हे तर ‘मगरीचे अश्रू’….!
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे
ते गावोगावी प्रचाराला येतील, ग्रामदैवतांसमोर हुंदक्यांवर हुंदके देऊन, डोळ्यात पाणी आणून, रडवेल्या चेहऱ्याने, हात जोडून, भावनिक होऊन बोलतील, “मतदार बंधूंनो, ही माझी शेवटची निवडणूक आहे. यावेळी मला निवडून द्या, यापुढे एकही निवडणूक मी लढविणार नाही”. तसेच मी निवडून आलो तर तालुक्याला (मला) मंत्रीपद मिळेल. तालुक्यांतील जनतेची (माझी) खुप वर्षांची इच्छा पूर्ण होईल.
परंतु मतदार आता या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतील, अशी परिस्थिती अजिबात नाही. जनतेला चांगलेच माहिती आहे की, हे मगरीचे अश्रू आहेत. त्यामुळे यावेळी फसायचे नाही.
२०१९ च्या निवडणूकीत देखील यांनी असाच ड्रामा केला होता. परंतु स्वार्थासाठी त्यांनी आपला शब्द पाळला नाही व पुन्हा निवडणूकीला उभे राहिले. त्यामुळे तालुक्यांतील मतदारांना दिलेला शब्द का पाळला नाही? याचे उत्तर मिळालेच पाहिजे.
ज्या व्यक्तीने आपल्या पदाचा सर्वाधिक उपयोग आपल्याच सग्यासोयऱ्यांच्या हितासाठी, तुंबड्या भरण्यासाठी केला, त्या व्यक्तीला पुन्हा निवडून देणे, हे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.
हल्ली जनतेसमोर हुंदका फुटणे, भावनाविवश होऊन डोळ्यांत पाणी येणे (आणणे) हा नवीनच ‘प्रकार’ राजकारणात चांगलाच रूजलेला पाहावयास मिळतो. काही काही निगरगट्ट राजकारणी देखील हा अभिनय अगदी बेमालूमपणे करताना पाहून मोठीच गमंत येते. राजकारणी देखील संवेदनशील असतात. त्यांना देखील भावना असतात. याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
ज्या व्यक्तीने शेकडो कुटुंबांच्या डोळ्यात पाणी आणले, अनेकांना आयुष्यातून उठविले, अनेकांना देशोधडीला लावले, खोट्या केसेस दाखल करुन अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद केले, साध्या साध्या गोष्टींमध्ये संबंध नसताना देखील हस्तक्षेप केले, अनेकांना मानसिक त्रास दिला, अशा व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येणे, हे निव्वळ थोतांडच म्हणावे लागेल.
गेल्या निवडणूकीत प्रचाराची पातळी एकदम खालच्या स्तरावर गेलेली होती. एकमेकांच्या वर्णावरुन देखील काही उमेदवारांचा घाणेरड्या शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान सर्वात गमतीचे व अनपेक्षित म्हणजे, एका उमेदवारांकडून निवडून देण्यासाठी मतदारांना अतिशय भावनिक आवाहन करण्यात आले होते. प्रचारसभेत बोलताना संबंधित उमेदवाराच्या डोळ्यांमध्ये चक्क पाणी येऊन त्याला हुंदका फुटला. का तर त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून. हे बघून उपस्थितीतांची मने हेलावून गेली. वातावरण एकदम भावनिक बनले. दुसरीकडे संबंधित उमेदवाराचा हुंदका बघून तालुक्यातील बहुसंख्य लोकांना, मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. कोणाचाच कोणावर विश्वास बसेना. आपण जे बघतोय, जे ऐकतोय ते वास्तव आहे की काल्पनिक? हेच कुणाला कळेनासे झाले. अनेक जण हास्य सागरात बुडाले होते. म्हणे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हा युक्तिवाद जरा अतीच झाला होता.
