दामू उर्फ दामाजी ‘अण्णां’ना आता घरीच बसवा

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

टिप:- या लेखातील दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ ही व्यक्तीरेखा व तिच्याशी संबंधित घटना या काल्पनिक कथेवर आधारीत आहेत. त्यांचा अस्तित्वातील कोणतीही व्यक्ती वा अन्य सत्य घटनांशी काहीही एक संबंध नाही. अथवा ओढूनताणून जोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मिळतीजुळती असेलच, तर तो एक निव्वळ काल्पनिक योगायोग समजावा. 

दामू उर्फ दामाजी ‘अण्णा’ ज्या ऐतिहासिक तालुक्याचे गेली अनेक वर्षे नेतृत्व करत आहेत, त्या तालुक्याशी असलेले आपले नाते असेच कायमचे वृद्धींगत राहावे यासाठी अण्णांनी एक मोठा संकल्प सोडला आहे. दामू अण्णांनी ज्या पद्धतीने स्वत:चा, स्वत:च्या घरच्यांचा, आपल्या सग्यासोयऱ्यांचा, पै पाहुण्यांचा, त्यांच्या बेरोजगार पोराबाळांचा सर्वांगीण विकास केला, त्यांना प्रगतीपथावर आणले, स्वत:सह, घरच्यांसह त्यांच्या कैक पिढ्यांची सोय केली, अगदी त्याच पद्धतीने अण्णांनी मोठ्या प्रमाणात कारखानदारी, पाण्याची प्रचंड मुबलकता, निसर्ग सौंदर्य लाभलेल्या तालुक्याचा कॅलिफोर्निया, हाॅंगकाॅंग, शांघाय किंवा सिंगापूरसारखा विकास करण्याचे मनोमन ठरविले आहे. आता बस यापुढे तालुक्याचा व जनतेचा विकास करणे हेच अण्णांचे उद्दिष्ट व लक्ष असेल. जेणेकरून तालुक्यांतील जनतेचा जबरदस्त आर्थिक स्तर उंचावून तालुक्यात सुबत्ता नांदेल, शांतता नांदेल, गुन्हेगारांना वठणीवर आणले जाईल, औद्योगिक नगरीतील दहशत, हप्तेखोरी बंद होईल. 

हे तेच दामूअण्णा आहेत, की ज्यांचा स्वभाव अत्यंत आक्रस्ताळी, महत्वाकांक्षी, असंतुष्ट, लोभी, रगेल, रंगेल ( रंगीबेरंगी कपडे घालण्याची भलतीच हौस) आहे. 

तालुक्याचा विकास करण्यासाठी अण्णांनी जनतेपुढे एक अट ठेवली आहे. यापूर्वी तालुक्याची तीन वेळा सेवा करण्याची जशी संधी दिली, तशीच सेवा करण्याची संधी यावेळी म्हणजेच चौथ्यांदा पण द्यावी. दुसरीकडे जनतेने पुन्हा संधी दिली तरच तालुक्याच्या विकासासाठी अण्णाला लाल दिवा (दिव्यासह गाडी नव्हे) देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. शपथविधीसाठी अण्णांनी मोठ्या प्रमाणात विविधढंगी नव नवीन पद्धतीचे कोट शिवायला टाकलेले असल्याचे समजते.

कारण अनेक वर्ष अण्णा लाल दिव्यासाठी भांडत होते. त्यासाठी त्यांनी बंद गळ्याचे भरपूर कोट शिवून कपाटात ठेवलेले होते. परंतु अण्णाला ऐन उमेदीत लाल दिवा काही मिळाला नाही. परिणामी अण्णाला शिवलेले कोट काही घालता आले नाहीत. त्यामुळे त्या सर्व कोटांना अक्षरश: वाळवी लागली. त्यामुळे नवीन कोट शिवून घेण्याचा सर्व कुटाणा पुन्हा करावा लागत आहे. असो. 

