आधी चाकणची वाहतूककोंडी सोडवा, मगच कायापालटाच्या गप्पा मारा
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात चाकण शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण- शिक्रापूर रस्ता तसेच चाकण परिसरातील पाचवीला पुजलेली वाहतूककोंडीची गंभीर समस्या सोडविता आलेली नाही, चाकणकरांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविता आलेले नाही, चाकण परिसरातील कचरा समस्येसाठी काही करता आलेले नाही, ओढ्यांच्या पात्रातील अतिक्रमणे काढून नैसर्गिक प्रवाह मोकळे करता आलेले नाहीत, त्या लोकप्रतिनिधीने चाकणचा पिंपरी चिंचवडसारखा कायापालट करण्यासाठी अजित पवारांना साथ देऊन, पर्यायाने स्वत:ला पुन्हा आमदारकीची संधी द्यावी, असेच या महोदयांना सुचवायचे असावे. मुळातच असे विधान करणे हेच मुळी हास्यास्पद व उथळ आहे. उचलली जीभ व लावली टाळूला, अशातलाच हा प्रकार.
एकप्रकारे मतदारांना दिवास्वप्न दाखविण्याचाच हा प्रकार म्हणता येईल. कारण एका विशिष्ट तंद्रीत गेल्यावरच संबंधित व्यक्तीला दृश्ये पाहिल्याचा भास होत असतो. त्याचाच हा परिणाम असावा.
वर्षानुवर्षे वारंवार सत्तेत असूनही अजित पवारांना चाकणचा पिंपरी चिंचवड सारखा कायापालट करता आला नाही, ही वस्तुस्थिती असता ते काय चाकणचा कायापालट करणार? हे आमदार मोहितेंना कुणी तरी सांगितले पाहिजे. याचाच अर्थ मोहिते काल्पनिक कायापालटाविषयी बोलत असावेत.
चाकणचा कायापालट करण्यापूर्वी चाकण औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी, दहशत तसेच विविध कंपन्यांमधील ठेकेदारी, हप्तेखोरीचे समूळ उच्चाटन करणार का? तेवढी आंतरीक इच्छा आपणांत आहे का?
काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक-महामार्ग व व चाकण-शिक्रापूर रस्त्यालगतची सर्वसामान्य लोकांची अनधिकृत कच्ची-पक्की बांधकामे, पत्र्यांची शेड प्रशासनाने मोठ्या फुशारकीत हटविली. तसेच आळंदी फाट्यावरील एका महोदयाच्या हाॅटेलच्या दोन्ही बाजूंची अनधिकृत बांधकामे, शेड काढण्यात आली. मात्र संबंधित महोदयांच्या हाॅटेलसमोरील अनधिकृत बांधकामाला हात लावण्यात आला नाही. हे रे प्रशासन? अन् म्हणे चाकणचा कायापालट करणार. हा निव्वळ थोतांडपणा आहे.
या तथाकथित ‘झारीतील शुक्राचार्यां’मुळेच चाकणचा विकास खुंटलेला आहे. राज्यकर्त्यांनी, विशेषत: वर्षानुवर्षे राज्यशकट हाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील प्रस्थापितांनी मनांत आणले असते तर चाकणच काय निसर्ग सौंदर्याने नटलेल्या खेड तालुक्याचा पिंपरी चिंचवडपेक्षा अधिक चांगला कायापालट केला असता. असो.
औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये जनतेचे नेतृत्व करण्याऱ्या सर्वपक्षीय बहुसंख्य नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. अनेकांसाठी तर ती सोने नव्हे तर हिऱ्यांचे अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. जिल्ह्यातील एक वजनदार लाडकी बहिण स्क्रॅपमध्ये तर मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे बोलले जाते.
जिल्ह्यातील प्रस्थापित तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी मनांत आणले असते कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या झिरप्यातूनही तालुक्याचा मोठ्या प्रमाणात सर्वांगीण पायाभूत विकास घडवून आणता आला असता. परंतु दृश्य स्वरूपातील विकास कुणालाच नको आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, की जी मान्य करावीच लागेल. तालुक्यांतील जिप शाळा, प्रार्थमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालयांची काय अवस्था आहे? याचा जरा कधी विचार केला आहे का?
पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी पुलाखाली तर अक्षरश: गटाराचे सांडपाणी साचते. त्या घाण सांडपाण्यातून नागरीक पायी चालत जातात.
‘बांधता, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर बांधलेल्या चाकण बसस्थानकाची अवस्था तर अत्यंत अस्वच्छ, गलिच्छ झालेली आहे. या स्थानकावर दिवसातून किती बसेस येजा करतात, हा संशोधनाचा विषय आहे. येथे लांब पल्ल्याची एकही बस थांबत नाही. सर्व बसेस तळेगांव चौकात पुणे नाशिक महामार्गावरच थांबतात. राजगुरूनगर, नारायणगांव, संगमनेर, नाशिक या भागाकडे जाणारे प्रवाशी महामार्गावरच जीव धोक्यात घालून बसेसची वाट पाहत उभे राहत असतात. हे तुमच्या विकासाचे प्रारुप आहे का?
