malin

संग्रहित छायाचित्र

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे

माळीण…  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम अशा पश्चिम डोंगराळ भागात घोड नदीच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले चिमुकले गाव. माळीण गावाचा संपूर्ण परिसर हा दऱ्या खोऱ्यांनी व्यापलेला असून या गावाला सात वाड्यावस्त्या आहेत. यामध्ये चिंचेवाडी, पोटेवाडी, उंडेवाडी, झांजरेवाडी, पसारवाडी, लेंभेवाडी आणि कोकणेवाडीचा समावेश आहे. काही वाड्या डोंगरावर, तर काही वाड्या डोंगर पायथा आणि डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या आहेत. हा सर्व भाग आदिवासी बहुल आहे. तसे पाहिले तर बाह्यजगापासून काहीसा अलिप्त असलेला हा भाग आहे. २०११ च्या जनगणनेनुसार माळीण आणि सात वाड्यावस्त्यांची लोकसंख्या हि ७०४ इतकी होती. पैकी १८१ लोकसंख्या हि बाधित झालेल्या माळीण गावठाणाची आहे.

हे गाव डिंभे धरणापासून आहुपे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण पंचवीस किमी इतक्या अंतरावर आहे. या गावाला जाण्यासाठी डिंभे धरणांतर्गत धरणाच्या अगदी कडेकडेने असलेल्या रिंगरोडने जावे लागते. अडिवरे गावाच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला माळीण फाटा आहे. या फाटयापासून साधारणतः अर्धा किमी अंतरावर डोंगराच्या मध्यभागी उंचावर माळीण गावठाण वसलेले होते. या ठिकाणी जाण्यासाठी ओढ्याच्या कडेने पक्का डांबरी रस्ता आहे. ज्या ठिकाणी हे गाव वसलेले होते, त्याच्या उशाला म्हणजे दक्षिणेला खेटूनच चारशे ते पाचशे फुट उंचीची डोंगररांग असून गावाच्या खाली तीव्र उतारावर पश्चिमेकडून वाहत आलेला एक मोठा ओढा आहे.

गेल्या अनेक वर्षापासून अतिशय शांततेने व गुण्यागोविंदाने नांदत असलेले या गावातील गरीब ग्रामस्थ नेहमीच तत्परतेने एकमेकांच्या सुखदुखात सहभागी व्हायचे. तसेच अनेक लहान मोठ्या अडचणींशी, संकटाशी सामना करत, संघर्ष करत जगत होते. हा भाग अतिपर्जन्यवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. या लोकांनी प्रत्येक पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड प्रमाणातील पर्जन्यवृष्टीची कधीही फिकीर केली नाही. कोणत्याही त्रासाची, अपेक्षांची पर्वा न करता धो धो पाऊस अंगावर झेलत शेतातील व इतर कामे करुन आपला उदर्निवाह करायची. परंतु नियतीच्या मनात वेगळेच आक्रीत घडत होते. पाच वर्षीपूर्वीची तीस जुलैची सकाळ मात्र या लोकांच्या जीवनातील अखेरची सकाळ ठरली गेली व त्यांच्या जगण्यासाठीचा तीव्र संघर्ष कायमचाच संपला. ज्या डोंगराच्या कुशीत माळीणचे ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या अगदी बिनधास्त राहत होते, झोपत होते, तोच डोंगर कधीकाळी त्यांचा कर्दनकाळ ठरेल? हे या लोकांच्या ध्यानीमनीही नव्हते.

मात्र पाच वर्षापूर्वी तीस जुलै या दिवशी बुधवारी सकाळी आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास डोंगराची एक भली मोठी दरड या गावावर कोसळली आणि संपूर्ण गावच दरडीखाली गाडले गेले. हि घटना मानवनिर्मित कि निसर्गनिर्मित होती ? असे काहीजणांनी वादही घालून पाहिले. परंतु या वादात काहीही तथ्य नव्हते. कारण एका क्षणात चिमुकले असे माळीण गाव जगाच्या नकाशावरून कायमचे पुसले गेले होते. हि वस्तुस्थिती पचविणे सोपे नाही.

