खेडच्या पूर्व पट्ट्यात तीव्र पाणीटंचाई सुरु
खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त ५ गावे व ४३ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाच टँकरच्या माध्यमातून सध्या पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. दरम्यान २ गावे व २१ वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे टँकर सुरु करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात आलेली आहे. यापैकी काही प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले असून ते मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काही ठिकाणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची अद्याप संयुक्त पाहणी होणे बाकी आहे. पाहणी झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल. जास्त विचारमंथन न करता तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणी संबंधित टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यातच वरुडे व कन्हेरसर येथे पाण्याचे टँकर सुरु करण्यात आलेले आहेत. यावरून या भागातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात येते.
खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील एकुण ७ गावठाण व ६४ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे १६ हजार नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. पाण्याअभावी जनावरांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. पाणीटंचाई असलेल्या भागातील पाण्याचे स्त्रोत आटू लागलेले असून अनेक तलाव कोरडे पडलेले आहेत. विहिरींनीही तळ गाठलेला आहे. दरम्यान सध्या ज्या ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तेथे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
प्रामुख्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कन्हेरसर, वरुडे, पूर, चिंचबाईवाडी, वाकळवाडी, गाडकवाडी, गुळाणी, वाफगावचा काही भाग, जरेवाडी तसेच पश्चिम भागातील वाशेरे गावठाण व वाड्या-वस्त्या, चासकमान धरणांतर्गत असलेल्या काही वाड्या-वस्त्या, वाडा गाव परिसरातील सुपेवाडी व आदी ठिकाणी दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य तीव्रतेने जाणवते. किंबहुना या ठिकाणी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे. पिढ्यानपिढ्या या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जी गावे व वाड्या वस्त्यांवर दरवर्षी भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होते, ती सर्व उंचावर वसलेली आहेत. पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भाग हा पर्जन्यछायेत मोडतो. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. याउलट पश्चिम भागात जास्त पाऊस पडूनही बहुतांश ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होते. कारण उतारामुळे पाणी खाली वाहून जाते. याचमुळे प्रचंड पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात मोठी तफावत दिसून येते.
विकासाची टिमकी कशासाठी? खेड तालुक्यात शेकडो, हजारो कोटी रुपये खर्चून डोंगराएवढी विकासकामे केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जाते. मात्र तरीदेखील तालुक्यातील पाणीटंचाईचे निर्मूलन करण्यात लोकप्रतिनिधींना अपयशच आलेले आहे. खर्च केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या झिरप्यातूनही पाणीटंचाईचे सावट दूर झाले असते. परंतु तेवढी इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींकडे नाही. सध्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विकासाची शिरुर भरारी घेणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव यांची ‘शाश्वत आणि सर्वंकष’ विकासासाठी राबणारा’ विकासाचा विचार करणारा लोकप्रतिनिधी म्हणून जाहिरातबाजी केली जात आहे. खासदार महोदयांकडून विकासाच्या मोठमोठ्या थापा मारल्या जात आहेत. तरीदेखील तालुक्यातील पाणीटंचाई का दूर होऊ शकली नाही? याचे उत्तर टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांना दिले पाहिजे.