खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वणवे लावण्याच्या प्रकारात वाढ.

vanava

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जंगलांना आगी लावण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. परिणामी वनसंपदेची अपरिमित हानी होत आहे. पाळीव जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी डोंगरांना वणवे लावल्यानंतर पावसाळ्यात अधिक चांगल्या प्रमाणात नवीन गवत उगवते, असा समज स्थानिक नागरिकांमध्ये प्रचलित आहे. त्यातून या घटना घडतात.  

दरम्यान जंगलाना लावलेल्या आगींमुळे वनसंपदेचे, लहानमोठ्या वन्यजीवांचे किती भयंकर नुकसान होते, याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी जंगलांजवळ राहणाऱ्या लोकांना वनविभागाने विश्वासात घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.  

नुकतीच औंढे येथे वणवा विझवताना चाकण वनपरिक्षेत्राचे दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यांची प्रकृती चांगली आहे. उन्हातान्हात तसेच रात्रीच्यावेळी जीव धोक्यात घालून वनकर्मचारी व वनमजूर आगी विझविण्याचे काम करतात.

गेल्यावर्षी भोर येथे आग विझविताना गंभीर भाजल्याने एक वनमजूर मृत्यूमुखी पडला होता. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील वनकर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने अधिक साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे वातानुकूलित कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्यांना या वस्तुस्थितीची जाणीव नसते. त्यातच काही स्थानिक अधिकारी देखील वनसंवर्धनाकडे व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

मालकी बरोबरच वनविभागाच्या राखीव जंगलाना देखील आगी लावल्या जातात. मालकीत लावलेली आग वनविभागाच्या जंगलात पसरू नये, म्हणून वनकर्मचारी अधिक सतर्क होऊन आग विझवतात. हवेमुळे आग अधिक पसरते. त्यातच उलट्या दिशेने हवा वाहत असेल तर आग विझविणे खुपच धोकादायक असते. आगीचा मोठा फटका जंगलातील वन्यजीवांना बसून त्यांचा निवारा नष्ट केला जात आहे. या आगींमध्ये असंख्य लहान मोठ्या वन्यप्राण्यांना नाहक जीव गमवावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी वणवे लावले जातात. परंतु डोंगरांना आगी लावण्याचे हे एक प्रमुख कारण असले तरी बहुतांश ठिकाणी जाणूनबुजून आगी लावल्या जातात.

दरवर्षी वणव्यांमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील जंगल खाक होत आहे. खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ असून अनेक गावांच्या हद्दीत वनविभागा बरोबर मालकीचे डोंगर आहेत. मालकीच्या अनेक डोंगरांवर देखील मोठ्या प्रमाणात वृक्षराजी अस्तित्वात आहे. दरम्यान आजची परिस्थिती अशी आहे कि बहुतेक सर्व मालकीचे डोंगर तालुक्यातील तसेच बाहेरच्या व्यावसायिकांनी व धनदांडग्यानी विकत घेतलेले आहेत. परंतु गेल्या काही वर्षात अनेक गावांच्या हद्दीतील घनदाट वृक्षराजी असलेले हे डोंगर सध्या ओसाड झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. पद्धतशीरपणे या डोंगरांना आगी लावून वृक्षराजी जाळून टाकण्यात आलेली आहे. आजही पश्चिम भागात काही ठिकाणी डोंगर पोखरून तसेच वृक्षराजी जाळून जमीन सपाट केली जात आहेत. धक्कादायक म्हणजे भिमाशंकर अभयारण्याच्या लगतच्या गावांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जंगलातील प्राण्यांना हुसकावून लावून त्यांची शिकार करण्यासाठी काहीजण डोंगरांना आगी लावतात. वणव्यातून जीव वाचवण्यासाठी हे प्राणी सैरावैरा मार्ग दिसेल तिकडे धावतात व शिकारी टोळ्या या गोष्टींचा फायदा घेऊन पळणाऱ्या प्राण्यांच्या हत्या करतात.