… अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून सध्या जो गोंधळ सुरू आहे, त्याला एकमेव जबाबदार म्हणजे खासदार कोल्हे. लोकसभेला स्वत: निवडून येण्यासाठी कोल्हेंनी सर्वांनाच हाताशी पकडले व आपला स्वार्थ साधून घेतला. त्यावेळी कोल्हेंनी बाबाजी काळे, सुधीर मुंगसे व अतुल देशमुख या तिघांनाही विधानसभेच्या उमेदवारीवरून शब्द दिलेले होते. गंमत म्हणजे कोल्हे आतून मनीषा गोरेंसाठी प्रयत्न करत असल्याचे खात्रीशीर समजते. दुसरीकडे कदाचित कोल्हेंनी अनिलबाबा राक्षे यांना देखील शब्द दिलेला असू शकतो. कारण कोल्हे हे खुपच मोठे नेते झालेले आहेत. 

मूळ शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन्ही पक्षांची शकले उडाली नसती तर कोल्हेंना या दोन्ही पक्षांनी लोकसभेचे तिकीट दिले नसते. मध्यंतरी ते भाजपच्या आश्रयाला देखील चालले होते. हे दोन्ही पक्ष फुटल्यामुळे या बाबाला सुगीचे दिवस आलेले आहेत. निवडून आल्यानंतरही हा बाबा मतदारसंघात किती फिरला? या बाबाने जे मागच्या वेळेस केले तेच यावेळेस देखील केले. 

कोल्हेंमुळे खेडची जागा जाऊ शकते. उमेदवारीचा हा गोंधळ लवकर मिटला नाही तर महाविकास आघाडीमघ्ये बंडखोरी अटळ असून ही बंडखोरी आमदार मोहितेंच्या पथ्यावर पडू शकते. आणि याला खासदार कोल्हे महोदय पूर्णपणे जबाबदार असतील. कदाचित असेच व्हावे ही तर …… चीच इच्छा असावी.

आज खासदार कोल्हे हे इच्छूक उमेदवारांसाठी हिरो आहेत. विधानसभा निवडणूकींचे तिकीट तर एकालाच मिळणार आहे. ज्या ज्या इच्छूकांना तिकीट मिळणार नाही, त्यांच्यासाठी कोल्हे हे व्हिलन ठरणार आहेत. लोकसभेला हेच इच्छूक कोल्हेंना डोक्यावर घेऊन नाचत होते.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील हजारो मतदारांना कोट्यावधी रूपये खर्चून विविध धार्मिक स्थळी नेणे, आखाडात दारू मटणाच्या पंगती देणे, दही हंड्या, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक मदती देणे हे राजकीय परिपक्वतेचे, समाजहिताचे वा जनकल्याणाचे लक्षण नाही. असे करण्यामध्ये केवळ आणि केवळ हा वैयक्तिक स्वार्थच दडलेला असतो. ही खऱ्या राजकारण्याची ओळख नसते. अशा लोकांकडे ना तालुक्याच्या विकासाचे काही व्हिजन असते ना  तालुक्यांतील विविध समस्यांची, प्रलबिंत प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची अंगभूत क्षमता असते. ही मंडळी शुद्ध व्यावसायीक हेतूने काम करत असतात. त्यामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी चुकीचा उमेदवार न देतां एखाद्या सुसंस्कृत व्यक्तीला की जिचा तालुक्यांतील जनतेला काहीही त्रास होणार नाही, तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी दहशतीच्या जोरावर ओरबाडल्या जाणार नाहीत, गुंडगिरी फोफावणार नाही, चाकण एमआयडीसीत शांतता निर्माण होईल, आपल्याच टग्या, गावगणंगांची ठेकेदारी निर्माण होणार नाही की टक्केवारी, हप्ता वसुली करणार नाही, अशाच व्यक्तिला निवडून द्यावे. केवळ चुकीच्या कामांतून कमावलेला प्रचंड पैसा आहे, म्हणून त्याला निवडून द्यायचे हा पायंडा पडू न देण्याची खबरदारी मतदारांनी घेण्याची गरज आहे. ‘मी’ खुप वर्षांपासून विधानसभेची तयारी करतोय, पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसांचे फ्लेक्स लावून संपूर्ण तालुका विद्रूप करतो म्हणून ‘मला’ निवडून द्या, असे म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. चुकीचा माणूस निवडून गेला तर तालुक्यांतील जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येणार, हे बाकी नक्की. त्यामुळे तालुक्याचे वाटोळे होऊ नये, यासाठी तालुक्यांतील मतदारांनी सावध राहिले पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे हे सर्वथा चुकीचे ठरेल.

महाविकास आघाडीचे शिर्षस्थ नेते केवळ जागा जिंकण्यासाठी एखादा चुकीचा उमेदवार देतील. तो निवडून देखील येईल. परंतू पाच वर्ष त्याला सहन करण्याशिवाय जनतेपुढे पर्याय नसेल.