मुळातच ज्या व्यक्तीने यापूर्वीच्या त्याच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पक्षांतर्गत तसेच इतर पक्षांतील राजकिय विरोधक असो वा स्वतःच्या विरोधकांशी सहानुभूती वाटणारे सर्वसामान्य नागरीक कि ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा लोकांवर असंख्य खोटे गुन्हे दाखल करायला लावून त्यांना अतोनात त्रास दिला होता. त्याच व्यक्तीवर गुन्हा झाल्यावर त्याला रडू कोसळावे?
त्यामुळे स्वतःवर गुन्हा दाखल झाला म्हणजे आभाळ नाही कोसळले. जसे यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, अशाच आविर्भावात ते बोलत होते. हे जनता व पक्षांतर्गत विरोधक विसरलेले नाहीत. राजकिय भांडवल करुन सहानुभूती मिळविण्याचा हा सर्व खटाटोप आहे. तालुक्यातील जनता दुधखुळी नाही.
चाकण परिसरातील एका गावात घडलेल्या घटनेत तर संपूर्ण गावांतील कर्त्या पुरुषांसह तरुणांवर जन्माची अद्दल घडविण्याच्या दृष्टीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला होता. संबंधित घटनेशी दुरान्वयेही ज्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यातील बहुसंख्य ग्रामस्थ कामानिमित्त परगावी वा बाहेर गेलेले होते, अशा ग्रामस्थांवर देखील खोटे गुन्हे नोंदवायला भाग पाडले होते. त्यावेळी संबंधित ग्रामस्थांच्या घरच्या लोकांच्या डोळ्यांतील अश्रू यांना नाही दिसले. तुम्ही स्वतःला भावनाप्रधान समजता तर त्या निष्पाप लोकांच्या घरच्या महिलांच्या, लहान लहान मुलांच्या डोळ्यातील पाणी बघून तुमच्या डोळ्यात पाणी आले होते का?
इनरकॉन पवनउर्जा प्रकल्पाला असलेला विरोध दडपण्यासाठी पोलिस यंत्रणेचा, स्वतःच्या गावगुडांचा वापर करुन पश्चिम भागातील गोरगरीब ग्रामस्थांना किती अतोनात छळण्यात आले? त्यांना किती मानसिक त्रास दिला, हे संबंधित ग्रामस्थ विसरलेले नाहीत. त्यावेळी रात्री अपरात्री पोलिस पकडायला घरी येतील, या भीतीने तरुण रानावनात झोपायचे. इनरकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडून काही स्थानिक ग्रामस्थांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करताना तुमच्या डोळ्यात कधी पाणी आले होते का? की हुंदका फुटला? जरा आठवून तर पहा.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील मतदान झालेली सर्व गावे व केंद्रांची यादी संबंधित महोदयांनी त्यांच्या कार्यालयात लावली होती, हे तमाम लोकांच्या स्मरणात आहे. जे ग्रामस्थ त्यांच्याकडे काही कामानिमित्त वा कामे घेऊन जात असत, संबंधित ग्रामस्थांना हे महोदय सुरवातीला त्याच्या गावाचे वा वाडीचे नाव विचारत. जर त्या ग्रामस्थांच्या गावात ह्या महोदयांना कमी मतदान झालेले असेल, तर महोदय त्यांना म्हणायचे कि, तुझ्या गावात मला इतके इतके कमी मतदान झालेले आहे. त्यामुळे मी तुझे काम कसे करु? ज्या विरोधी उमेदवाराला तु मतदान केले आहे, त्याच्याकडे जा व तुझे काम करुन घे. अक्षरशः संबंधितांना त्या कार्यालयातून हाकलून दिले जायचे. लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा केवढा हा उन्मत्तपणा म्हणायचा? अशा लोकांना का व कशासाठी निवडून द्यायचे? हाच खरा प्रश्न आहे. तालुक्यातील जनतेवर यांचे बेगडी प्रेम आहे.