पुणे-नाशिक रेल्वे मार्गात वेधशाळेचे कुंपण

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

देशातील पहिली सेमीहायस्पीड रेल्वे महाराष्ट्रातील पुणे-नाशिक दरम्यान धावणार नसून ती आता गुजरातमधील अहमदाबाद-ढोलेरा दरम्यान धावणार हे अधोरेखित करून तो थेट रेल्वेमार्ग जवळपास कायमस्वरूपी बासनात गुंडाळून ठेवण्याचे संकेत केंद्र शासनाने नुकतेच दिलेले आहेत. तसेही केंद्र सरकारने मूळ पुणे-नाशिक रेल्वे मार्ग रद्द केलेलाच आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, राजकीय अनास्था व केवळ एका भागातील हितसंबंधींयांच्या हिताचा विचार करून दुसऱ्या भागातील आपल्याच लोकांवर अन्याय करणारी घेतलेली भूमिका आणि याला मिळाली ती तब्बल दहा वर्षे मुद्दामहून झोपेचे सोंग घेतलेल्या जीएमआरटी अर्थात खोडद वेधशाळेची साथ. परिणामी यामुळेच पुणे-राजगुरूनगर-संगमनेर-नाशिक पट्ट्यातील लाखो लोकांचे स्वप्न धुळीस मिळविले गेले आहे.

हा मार्ग रद्द करण्यापूर्वी केंद्र शासन व जीएमआरटीने गांभीर्याने देशातील अन्य संशोधन संस्थाशी सल्लामसलत करून, एकत्र बसून वैज्ञानिकदृष्ट्या यांवर काही तोडगा काढता येतो का? यादृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित होते. सुदैवाने काही तोडगा निघाला असता तर या मार्गातील अडथळा दूर होऊन या मार्गाचे युद्धपातळीवर कामही केव्हाच सुरू झाले असते. परंतु मध्यम मार्ग वा तोडगा न काढताच एका फटक्यात हा मार्गच रद्द केला. काही दिवसांपूर्वी या मार्गाच्या अभ्यासासाठी जी काही तज्ञ समिती नेमली आहे, त्यातून काही सकारात्मक मार्ग निघेल, ही शक्यता फार कमी आहे.

मुळातच गेली काही वर्षे खुंटीवर टांगून ठेवलेला मूळ पुणे-राजगुरूनगर-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्ग रद्द करून नव्याने नाशिक-शिर्डी-नगर-चाकण-पुणे रेल्वे मार्गाला परवानगी देण्याचे काहीएक कारण नव्हते. यामागे शुद्ध द्राविडीपणा आहे. परंतु नगर उत्तरेतल्या एका नेत्याच्या हट्टापायी हा मार्ग रद्द केला गेला. मूळ पुणे-नाशिक रेल्वेमार्ग रद्द करून तो शिर्डीमार्गे व्हाया नगर-चाकण-पुणे नेण्यामागे केवळ वैयक्तिक स्वार्थाचे अर्थकारण, धर्मकारण व मतपेढीचे राजकारण दडलेले आहे. आणि त्यासाठी खोडद वेधशाळेने घेतलेला आक्षेप पुढे केला जात आहे. ‘झारीतील शुक्राचार्या’ने संगमनेर तालुक्यातील जनतेवर राजकीय शत्रूत्वातून उगवलेल्या सूडाची किनार देखील यामागे आहे.

जीएमआरटीच्या आक्षेपानंतर रेल्वे मंत्रालयाने हा मूळ मार्ग रद्द केला, हे जरी कारण दिले जात असले तरी जीएमआरटीने आक्षेप घेईपर्यत रेल्वे मंत्रालय देखील झोपले होते का?

हा मूळ मार्ग नारायणगांव जवळून जाणार हे रेल्वे मंत्रालयानेच आरेखित केले होते. आणि याची सुरवातीपासून जीएमआरटीला कल्पना नव्हती, असेही नाही. मग २०२३ नंतर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की हा प्रकल्पच रद्द केला गेला? यावर वैज्ञानिक आधारावर काही तोडगा काढण्याऐवजी वा सूचविण्याऐवजी अंगात आल्यासारखे जीएमआरटीने थेट हा मार्गच रद्द करण्याची अडेलतट्टूसारखी भूमिका घेतली. याचेच आश्चर्य वाटते.. जीएमआरटीची ही भूमिका केंद्रशासन धार्जिणीच म्हणावी लागेल. ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’ अशातला हा प्रकार. आजच्या युगात जगात काहीही अशक्य वा अवघड नाही. परंतु तोडगा काढायचाच नाही हे एकदाचे मनांत ठरवले तर पुढे जाताच येत नाही.

