ओतूर येथे खासदार आढळरावांच्या सभेचा “फ्लॉप शो”
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर वाढत चाललेला आहे. पदयात्रा व गावभेटी कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे हे दोघेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले डाॅ.अमोल कोल्हे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत असून त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत आहे. परंतु हि गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होईल की नाही? हे तेवीस मे यादिवशीच दिसेल. याउलट परिस्थिती आढळराव यांच्या खेड तालुक्यातील आंबोली व जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे पाहावयास मिळाली.
गुरुवारी दि,२८ रोजी दुपारी तीन वाजता ओतूर येथे खासदार आढळराव यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे देखील उपस्थित होते. परंतु या सभेला अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ग्रामस्थ उपस्थित होते. काहीजण आजूबाजूला उपस्थित होते. मुळातच सभेचे ठिकाण अत्यंत लहान. त्यातच समोर उपस्थित असलेली अत्यल्प गर्दी. यामुळे खासदार आढळराव यांच्यासह उपस्थित सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे दिसत होता. दुसरीकडे गेल्या आठवडय़ात आढळराव हे गावभेटी कार्यक्रमासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबोली येथे गेले होते. तेथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत असताना काही वयस्कर ग्रामस्थांनी त्यांना मध्येच रोखत पंधरा वर्षात आमच्या गावाचा नेमका काय विकास केला? असा थेट प्रश्न केला. त्यामुळे आढळराव यांना सभा उरकती घ्यावी लागली.
यापूर्वीच्या झालेल्या लोकसभेच्या तिन्ही निवडणूकीत अशी परिस्थिती आढळराव यांच्यावर कधीच ओढवली नव्हती. लोकसभेच्या गेल्या तिन्ही निवडणूका सेझ, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व बैलगाडा शर्यती या तीन विषयांभोवती केंद्रीत झाल्या होत्या. आणि आढळरावांनी या सर्वसामान्य शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर तिन्ही निवडणूका मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. परंतु या निवडणुकीत वरीलपैकी कोणताही विषय फारसा चर्चेत नसल्यामुळे आढळराव यांचा हिरमोड झालेला दिसत आहे. कारण बैलगाडा शर्यतीवर ते काहीही बोलले तरी शेतकरी वर्ग त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे आढळराव यांच्याकडून गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या व न केलेल्या विकास कामांवरच निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. विकासकामांची त्यांच्याकडून मोठी जाहिरातबाजी सुरु आहे. परंतु पूर्वी त्यांच्याबद्दल मतदारसंघातील जनतेमध्ये जी क्रेझ होती, ती आता नक्कीच राहिलेली नाही. परिस्थितीत खुपच बदल झालेले आहेत. मतदारसंघातील बहुसंख्य जनता त्यांना कंटाळलेली आहे. दुसरीकडे सध्या जे काही ओपिनियन पोल येत आहेत. त्याला तडा जाऊ शकतो.