म्हणूनच जनतेने मला तालुक्याची सेवा करण्याची पुन्हा संधी दिल्याशिवाय तालुक्याचा कॅलिफोर्निया, हाॅंगकाॅंग, शांघाय वा सिंगापूरसारखा कायापालट करता येणार नाही. तसे पाहिले तर बड्या बड्या विदेशी कंपन्यांमुळे आपल्या तालुक्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेलेच आहे. आता फक्त कायापालट करायचा तेवढा बाकी आहे. आणि काहीही झाले तरी तो मी करणारच. 

उभ्या ह्यातीत मी कधी कुणाचा चहा प्यायलो नाही की पाणी प्यायलो नाही. वेळप्रसंगी खिशातून पै पै काढून मी तालुक्याच्या विकासाला हातभारच लावण्याचे काम आजवर केलेले आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कधीही, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना कधी त्रास दिल्याचे मला स्मरत नाही की त्यांच्या नियुक्तीसाठी कधी परातभर प्रसादरूपी दामाची अपेक्षा ठेवली. मी कधीच कोणत्या अधिकाऱ्याचा भयंकर छळ करून त्याला तालुक्यातून बाहेर जायला लावले नाही की कुणा अधिकाऱ्यांचे निलंबन केले नाही की न ऐकणाऱ्या कार्यतत्पर अधिकाऱ्याची बदली केली. तालुक्याच्या भल्याचाच विकास करण्याचे काम मी प्राधान्याने करत आलेलो आहे. त्यामुळेच येत्या पाच वर्षांत तालुका सुजलाम सुफलाम करून एकदम आधुनिक पद्धतीने विकसित करण्याचा ध्यास मी घेतलेला आहे. 

अण्णा असेही म्हणतात की, सर्वसामान्य विरोधी कार्यकर्ता असो की स्वपक्षीय कार्यकर्ता, मी कधीच कुणाला त्रास दिलेला नाही की कुणावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे जीवन असह्य केले. अजाणतेपणामुळे जर कुणाला कधी माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर मला मोठ्या मनाने माफ करून, मला निवडून द्या. म्हणूनच की काय अण्णा दुखावलेल्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना साकडे घालत आहेत. 

तालुक्याच्या औद्योगिक शहरात गेली कित्येक वर्ष वाहनांची बजबजपुरी माजल्यामुळे सातत्याने जी वाहतूककोंडी होते, त्या वाहतूककोंडीचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी चौकाचौकात मोजता न येणाऱ्या असंख्य लांबलचक उड्डाणपुलांचे जाळे निर्माण केले जाईल, की जे जाळे संपूर्ण शहरभर, औद्योगिक नगरीत पसरलेले असेल, असा महत्वाकांक्षी प्रकल्प अण्णा उभारणार असल्याचे समजते. 

एक बाकी मानले पाहिजे की, अण्णांचा उत्साह बाकी तरूणांना लाजवेल असाच आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये अण्णांनी स्वत: जगजाहीर केले होते की, तालुक्याच्या हितासाठी, विकासासाठी, तरूणांच्या हाती तालुक्याचे नेतृत्व देण्यासाठी मी यापुढे कोणत्याच निवडणूकांच्या भानगडीत पडणार नाही. थोडक्यात मी राजकीय स्वेच्छानिवृत्ती घेणार आहे. मला कुठल्याच गोष्टींचा मोह, लोभ नाही. मी सर्वकाही जनतेसाठीच करत आहे. तालुक्याचे नेतृत्व ही दुय्यम गोष्ट आहे. अण्णांची म्हणजेच दामू अण्णांची ही भीमगर्जना ऐकून नेतृत्वाच्या पहिल्या रांगेत उभे असलेले भलतेच खूष झाले होते. अण्णांच्याच पंथातील काहींना वाटले की, आता पुढील पंचवीस तीस वर्षे तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला कुणीच स्पर्धक नसेल. आता आपला रस्ता मोकळा. 