आजही तो दिवस आठवला कि प्रत्येकाच्या अंगावर काटे उभे राहतात. हि दुर्दैवी दुर्घटना घडण्यापूर्वी तीन दिवस या भागात प्रचंड पाऊस कोसळत होता. दरवर्षीच पडणाऱ्या प्रचंड पावसाची सवय अंगवळणी पडल्यामुळे या गावातील लोकांना सुरवातीला याचे काहीही विशेष वाटले नाही. ते त्यांच्या दररोजच्या कामात व्यस्त होते. मात्र दुर्घटनेच्या आदल्या दिवसी रात्री तसेच मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता. जणू ढगफुटीसारखा भास होत होता. त्यामुळे काहीतरी अघटीत घडते कि काय? अशी शंकेची पाल जेष्ठांच्या मनात चुकचुकली होती. मात्र तिची भीषणता एवढी भयानक असेल? याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती. दुसरीकडे अतिपावसामुळे भात शेती वाहून जाण्याची भीतीही या लोकांना रात्रभर सतावत होती. परंतु पावसामुळे ग्रामस्थ घरातच होते. दिवस उजाडण्याची वाट पाहत होते. त्यामुळे दिवस उजाडल्या उजाडल्या राहवले नाही म्हणून काहीजण भातखाचरे पाहण्यासाठी आपल्या शेताकडे गेले. काही तरुण ओढ्याचे व नदीचे पाणी पाहण्यासाठी गेले. महिला घरातच कामात मग्न होत्या. लहान मुले झोपलेली होती.

सकाळी सकाळी आवराआवर करीत असतानाच अचानक सव्वा आठच्या सुमारास प्रचंड आवाज होऊन डोंगराची एक दरड या गावावर कोसळली. यामध्ये दगड, माती, व गाळाचे प्रमाण जास्त  होते. गाळ व मातीच्या वेगामुळे आधार निसटलेली डोंगराच्या उतारावरील झाडेही खाली आली. जणू चिखल पाण्याचा लोंढा विद्युतवेगाने या गावावर कोसळला. आणि याखाली गाव दबले गेले. ज्या ठिकाणी गाव होते, त्या ठिकाणी माती व गाळाचा प्रचंड मोठा जाड थर दिसत होता. काही क्षणापूर्वी येथे गाव अस्तित्वात होते, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. हा सारा घटनाक्रम इतक्या वेगाने घडला कि जीव वाचवण्याची संधीच कुणाला मिळाली नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झाली.

या दुर्घटनेमध्ये ४४ कुटुंबातील १६० लहान मुले, महिला, तरुण व पुरुष ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी ९ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले व १५१ व्यक्ती मयत झाल्या. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या १५१ पैकी १४६ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. उर्वरित पाच व्यक्तींचे केवळ अवयवच सापडले. सापडलेल्या विविध अवयवावरून पाच मृतांची संख्या ठरविण्यात आली. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या अधिक होती. या दुर्घटनेत एकूण २८ शालेय विद्यार्थी मयत झाले. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांची संख्या हि २२ इतकी होती. ढिगाऱ्याखालून निघणारे अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडच्या स्थितीत होती. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी एकूण ३४ मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात आली. पैकी पाचच मृतांची ओळख केस, हाडे व नखांद्वारे पटविण्यात यश आले. यामध्ये तीन स्त्रिया व दोन पुरुषांचा समावेश होता. उर्वरित २९ मृतांची ओळख पटविणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेत एकूण १३२ जनावरे मृत झाली. दुसरीकडे या दुर्घटनेत केवळ जिल्हा परिषदेची शाळा, शासकीय दवाखाना आणि सात आठ घरे वाचलेली आहेत. एकेकाळी या ठिकाणी माळीण गाव अस्तित्वात होते, याची साक्ष या वस्तू देत उभ्या आहेत. प्रशासनाने संपूर्ण गावच सील केल्यामुळे या ठिकाणी कुणीही राहत नाही. बाधित लोकांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था माळीण फाट्यावर करण्यात आली होती.  

दरम्यान माळीण पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमडे या गावाच्या हद्दीतील आठ एकर जागेत माळीण ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्मार्ट ग्राम’ माळीणचे लोकार्पण करण्यात आले होते. पंरतु त्याचवर्षीच्या पावसाळ्यात स्मार्ट ग्राम माळीण मध्ये झालेल्या निकृष्ट व दर्जाहीन बांधकामांचा फोलपणा उघड झाला होता.

कितीही नाही म्हंटले तरी गावातील वाचलेल्या लोकांना या घटनास्थळावरूनच त्यांच्या शेतांकडे जावे लागते. तसेच या गावाच्या पलीकडे काही वाड्या देखील आहेत. या वाड्यांमधील ग्रामस्थ माळीण गावठाणातूनच आपल्या वस्त्यांकडे जातात. या दुर्घटनेत बळी पडलेल्या स्वकीयांच्या आठवणी काढण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही नाही.                                                        

धोकादायक पसारवाडी? माळीण गावठाणाच्या पलीकडे पश्चिमेला उंच डोंगराच्या मध्यभागी पसारवाडी वसलेली असून या ठिकाणी वीस ते बावीस कुटुंबे राहतात. ज्या दिवशी माळीणवर दरड कोसळली, त्याच दिवशी पसारवाडीच्या दोन्ही बाजूला लहान दरडी कोसळल्या होत्या. माळीणच्या तुलनेत हि वाडी अवघड ठिकाणी वसलेली आहे.