खेड-आळंदीत पुन्हा एकदा भगवा फडकविण्याची सुवर्णसंधी
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून माजी जिप सदस्य बाबाजी काळे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे मावळते आमदार दिलीप मोहिते या दोघांतच खरा चुरशीचा सामना रंगणार आहे.
एक मात्र नक्की की, या मतदारसंघात शिवसेनेसाठी २०१४ पेक्षाही अधिक चांगले वातावरण असून माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्यानंतर बाबाजी काळे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा सेनेचा भगवा फडकाविण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. त्यामुळे या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी आपआपसातील असलेल्या, नसलेल्या राजकीय हेव्यादाव्यांना मोठ्या मनाने भीमेच्या पाण्यात विसर्जित करून एकजुटीने विजयासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर शिवसेनेचा विजय कुणीही रोखू शकत नाही. सेनेचा आमदार झाला तर या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुगीचे राजकीय दिवस येणार आहेत.
तसेच बाबाजी काळे यांनी देखील तालुक्यांतील सर्व जून्या, नव्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूकीसाठी सामोरे गेले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे बाबाजी काळे यांच्या राजकीय जीवनात यशच आहे.
हा मतदारसंघ शिवसेनेला जाऊ नये, यासाठी पडद्यामागे मोठ्या राजकीय गमतीजमती झालेल्या आहेत. हा मतदारसंघ जवळपास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडे गेलाच होता. असो.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत स्व. सुरेशभासां गोरे यांच्या पराभवात तत्कालीन एक अपक्ष उमेदवार कारणीभूत ठरल्याचे अजूनही बोलले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर या निवडणूकीत तालुक्यांतील सुजाण मतदारांनी त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अधिक सजग राहिले पाहिजे. अशा लोकांना मतदारांनी बाजूला केले पाहिजे.
आमदार मोहिते व त्यांच्या भक्तांनी विजयाचे कितीही दावे केले, विजय गृहीत धरला तरी हा एकप्रकारचा फाजील आत्मविश्वास आहे. कारण मोहितेंसाठी ‘सोळावं वरीस धोक्याचंऽऽऽऽ’ ठरणार आहे. हे बाकी नक्की.
बाबाजी काळे कसा आमदार होतो, असा काहीजण विचार करून दगाफटका करण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे मतदारांनी संबंधितांचे मनसुबे धुळीला मिळवून एका चांगल्या उमेदवाराची साथ दिली पाहिजे.
प्रस्थापित विरूद्ध सर्वसामान्य उमेदवार, असेच या लढतीचे स्वरूप असणार आहे. बाबाजी काळे हे मोहितेंच्या तुलनेत मृदु व शांत स्वभावाचे आहेत. पाच वर्षे काळेंनी मतदारसंघात मोठीच बांधणी केलेली आहे. कोणतीही उसंत न घेता अगदी पायाला भिंगरी लावून काळे तालुक्यात फिरत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे काळे निवडून आले तर तालुक्यात शांतता नांदेल. अधिकाऱ्यांवर कोणताही दबाव नसेल. घराघरात, भावकी भावकीत भांडणे लावली जाणार नाहीत. कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सुडबुद्धीने त्रास दिला जाणार नाही.
इतर उमेदवारांच्या तुलनेत बाबाजी काळे हे सोपे उमेदवार आहेत. अण्णा बाबाजीला कच्चे खातील, बाबाजींमुळे अण्णांचा विजय सोपा झाला, असे बोलून अण्णा समर्थक व भक्तांकडून जो पोरकट प्रचार केला जात आहे, तो चुकीचा आहे. आमदार मोहिते वा त्यांच्या भक्तांनी बाबाजी काळेंना हलक्यात घेऊ नये. मोहिते नकोत हा छुपा प्रवाह तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. याचा अंदाज मोहितेंना नसेल, असेही नाही.
दरम्यान मोहितेंबद्दल तालुक्यात मोठीच नाराजी पाहावयास मिळते. मोहितेंनी खेड तालुक्यांतील व बाहेरच्या तालुक्यांतील आपले सगेसोयरे, खास व्यक्तींचे हित सांभाळून त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणून त्यांची प्रगती केलेली आहे. याबद्दल तालुक्यात जाहीरपणे बोलले जाते.
आमदार मोहिते यांनी स्वपक्षात आपल्याला डोईजड होईल, आपल्याशी स्पर्धा करेल, असा कार्यकर्ताच कधी निर्माण होऊ दिला नाही. त्याबाबत बहुतेक कार्यकर्ते, पदाधिकारी उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्यात नाराजी आहेच. तसेच आपल्या दाबात, धाकात राहतील, अशाच कार्यकर्त्यांना आमदार मोहिते पदे व संधी देतात.
दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आमदार मोहितेंनी स्वत: ‘ही माझी शेवटची निवडणूक असून मला यावेळी निवडून द्या’ असे आर्जव मतदारांना केले होते. आर्जव करताना त्यांनी आपल्या आसवांना देखील वाट मोकळी करून दिल्याचा इतिहास खेड तालुक्यातील जनतेने ‘याची देही याची डोळा’ पाहिलेला आहे. त्यामुळे या निवडणूकीत मोहितेंनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वपक्षातील एखाद्या होतकरू कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी देऊन स्वत: मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणे अपेक्षित होते. परंतू असे करण्याऐवजी ते स्वत:च पुन्हा गुडघ्यांना मुंडावळ्या बांधून तयार झाले. अरे हे काय? कार्यकर्त्यांनी काय यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का?
इतरांना संधी न देतां स्वत:च्याच पदरात सर्व काही पाडून घ्यायचे, याला जनसेवा नव्हे तर आपमतलबीपणा म्हणतात. याचे स्पष्टीकरण मतदारांना द्यावेच लागणार आहे.
दुसरीकडे तालुक्यांतील काहीजण स्वत:ला किंगमेकरच्या भूमिकेत समजत आहेत. संबंधितांच्या या असल्या स्वार्थी राजकारणामुळे तालुक्याचा खेळखंडोबा होता कामा नये. त्यामुळे अशा लोकांना तालुक्यांतील मतदारांनी खड्यासारखे बाजूला करणे गरजेचे आहे.
एकंदरीतच तालुक्यांतील सर्वसामान्य जनता ‘आपला’ उमेदवार म्हणून बाबाजी काळे यांच्याकडे पाहत आहेत. सर्वसामान्य जनतेचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न सुटावेत, वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीटंचाईतून मुक्तता मिळावी, चाकण परिसरात निर्माण झालेल्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना हक्काचे काम मिळावे, तालुक्यांतील जनतेला चांगल्या दर्जाची सार्वजनिक आरोग्य सुविधा मिळावी, चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, पश्चिम भागातील आदिवासी बांधवांच्या जीवनातील अंधार नाहिसा होवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, चाकण परिसरातील वाहतूककोंडीचे कायमसावरूपी उच्चाटन व्हावे, गुन्हेगारी, गुंडगिरीला थारा नको, दहशतीच्या जोरावर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांचा बंदोबस्त करणे, तालुक्यात शांतता निर्माण करणे, हेच नव्या आमदाराकडून अपेक्षित आहे.