काहीही झाले तरी आम्हाला खेड तालुक्याचे आमदार व्हायचे आहे, अशाच ध्यासाने काही इच्छूक मंडळी पछाडलेली आहेत. ही मंडळी कोणत्याच काटकोनातून जातीवंत राजकारणी वाटत नाही. ही मंडळी पूर्णत: व्यावसायीक व गुंतवणूकदार आहेत. आमदार मोहितेंकडे जी राजकीय प्रगल्भता, परिपक्वता, समज आहे, तालुक्यांतील विविध विषयांचा अभ्यास आहे, विविध प्रश्न जोरकसपणे मांडण्याची हातोटी आहे, ती यांच्याकडे अजिबात नाही. मोहितेंना विरोध करून निवडून येणे, हाच यांचा अजेंडा आहे. ठीक आहे की, पंधरा वर्षांत मोहितेंनी तालुक्यात नंगानाच केला असेल, परंतू जो कोणी तालुक्याचा नवीन आमदार होईल, तो काय ‘एकदम धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असेल’, असं म्हणण्याची हिंमत, दावा कुणीच करणार नाही. 

ज्याला राजकारणाची बाराखडी माहिती नाही, राजकारणाचा बिलकुलही गंध नाही, अशी व्यक्ती जर तालुक्याचे नेतृत्व करू लागल्या तर तालुक्याचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. 

विरोधीपक्षा बरोबरच स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, त्यांच्या गमतीजमती करणे, यात दिलीप अण्णांना भलताच उत्साह व रस असतो. यात त्यांना भरपूर समाधान व आनंद मिळतो, हेही अगदी खरेच आहे. अण्णांनी स्वत:च्या पुतण्यांना, भाच्यांना, मेव्हण्यांना, जवळच्या, लांबच्या सग्यासोयऱ्यांच्या बेरोजगार पोरांना खेड तालुक्यात स्थलांतरीत करून त्यांचे भले केले, असे त्यांच्यावर नेहमीच आरोप होत असतात. हे ही तितकेच खरे. अशीही वंदता आहे की, एका दिवट्या भाच्याने तर खेड तालुक्यात विविध मार्गांनी शेकडो एकर जमीन घेऊन ती विकसित करण्याचे काम केलेले आहे. 

समजा दिलीप अण्णा निवडणूकीत पडले तर त्यांच्याजागी तालुक्याचा होणारा नवा आमदार हा एकदम शहाजोग असेल, निष्कलंक असेल, आपल्या सग्यासोयऱ्यांचे, समर्थकांचे अजिबात भले करणारा नसेल, तो फक्त जनहिताचेच कामे करणारा असेल, तो स्वत:च्या तुंबड्या भरणारा नसेल, तो चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आपल्या बगलबच्च्यांना, स्वत:च्या पोरांना, पुतण्यांना, भाच्यांना, विविध प्रकारचे कामांचे ठेके मिळवून देण्यासाठी अजिबात धडपडणार नाही की दमबाजी करणार नाही की दहशत निर्माण करणार नाही. तो केवळ आणि केवळ जनतेचेच हित पाहणारा असेल. तो गरीबांच्या, आदिवासींच्या जमीनी हडप करणारा नसेल. स्वत:चे घरदार सोडून तिन्ही सांजा तो जनकल्याणाचाच विचार करणारा असेल, तो शासकीय कंत्राटे स्वत:च्याच घरात, मर्जीतील ठेकेदारांना वाटणारा नसेल, तो तालुक्यात दहशत निर्माण करून गुंडगिरी करणारा नसेल, तो अधिकाऱ्यांना नाहक त्रास देणारा नसेल, तो भ्रष्ट व वादग्रस्त अधिकाऱ्यांना तालुक्यात आणून तालुका लुबाडणारा नसेल, तो नद्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवून, नद्यांच्या पात्रात संरक्षक भिंत टाकून पूर नियंत्रण रेषेत प्लाॅटिंग करणारा नसेल, तो ठेकेदारीच्या माध्यमातून दलाली घेणारा नसेल, आदी आदी या केवळ भ्रामक व भाकड समजूती आहेत. 

पंधरा वर्षे आमदारकी उपभोगून अण्णांचे पोट भरभरून गेलेले आहे. एवढे की दोन्ही बाजूंनी ते ओसंडून वाहत आहे.  

सर्वांगीण व पारदर्शी विचार केला तर खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांच्यासारखा पूर्ण राजकारणी, मुरब्बी, त्यांच्याजवळपास जाऊ शकेल, अशा तोडीचा राजकारणी आज तरी कुणीच नाही. इतर जी कुणी मंडळी आहेत ती मोहितेंच्या पुढे अगदी खुजे वाटतात. 

दरम्यान माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे, ॲड. स्व. बापूसाहेब गारगोटे आज ह्यात असते तर चित्र पूर्णपणे वेगळे दिसले असते. दुदैवाने त्यांची राजकीय पोकळी कुणालाच भरून काढता आलेली नाही. 

आमदार मोहिते सोडले तर तालुक्यात जी राजकीय पोकळी वा जागा आहे, त्यात त्यांच्या कोणत्याच विरोधकांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे शक्य झालेले नाही.