चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला ठोकले टाळे… आठ दिवस कामकाज ठप्प…
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षानेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलुप लावून कार्यालयच बंद केले. कुलुप लावल्यामुळे पाणीपुरवठा विभागासह लेखा विभागही आठ दिवस बंद होता. परिणामी या दोन महत्वाच्या विभागांचे कामकाज तब्बल आठ दिवस ठप्प पडले होते. या घटनेबद्दल शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आठव्या दिवशी मुख्याधिकारी निलम पाटील यांनी पंचनामा करून दुसऱ्या चावीने कुलुप उघडले व कार्यालय खुले केले. याबाबत पाटील यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी अहवाल दिला आहे. हि नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे.
संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ता निलेश कड, राम गोरे, सर्फराज सिकीलकर, आनंद गायकवाड, दत्तात्रय गोरे, सागर धाडगे, हनुमंत कुऱ्हाडे, विकास नायकवडी, सुदर्शन जगनाडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण शहर उपाध्यक्ष अमोल घोगरे, योगेश वाडेकर, राहुल नायकवडी यांनीही मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन योग्य त्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान पाणीपुरवठा व जलनि:स्सारण विभागाच्या महिला अभियंत्यांने वैयक्तिक कारणांमुळे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे तडकाफडकी राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे संबधित महिला अधिकाऱ्यांनी राजीनामा दडपणाखाली तर दिला नाही ना? याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धक्कादायक म्हणजे चाकण नगरपरिषदमध्ये महिला तक्रार निवारण समितीच अस्तित्वात नाही.
एका व्यक्तीला पाणी देण्यावरून नगराध्यक्ष व पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यात वाद झाले होते. त्यावरुन हा सर्व राडा झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचारी व काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. आठ एप्रिल रोजी पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकण्यात आले होते. या विभागाच्या आतमध्ये लेखाविभागही आहे. या लेखाविभागात नगरपरिषदेची रोज जमा होणारी रोख रक्कम ठेवली जाते. दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्वाच्या विभागाला संबंधित संस्थेच्या प्रमुखांनीच टाळे ठोकणे, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे.
याबाबत मला काहीही माहीत नाही. तसेच चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी देखील यासंबंधी माझ्याशी काही बोललेल्या नाहीत.
संजय तेली, प्रांताधिकारी, खेड.
अशा पध्दतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे लावून सर्व कामकाज ठप्प करणे, हे नगराध्यक्ष पदाच्या व्यक्तीला शोभणारे नाही. त्यांनी समन्वय साधणे आवश्यक होते.
निलम पाटील, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.
पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहे. ते जागेवर नसतात. पाणीपुरवठय़ाबाबत नागरीकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला कुलुप लावले.
शेखर घोगरे, नगराध्यक्ष, चाकण नगरपरिषद.
नगरपरिषदेच्या काही विभागांना कुलुप लावून सरकारी कामात अडथळा आणणे, हे गंभीर व निषेधार्थ आहे. तसेच संबंधित विभागातील एका महिला अधिकाऱ्याने राजीनामा का दिला? याची चौकशी केली पाहिजे.
राम गोरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
चाकण नगरपरिषदेच्या एका महिला अधिकाऱ्याने तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रकरणाशी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलुप लावलेल्या घटनेचा संबंध तर नाही ना? याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होण्याची गरज आहे.
बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष काँग्रेस.
चाकण नगरपरिषदेच्या महिला अभियंत्याने अचानक राजीनामा का दिला? याची चौकशी झालीच पाहिजे. नगरपरिषदेत महिला तक्रार निवारण समिती स्थापन केली जावी.
योगेश वाडेकर, ग्रामस्थ.