परंतू त्या येड्यांना काय माहित होते की, अण्णा भलताच आतल्या गाठीचा आहे? अण्णा पुन्हा खरंच निवडणूकीला उभा राहणार नाही? नाही नाही, नको नको म्हणत अण्णा तथा दामू अण्णा पुन्हा एकदा निवडणूकीला उभे राहिलेच ना? भलतीच उर्जा आहे या माणसांत बाकी. तालुक्याच्या विकासाशिवाय या बाबाला काहीच दिसत नाही. त्यामुळे फक्त विकास, विकास, विकास याच भोवती अण्णांनी ही निवडणूक केंद्रीत केलेली आहे.

२७/१०/२०१९ च्या ‘पुणे डेक्कन न्यूज’ मधून दामू अण्णांच्या विस्मृतीबद्दल एक भाकित वर्तवण्यात आले होते आणि ते तंतोतंत खरे ठरले आहे. ते असे होते, ‘हि निवडणूक माझी शेवटचीच निवडणूक असेल’ या जनतेला व तमाम पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या वचनाचे विस्मरण होणार नाही, याचीही अण्णांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे विस्मरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सकाळी काय खाल्ले हे ही काहींना आठवत नाही. आता तर पाच वर्षांचा प्रदीर्घ काळ जाणार आहे. एवढीच माफक अपेक्षा इच्छूक मंडळी व्यक्त करत आहेत. असो. 

नेमके तसेच घडताना आपण पाहत आहोत. 

एक बाकी खरे की, तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील अनेक वाड्यावस्त्या, लहान-मोठ्या गावातील नागरीक वर्षानुवर्षे पिण्याचे स्वच्छ हंडाभर पाणी मिळावे, यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु हजारो कोटींच्या विकासकामांचे दावे करून स्वत:चीच छाती बदडून ढोल पिटणाऱ्या अण्णाला या पाणीटंचाईपासून नागरीकांची काही सुटका करता आलेली नाही. 

विशेष म्हणजे तालुक्यात असलेल्या तीन तीन धरणांच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल अठरा टिएमसी पाणी उपलब्ध होते, तरीदेखील नागरीकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. तसेच तालुक्यांतील शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन अद्यापही सिंचनापासून वंचितच आहे. याला विकास म्हणायचा? आणि अण्णा निघाला तालुक्याचा कायापालट करायला. 

काहीहा म्हणा, या निवडणूकीचा पेपर अण्णाला जडच जाणार आहे. यापूर्वीच्या निवडणूका अण्णानी (दामू) स्वस्तातच जिंकलेल्या आहेत. आता अण्णाला येड्याचे सोंग घेता येणार नाही. आपल्याजवळ प्रचंड प्रमाणात असलेल्या राखीव कोट्यातून सढळहाताने ‘मायेचे’ वाटप लोकांमध्ये करावेच लागणार आहे. किंबहूना वाटप सुरूही असेल. त्याशिवाय अण्णाकडे पर्यायच उपलब्ध नाही. आयुष्यभर लोकांची मोजता न येणारी माया (प्रेम, ममता या अर्थाने) घेण्याचेच काम करणाऱ्या अण्णाला आता कमावलेल्या मायेचे वाटप करणे भागच आहे. फक्त घ्यायचेच माहिती असलेल्या अण्णा देताना कसं कसं होत असेल. 

दामू अण्णांनी, त्यांच्या घरच्यांनी, पुतणे, भाच्यांनी, जवळच्या नातेवाईक, पाहुण्यांनी बाकी तालुका लुट लुट लुटला आहे, त्यामुळे या दामूला अण्णाला मतदारांनी घरीच बसविणे योग्य ठरेल. हे पुन्हा निवडून आलं तर संपूर्ण तालुक्याचा सातबारा सग्यासोयऱ्यांच्या, पै पाहुण्यांच्या, लाडक्या भाच्याच्या, पुतण्यांच्या नावावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे बाकी नक्की.