जीएमआरटीला रेल्वेच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स (RFI) अर्थात रेडिओ हस्तक्षेप वा विद्युत चुंबकीय लहरींचा अडथळा निर्माण होऊन वेधशाळेच्या ॲंटेनाच्या लहरी क्षीण वा कमकुवत होतात, असा जो प्रमुख आक्षेप आहे, तो RFI कसा कमी करता येईल यावर संशोधन करण्याची गरज आहे.

विकासासोबतच्या लढाईत विज्ञान जिंकले पाहिजे, ही भूमिका घेतली गेली पाहिजे. यातून मार्ग निघणे काहीच अवघड नाही. आणि आपल्याकडे जागतिक दर्जाच्या प्रतिभावंत संशोधकांची बिलकुल कमी नाही. शेवटी जीएमआरटीमध्ये लहरींवरच काम चालते. त्यामुळे रेल्वेच्या वेगामुळे निघणाऱ्या लहरींचा अडथळा कमी वा शुन्य कसे करता येईल, याचा अभ्यास करणे त्यांना अवघड नाही. जीएमआरटीने न रडता यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

मुळातच २०१३ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांनी या पुणे नाशिक लरेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२१ मध्ये दिवंगत अजित पवार यांनी विधानसभेत पुणे नाशिक दरम्यान सेमीहायस्पीड रेल्वेची घोषणा केली.

जीएमआरटीने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी पडत्या फळाची आज्ञा पाळत मूळ पुणे नाशिक रेल्वे मार्गच रद्द करून नवीन पुणे नाशिक मार्ग व्हाया शिर्डी-नगर-चाकण-पुणे असा प्रस्तावित केला.

अरे हे काय, आपण काय १३ व्या, १४ व्या शतकात राहतोय की काय? एकीकडे २१ व्या शतकाचे, विकसित भारताचे स्वप्न दाखवायचे व या प्रकल्पात जे काही अडथळे निर्माण झाले आहेत, त्यावर चर्चा न करता, तोडगा न करता, लाखो लोकांचे भविष्य न पाहता, प्रयत्नच न करता अचानक रेल्वे मार्गच रद्द केला?

ज्या मूळ पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी दीर्घ असा १६ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, पण प्रत्यक्षात तो साकार होऊ शकलेला नाही. मग नवीन मार्गासाठी किती वर्ष वाया घालणार? पुणे नाशिक मार्गावर सेमीहायस्पीड रेल्वे ऐवजी मध्यम वेगाच्या रेल्वे की ज्यांचा वेगही १०० ते १३० किमी प्रती तास असतो, त्या वापरणे अधिक फायद्याचे होऊ शकते का, याचाही अभ्यास केला गेला पाहिजे. मार्ग अनेक आहेत, फक्त तोडगा काढला पाहिजे.

या आंतरराष्ट्रीय संस्थेबद्दल प्रत्येकालाच प्रचंड आदर आहे. उत्तर पुणे जिल्ह्याचे ते भूषण आहे.

केंद्र असो वा राज्य शासन दोघेही महामार्ग वा इतर प्रकल्पांसाठी स्थानिकांचे अधिकार दडपून, त्यांचा विरोध मोडून प्रकल्प त्यांच्या माथी लादतेच ना. अन् प्रकल्पांसाठी, खाणींसाठी जंगलच्या जंगल नष्ट करून पर्यावरणाची वाट लावते. की ज्याचे नैसर्गिक दुष्परिणाम तेथील जनतेला वर्षानुवर्षे भोगावे लागतात. अलिकडच्या काळात केरळ तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात निसर्गाच्या हानीची विध्वंसकता पाहिलेलीच आहे. मग या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी जराही अभ्यास न करता घाईघाईने तो प्रकल्प का रद्द केला?

लोकांच्या भावनांशी क्रूर पद्धतीने खेळायचे, हे कदापी समर्थनीय ठरणार नाही. या मार्गाचा फायदा पुणे पट्ट्यातील पुढील अनेक पिढ्यांना होणार आहे. जर वेधशाळेचाच अडसर असेल तर भविष्यात हा मार्गच होऊ शकणार नाही. मग पंधरा सोळा वर्षे या भागातील लोकांना मुर्ख बनविण्याचा उद्योग का केला?