चाकण शहराचेच जाऊद्या, तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेले राजगुरूनगर तसेच आळंदी या दोन शहरांवर का अन्याय करताय? या तीन शहरांचा कायापालट करण्यापासून पंधरा वीस वर्ष तुम्हाला वा अजित पवारांना कुणी रोखले होते? आता स्वत:च्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गुलाबी स्वप्ने मतदारांना दाखवत आहात.
तालुक्यांतील हजारो धरणग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन करता आलेले नाही, एका रात्रीतून भामा आसखेडचे पाणी पळविणाऱ्यांनी या धरणाचे दोन्ही कालवेही रद्द केले, परिणामी खेड, हवेली, दौंड तालुक्यांतील हजारो एकर जमीन सिंचनापासून कायमची वंचित राहिली. हा निर्णय कोणत्या शेतकरीपुत्र बड्या नेत्याचा आहे, हे सांगावयाची गरज नाही.
मतदारसंघात हजारो कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे छातीठोकपणे दावे करणाऱ्या आमदार दिलीप मोहिते, खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी अढळराव या आजी व माजी लोकप्रतिनिधींना चाकण वाहतूककोंडीवर मात्र वर्षानुवर्षे काहीच उतारा सापडलेला नाही, हे बाकी सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तब्बल ३३ ते ३५ हजार कोटी रूपये मंजूर करून घेतल्याचे दावे करणाऱ्या खासदार कोल्हेंनी संबंधित रस्ते काय हवेत वा चंद्रावर बांधलेले आहेत का? फक्त कागदोपत्री तंद्रीत बोलायचे व मतदारांना झुलवत ठेवायचे हाच यांचा धंदा बनला आहे.
इतरांचे जाऊन द्या हो, परंतू एकाच पंचवार्षिकमध्ये रेकाॅर्डब्रेक तीन तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळवलेले पुणे जिल्ह्याचे सुपुत्र व पालकमंत्री नामदार अजित पवारांना देखील चाकण वाहतूककोंडीच्या अवघड दुखण्यावर अजून तरी मार्ग काढता आलेला नाही. दुसरीकडे शेजारच्या आंबेगांव तालुक्याचे मंत्रीमहोदय नाम दिलीप वळसे यांचेबद्दल न बोललेलेच बरे.
या रस्त्याने प्रवास करणारे हजारो वाचनचालक व प्रवाशी तसेच स्थानिक लोकांच्या मनांत चाकण परिसर वाहतूककोंडीची प्रचंड धास्ती बसलेली आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. या वाहतूककोंडीत अडकणे म्हणजे एकप्रकारचा मानसिक छळ सहन करणे असाच आहे. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या व होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे, याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. वर्षानुवर्षे हे असेच चालू आहे. आणि या समस्येला सर्वस्वी वरील लोकप्रतिनिधीच सर्वार्थाने जबाबदार आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
चाकण परिसर हा देशातील एक महत्वाचे औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित झालेले आहे, होत आहे. तरीदेखील विकासाच्या लोणकढी थापा मारणाऱ्या जिल्ह्यातील प्रस्थापित व या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्यांना रस्त्यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यात जराही स्वारस्य नाही. याला सर्वच पक्ष जबाबदार आहेत. ज्याला त्याला फक्त औद्योगिक नगरीतील कंपन्यांमधून विविध प्रकारच्या कामांची ठेकेदारी दडपशाही पद्धतीने मिळविणे व सातबारा निर्माण करणे, यातच अधिक रस राहिलेला आहे.
विकासाच्या केवळ वांझोट्या गप्पा मारून मतदारसंघातील जनतेला झुलवत ठेऊन आपला व आपल्या जवळच्या सग्यासोयऱ्यांचा, पंटरांचा राजकीय व विविध स्वरूपाचा विकास कसा साधायचा, हेच यांच्या विकासाचे खरे गमक राहिलेले आहे.
गेल्या काही वर्षांपासून चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग व शिक्रापूर-तळेगांव या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे चाकण परिसरात सातत्याने होणारी वाहतूककोंडीची समस्या एकप्रकारे पाचवीलाच पुजलेली आहे. प्रामुख्याने चाकण मधील आंबेठाण चौक ते चिंबळी यादरम्यान खऱ्या अर्थाने वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप या रस्त्याने प्रवास करणारे हजारो वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यातच चाकण तळेगांव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे तसेच वाहनचालक व प्रवाशांचे शारीरिक नुकसान तर होते.
गमंत म्हणावी की राजकीय अपरिपक्वपणा म्हणायची, ज्या लोकप्रतिनिधी व अन्यांना चाकण वाहतूककोंडीची समस्या वर्षानुवर्षे सोडवता आलेली नाही, तेच लोकं आज चाकणपर्यंत मेट्रोचा मार्ग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकिकडे रिंगरोडसाठी हजारो कोटींची तजवीज करायची व दुसरीकडे केवळ कागदोपत्री पुणे नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे चित्र रेखाटायचे यातच सत्ताधाऱ्यांना अधिक रस आहे.