आई… मला गर्भातच राहू दे गं सुरक्षित…!
द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे

आई,
माझ्यासाठी सर्वात सुरक्षित जागा
म्हणजे, तुझे गर्भच गं
पण याच गर्भावर वासनांध नराधमांच्या
नजरा खिळून बसल्यात गं
नको नको हे जग दाखवू मला
मला अशीच कायमची तुझ्या
गर्भातच ऊब दे गं आई
अगं वर्षाचं तान्हुलं असो
की ऐंशी वर्षांची वृद्धा असो
की एखादी पोटाशी महिला
कुणालाच सोडत नाही गं
ही जंगली वासनांध श्वापदं
आई,
तुझाच विश्वास आहे गं मला या जगात,
काही काही वासनांध बाबा देखील
आपल्याच लेकीला वासनेची शिकार बनवितात
असं ऐकलंय गं मी?
हे खरं आहे ना आई?
नको गं, मला तुझ्या गर्भातच
सुरक्षित राहू दे,
असंच होत असेल तर,
कुणाचा विश्वास ठेवून जन्म घेऊ मी?
अनेक ताई आपला वासनांध सख्खा बाप,
भाऊ, मामा, काका, शिक्षक, डाॅक्टर काका
यांनी केलेल्या अत्याचाराच्या जखमा
आयुष्यभर भोगतायेत निमूटपणे
असं देखील ऐकलंय गं मी
छी छी किती किती घाणेरडे,
किती किळसवाणे हे सर्व,
हे पण खरंच आहे ना गं आई?
अनेक जीवनसाथी देखील
स्वार्थासाठी ‘तिचा’ सौदा करतात,
पण लावतात म्हणे ‘तिचा’
हे पण खरंच आहे ना गं आई?
ज्या नात्यांवर विश्वास ठेवायचा असतो
तिच नाती जर ‘नातं’ विसरून लचकेतोड करायला
जीवन बरबाद करायला
मागेपुढे पाहत नसतील तर
बाहेरच्या गिधाडांचे काय घेऊन बसावे?
त्यांच्या घाणेरड्या नजरा तर
सदा टपलेल्याच असतात देहावर
अगं आई दहशत दाखवून
एखाद्या माऊलीचे जीवन बरबाद
करणारी ही गिधाडं
तिच्या लहानग्या, वयात आलेल्या
मुलीला देखील सोडत नाहीत म्हणे
किती किळसवाणे आहे गं हे?
अगं, काही नराधम मुलीसमान
सूनांना देखील सोडत नाही गं
नको गं आई सर्वच पुरूषांची
खुप भिती वाटते गं मला आता
नको नको जन्माला घालुच नको मला
गर्दीत, बसमध्ये, ट्रेनमध्ये,
सार्वजनिक उत्सवात
अगदी मंदिरात देखील
अनेक विकृतांचे पाशवी हात
छाती, नितंबावर पडतात गं
शाळा, काॅलेजेस, राजकिय क्षेत्र,
क्रिडा क्षेत्र, चित्रपट क्षेत्र,
कामांची खाजगी, शासकीय ठिकाणे,
बॅंका, गल्ली बोळा, उच्चभ्रू वस्त्या,
वाडी, वस्ती, गावे, शहरे,
भोंदू बाबांचे आश्रम, आश्रमशाळा,
वस्तीगृहे, बस, रेल्वे सर्वच ठिकाणी
लुटलं जातंय गं स्रियांना
कुठेच सुरक्षित नाही गं ती
शाळेच्या बसचा तो ड्रायव्हर काका,
त्याचीही भिती वाटते गं खुप
वासनेची भूक मिटविण्यासाठी
दहशत, भीती, जबरदस्ती दाखवून
चालणाऱ्या सेक्स कॅंडल संस्कृतीने
किती जणींचे आयुष्य उध्वस्त केले?
कुठे कुठे सांगू, कुठेच सुरक्षित
वाटत नाही गं
सर्वत्रच या नराधमांनी महिलांना
उपभोग वस्तू म्हणून वासनेची
शिकार बनवली आहे गं
आई, वंशाच्या दिव्यासाठी
काही आई, बाबा गर्भातच लेकीची कळी
खूडून टाकतात ना गं?
कधी कधी असं वाटतं आई
तुझे गर्भ देखील आता सुरक्षित
राहिले नाही गं माझ्यासाठी
मी हतबल झाले, असहाय झाले, भेदरलेय मी,
माझी मलाच लाज वाटू लागलीय गं
एकीकडे आईविना भिकारी तिन्ही जगाचा स्वामी
म्हणायचं व आई असणाऱ्या
महिलेलाच निर्वस्त्र करायचे?
किती पाशवीपणा भरलाय समाजात
हीच का आपली संस्कृती?
बाबांचे मित्र, मैत्रिणींचे बाबा
ते सत्तर वर्षांचे आजोबा पण बघ
कसे किळसवाणी न्याहाळतात तिला
या वाईट नजरांनी जीव तिचा गुदमरला गं
खुप भिती वाटते गं या घाणेरड्या नजरांची
नको गं, नको आणू या जगात मला
इथेच तुझ्या गर्भात सुरक्षित राहू दे मला
पण काही काही क्रूर तुझ्या पोटावरही
देखील लाथा घालतात
खुप वेदना होतात गं तुझे हाल पाहूनी
नराधमांना वाचवणाऱ्या, पाठीशी
घालणाऱ्या या गिधाडरूपी जनतेच्या
पालक व रक्षकांना
आई, बहीण, पत्नी, मुलगी, सूना
नाती नसतात का गं आई? मग ते का असे
असंवेदनशील, माणूसकी सोडून
पशूवत वागतात गं?
कोलकत्त्याची डाॅक्टर ताई,
कोपर्डीची ताई, दिल्लीची निर्भया ताई,
हिंगणघाटची प्राध्यापिका ताई,
शक्ती मिलची ताई, हैद्राबादची डाॅक्टर ताई,
कंधामलची ताई, बंटालाच्या ताई,
उन्नाव, हाथरस, बदायूँ,
ज्युबीली हिल्स हैद्राबादची ताई,
कठुआची निरागस ताई, बलरामपूरची ताई
अलियापूरची ताई, मणीपूरच्या ताई,
विल्लुपुरम तामिळनाडू येथील
दोन सख्ख्या लहान लहान ताईंची
पंधरा हैवानांनी केलेली विटंबना,
आणखी किती नावे घेऊ?
काय गुन्हा होता या सर्व ताईंचा?
त्या जंगली श्वापदांपेक्षा
गलिच्छ व लिंगपिस्साट असलेल्या
नराधमांनी का विटबंना केली त्यांची?
आईबाबांचे लाडके लेकरू
का हिरावून घेतले त्यांनी?
अशा असंख्य लहान मोठ्या ताई,
महिला, वृद्धा दररोजच या
विकृतांच्या शिकार होतातच ना
महिला म्हणून काय गुन्हा आहे यांचा?
किती भोगायचे गं आई आता?
एखादी दुसरीच घटना उघडकीस येते गं
अनेक घटना दाबून टाकतात दहशतीवर
आणि आई अशा हैवानांना
पाठीशी घातले जाते गं सन्मानाने
फास्टट्रॅक, कडक कारवाई,
हे शब्दच अंगवळणी पडले गं
या असल्या घोषणा केवळ
पोतेरा फिरवू असतात,
हे पण खरं आहे ना गं आई?
तरी देखील नराधम कुठे शांत बसले गं
दररोज एखादी ताई, लहानगं बाळ,
वृद्धा, महिला पडतीच ना यांना बळी?