जनता दरबारातील जनक्षोभ…. पूर्वनियोजित…?
द्वारा… अतुल दत्तात्रय काळे
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी राजगुरूनगर येथे आयोजित केलेल्या पहिल्या वहिल्या जनता दरबाराचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसून आले. या जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची, कामगारांची जी खदखद वा संताप व्यक्त झाला, तो स्वत: खासदार महोदयांसाठी अनपेक्षित जरी असला, तरी तो अपेक्षित असाच आहे.
“तुम्हाला निवडून देऊन आमचा काही फायदा झाला नाही” अशी टोकाची व पश्चाताप करण्याची वेळ वर्षभरातच लोकांवर का यावी? याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कामगारांच्या प्रश्नांवर कोल्हे यांनी जे मत व्यक्त केले ते समर्थनीय म्हणता येणार नाही. यातून त्यांची राजकिय व सामाजिक अपरिपक्वताच दिसून आली.
मतदारसंघातील जनतेवर छाप पाडण्यात ते पूर्णत: अपयशी ठरलेले आहेत. पडद्यावरील विविध भूमिकांच्या माध्यमातून जनमानसावर अधिराज्य गाजवणे वेगळे व लोकप्रतिनिधी या नात्याने
प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन, त्यांच्यात मिळून मिसळून राहणे, त्यांच्या समस्या व प्रश्न सोडविणे, हे वेगळे. कारण या दोन्ही भूमिकांमध्ये मोठा फरक असतो.
लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वसामान्य लोकांशी जनसंपर्क न ठेवल्यास काय प्रचिती येते? याचा हा उत्तम नमुना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मानहानीकारकरित्या पराभूत होऊनही दिलीप मोहिते यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत जो विजय संपादित केला, तो केवळ पाच वर्षांत ठेवलेल्या जनसंपर्काच्या जोरावर.
त्यामुळे उर्वरीत खासदारकीच्या कार्यकाळात खासदार महोदय पुन्हा जनता दरबार आयोजित करण्याच्या भानगडीत पडतील, ही शक्यता मावळतीला गेली आहे. मुळातच खासदार कोल्हे हे अजूनही इतिहासात वावरत असून दरबारी राजकारणाच्या मानसिकतेतून ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.
जनता दरबार आयोजित करून स्वत:चे हसू करून घेण्यापेक्षा जनतेच्या दारात जाण्याची खरी आवश्यकता आहे. त्याशिवाय मतदारसंघातील वास्तवाची, समस्यांची जाणीव होणार नाही. डोक्यावर घेतलेल्यांना डोक्यावरून थेट खाली जमिनीवर आपटवण्याची ताकद सर्वसामान्य लोकांमध्ये असते, हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे.
दरम्यान जनता दरबारात कोल्हे यांना खिंडीत पकडून त्यांची कोंडी करण्याचे मनसुबे पूर्वनियोजित होते? अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे.
त्यातच खेड तालुक्याचे स्वपक्षाचे जेष्ठ आमदार दिलीप मोहिते यांची जनता दरबाराला असलेली अनुपस्थिती न बोलता बरेच काही सांगून गेली. लोकसभा निवडणूकीत खासदार कोल्हे यांना खेड तालुक्यातून आघाडी मिळणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र कोल्हे यांना खेड तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी मोहिते दांपत्य व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले होते. त्यामुळे चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी आमदार मोहिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार कोल्हे हे नक्कीच उपस्थित राहतील, असे छातीठोकपणे सांगितले जाते. तसेच अखेरच्या क्षणापर्यंत कोल्हे यांची वाट पाहिली जात होती. परंतु कोल्हे हे काही येऊ शकले नव्हते. त्यामुळे जनता दरबारातील जनक्षोभाच्या माध्यमातून ती ‘सल’ व्यक्त तर झाली नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
पूर्वीचा खेड व आत्ताच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना सलग तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेत पाठविले होते. परंतु आढळराव यांना पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात मतदारसंघात भरीव असे काहीच करता आले नाही. कामांच्या बाबतीत ते पूर्णत: निष्क्रिय राहिले. उलट महत्त्वाच्या विकासकामांना त्यांनी सातत्याने विरोधच केला होता. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे पंधरा वर्षे जनतेला केवळ खोटी आश्वासने देणाऱ्या व चौथ्यांदा खासदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या आढळरावांना
मतदारसंघातील जनतेने संसदेत न पाठवता घरी पाठविले व डाॅ. अमोल कोल्हे या तरूणावर विश्वास दाखवून त्याला भरघोस मतांनी खासदार म्हणून निवडून दिले होते.
हक्काचा माणूस या नात्याने कोल्हे यांच्या माध्यमातून आता आपले प्रलंबित प्रश्न सुटतील, ही आशा सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर अपवाद वगळता खासदार कोल्हे मतदारसंघात कधी आले व कधी गेले हे सर्वसामान्य जनतेला कधी समजलेच नाही. दरम्यान संसदेच्या अधिवेशनामुळे कोल्हे यांना मतदारसंघात येणे शक्य नसल्याचे सांगितले गेले होते. सर्वसामान्य जनतेचे जाऊ द्या, परंतु स्वत:च्या पक्षातीलच कार्यकर्त्यांनी देखील खासदार कोल्हे हे मतदारसंघात येत नसल्याची तक्रार करून पाहिली होती. उलट राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी कोल्हे यांचीच बाजू घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडसावले होते.
त्यानंतर विधानसभा निवडणूकीत कोल्हे हे ब्रॅंड ॲम्बेसीडर या नात्याने प्रचारासाठी राज्यभर फिरत राहिले. त्यामुळे देखील कोल्हे यांना लोकांशी फारसा संपर्क ठेवता आला नाही.
कोल्हे यांना खासदार म्हणून निवडून जाऊन थोड्याच दिवसांनी एक वर्षे पूर्ण होत आहे.
परंतु एक वर्षाच्या काळात मतदारसंघातील जनतेशी त्यांना फारसा संबंध वा संपर्क ठेवता आलेलाच नाही. त्यांचे जनसंपर्क कार्यालय नेमके कुठे आहे? हेच अनेकांना माहिती नाही. कितीही वाजता व कुणाचाही फोन उचलायचा असतो, हे साधे तत्व त्यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.
खासदार कोल्हे हे उपलब्ध होत नसल्यामुळे लोकांना त्यांचे प्रश्न, समस्या कुणाकडे घेऊन जावे? असा प्रश्न पडलेला आहे.
दरम्यान जनसंपर्काच्या बाबतीत शिवाजीराव आढळराव हे कोल्हे यांच्यापेक्षा निश्चितच उजवे ठरतात. भले त्यांना मतदारसंघात फारसे काही करता आलेले नसले तरी अपवाद वगळता ते लोकांना सहज उपलब्ध व्हायचे. लोकांना कागदोपत्री मदत करायचे. दर रविवारी ते हक्काने लांडेवाडीला उपस्थित राहून लोकांना, कार्यकर्त्यांना भेटत असत. अजूनही आढळराव यांचा जनसंपर्क कमी झालेला नाही. खासदार कोल्हे यांनी जनतेच्या मनांतील रोष वेळीच ओळखण्याची गरज आहे. दुसरीकडे स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील कोल्हे यांच्याबद्दल मोठी नाराजी आहे.
मोठी संधी मिळूनही खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांना जनतेने ज्या पद्धतीने झिडकारले, तशीच गत कोल्हे यांची झाल्यास, आश्चर्य वाटू नये.
सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांना गृहित धरू नका…!