सध्याची जवळपास सर्वच वाहने ही आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे ही उपकरणे मोठ्या प्रमाणात विद्युत चुंबकीय लहरींचा गोंगाट निर्माण करतात. त्यातच इलेक्ट्रिक वाहने हे तर मोठेच आव्हान आहे. पुणे नाशिक महामार्गावरून दररोज व दिवसभर हजारो वाहनांची ये जा सुरू असते. हा महामार्ग खोडद बफर किंवा शांतता क्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. या वाहनांनधून निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी तुलनेने कमी ताकदीच्या असल्या तरी या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्युत चुंबकीय लहरी वातावरणात मिसळल्या जातातच ना? त्यातुलनेत पुणे नाशिक दरम्यान रेल्वेंची वारंवारता ही मर्यादितच असणार आहे.

ज्या वेधशाळेत विश्वाची निर्मिती कशी झाली, दूरदूरवरच्या ताऱ्यांचे जीवनचक्र कसे चालते, यांचे संशोधन चालते की जे अब्जावधी मैल अंतरावर दूर आहेत. त्यामुळे या संस्थेतील वैज्ञानिकांनी या समस्येवर काही तोडगा, मार्ग निघतो का? यावर वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता थेट अडाण्यासारखे या प्रकल्पालाच विरोध करण्याची भूमिका घेतली, हे निश्चितच अयोग्य व अशोभनीय आहे. कारण या प्रकल्पावर पुणे नाशिक जिल्ह्यातील लाखो शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी व इतरांचे भविष्य अवलंबून आहे.

नाशिक-शिर्डी-नगर-चाकण हा जवळपास पूर्णपणे अर्धवर्तुळाकार मार्ग असणार आहे. त्यामुळे जीएमआरटी बफर झोन वगळणे अवघड नसावे. बफर झोन नावाला आहे. दररोज या महामार्गावरील तसेच नगर-आळेफाटा-कल्याण महामार्गावरून हजारो वाहनांची आवकजावक असते. रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून खोडदच्या बफर झोनमधून भूमिगत रेल्वे नेऊन विद्युत लहरींचे उत्सर्जन किती कमी करणे शक्य आहे? याचाही अभ्यास केला गेला पाहिजे.

रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल्स तथा उंचावरून जाणाऱ्या विद्युत तारांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत चुंबकीय हस्तक्षेप तथा विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात. त्यामुळे केवळ पाच दहा किमी वेधशाळेच्या बफर क्षेत्रातून ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल्स ऐवजी डिझेल इंजिनाचा वापर करून रेल्वे नेणे तेही भूमिगत बोगद्यातून शास्रीयदृष्ट्या शक्य आहे का, याचाही प्रामाणिकपणे अभ्यास केला गेला पाहिजे.

मुळातच सेमीहायस्पीड रेल्वे ताशी २०० किमी वेगाने जाऊ शकत नाही. त्यामुळे पाच ते दहा किमी लांबीच्या बफर झोनमधून जाताना गाडीचा वेग आणखीनच कमी केला गेला तर तिचा आवाजही कमी करता येणे शक्य आहे. हे शास्रीयदृष्ट्या तपासणे गरजेचे आहे.

सह्याद्रीचा कातळ फोडून नुकताच पुणे मुंबई दरम्यानचा दहा किमी लांबीचा तयार केलेला मिसींग लिंक असो वा हिमालयाच्या पूर्वेकडील पीर पंजाल पर्वरांगेतील रोहतांग पास जवळील नऊ किमी लांबीचा अटल टनेल. हे दोन्हीही बोगदे दोन वेगवेगळ्या डोंगररांगात व सर्वार्थाने कमालीच्या भिन्न वातावरणात तयार केलेले आहेत.

त्यामुळे वेधशाळेच्या भागातून बोगदा तयार करून रेल्वे मार्ग तयार करणे काहीच अवघड नाही. बोगद्यासाठी खर्चाचे जरी कारण पुढे केले गेले तर हा खर्च वसूल होणे अवघड नाहीच.

पुणे-नाशिक रेल्वेची मागणी ही तशी जुनीच आहे. साहजिकच आहे, जर सुरुवातीलाच जर आक्षेप घेतला गेला असता तर या मार्गाचे आरेखन, भूसंपादन, संसद व विधानसभेतील मंजुरीच्या, निधी तरतूदीच्या लोकप्रिय घोषणा टाळता आल्या असत्या. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ या पट्ट्यातील लाखो जनतेच्या जीभेवर मध लावून नेमके काय साध्य केले गेले, हे समजतच नाही. तद्दन मुर्खपणाचे लक्षण आहे हे.

पुण्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी थेट महामार्ग अस्तित्वात आहे. परंतु पुण्यावरून कोल्हापूरला जायचे असेल तर आधी मुंबईला जा व मुंबईवरून कोल्हापूरला जा, अशातला हा प्रकार. .