे मोठे हाॅटेल आहे. संबंधित हॉटेल हे एका राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तीचे आहे. या हाॅटेल समोरच महामार्गावरील दुभाजक काढून नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जाणारी वाहने हाॅटेलकडे जाण्यासाठी रस्ता वळविण्यात आलेला आहे. संबंधित व्यावसायिकाचा थेट आर्थिक फायदा व्हावा, याच हेतूने दुभाजक काढून टाकलेला असल्याची चर्चा आहे. परंतु या व्यावसायिकाच्या आर्थिक हितापायी महामार्गाने वेगाने जाणाऱ्या इतर वाहनांना गंभीर अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारे अनेक वाहनचालक नाष्टा वा जेवण करण्यासाठी संबंधित हॉटेल समोरील महामार्ग ओलांडून हाॅटेलकडे वाहने वळवतात. तसेच जेवण आटोपल्यावर वाहनचालक पुन्हा महामार्ग ओलांडून पलिकडे पुण्याकडे वळतात. दरम्यान चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडणाऱ्या संबंधित वाहनांमुळे दोन्ही बाजूंची म्हणजेच पुण्याहून नाशिककडे व नाशिकहून पुण्याच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या इतर वाहनांना गंभीर धोका निर्माण होतो. महामार्ग ओलांडून हाॅटेलकडे जाणारी व हॉटेलमधून बाहेर अचानक महामार्गावर येणाऱ्या वाहनांमुळे महामार्गाने वेगाने जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडतो. यावेळी दुर्दैवाने एखादा अपघात झाला, तर तो वाहनचालक व वाहनांमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे याठिकाणी दुभाजक टाकून धोकादायक पद्धतीने खुला केलेला रस्ता कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
