ऊसाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछडयांचा होरपळून मृत्यू.

bibate

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे उसाला लावलेल्या आगीत बिबट्याची पाच बछडे होरपळून जागीच मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज सकाळी (दि, ३) आठ वाजण्याच्या सुमारास घडली. साधारणतः एक महिन्याची किंवा त्यापेक्षा कमी दिवसांची ही बछडे असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत एका वनकर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अवसरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळच्या वेळी ऊसतोडणी कामगार ऊस तोडणीसाठी आले होते. या ऊसाच्या शेतात मादी बिबट्या आपल्या पाच पिल्लांसह वास्तव्यास होती. ऊसतोडणी करण्यापूर्वी तेथे घोणस जातीचा साप दिसल्यामुळे कामगारांनी ऊस तोडण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर कामगारांनी ऊस पेटवून दिला. आगीच्या भीतीने मादी बिबट्या समोरील ऊसाच्या शेतात पळून गेली. परंतु बिबट्याचे पाच बछडे आगीच्या मोठ्या ज्वालांमुळे स्वतःचा जीव वाचू शकली नाही. व आगीत होरपळून पाचही बछडयांचा जागीच मृत्यू झाला.
सापाच्या नावाखाली बिबट्याच्या भीतीनेच ऊसाला आग लावली तर नाही ना? याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

ऊसामध्ये गवत वाढलेले होते. तसेच सदर ऊसामध्ये कामगारांना साप दिसला होता. त्यामुळे ऊस पेटवून दिला. या आगीमुळे बिबट्याच्या पाच बछडयांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचे खरे कारण शोधले जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. तपास चालू असल्यामुळे सध्या याबाबत अधिक बोलणे योग्य नाही. तसेच या परिसरात यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडलेल्या नाहीत.

प्रज्योत पालवे ( वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर)

या दुर्दैवी घटनेला वनविभागच दोषी असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच खेड, आंबेगांव व जुन्नर तालुक्यात सर्वत्र वणवे लावले जात आहेत. परिणामी वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळेच बिबट्यासारख्या प्राण्याला मनुष्यवस्तीचा, ऊसक्षेत्राचा आधार घ्यावा लागत आहे.

पै. बाळासाहेब चौधरी ( सामाजिक कार्यकर्ते).