‘कळमोडी’च्या नावाखाली खेड व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक…

kalmodi dam

By अतुल दत्तात्रय काळे..

सुरवातीपासूनच राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेले कळमोडी धरण बांधून नऊ वर्षांचा दिर्घ काळ लोटला आहे. परंतू ज्या हेतूसाठी या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे, तो उद्देशच अद्यापपर्यंत सफल झालेला नाही. परिणामी खेड व आंबेगाव तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर इतकी जमीन शाश्वत सिंचनापासून वंचितच आहे. तत्कालीन मंत्री व आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीप वळसे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी त्यांनी मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसेच या प्रकल्पाला खेड व आंबेगाव तालुक्यातील राजकीय विरोधाची किनार लाभलेली आहे. दरम्यान भविष्यात ही उपसा सिंचन योजना पूर्ण होणे अत्यंत कठीण आहे. प्रथमतः या योजनेची व्यवहार्यता तपासणे गरजेचे होते. 

मुळातच उपसा जलसिंचन योजना व्यावहारिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या यशस्वी होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कालांतराने असे प्रकल्प पांढरे हत्तीच ठरतात. त्यातच कळमोडी धरणावरून प्रस्तावित असलेली उपसा सिंचन योजना ही तीन टप्प्यातील असल्यामुळे ती यशस्वी होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. त्यामुळे या योजनेच्या यशापयशाचा विचारच करण्यात आलेला नाही. प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यातील कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या सातगांव पठार भागातील हजारो एकर जमिनींच्या सिंचनासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

खेड तालुक्याच्या अतिपश्चिमेकडील खरपुड गांव व भीमाशंकर अभयारण्याच्या सरहद्दीवर उगम पावलेल्या आरळा नदीवर कळमोडी गावाच्या वरच्या बाजूला कळमोडी धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता अवघी दीड टीएमसी इतकी आहे. या धरणासाठी एकलहरे, शेंदुर्ली, घोटावडे, येणवे बुद्रुक, कुडे बुद्रुक व परसूल या गावांतील १५१ खातेदारांची सुमारे ११२ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यात आलेली आहे. हा सर्व आदिवासीबहुल भाग आहे. या धरणाच्या पाण्यामुळे खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या पंधरा गावांतील ४८८० हेक्टर इतके क्षेत्र सिंचित करण्याचे प्रस्तावित आहे होते. यामध्ये खेड तालुक्यातील १४४० हेक्टर व आंबेगाव तालुक्यातील ३४४० हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश आहे. मोठे कृषीक्षेत्र व बटाटे पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर पाण्याची शाश्वत अशी सोय नाही. त्यामुळे या जमिनीच्या सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी, म्हणून या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या धरणाच्या दीड टीएमसी पाण्यापैकी (०.८७ टीएमसी) इतके पाणी सातगाव पठारासाठी आरक्षित असून उर्वरित पाणी खेड तालुक्यातील सिंचनासाठीप वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. या उपसा सिंचन योजनेअंतर्गत प्रथमतः कळमोडी धरणाचे पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणात पुनर्भरण केले जाणार असून त्यानंतर हे पाणी उपसासिंचन योजनेद्वारे तीन टप्प्यात म्हणजेच सुमारे ९८० फुट इतके उंच उचलून दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या कान्हेवाडी खिंडीतून आंबेगाव तालुक्यातील वेळेश्वर येथे उगम पावणाऱ्या वेळ नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी वेळ नदीवर कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ व पारगाव येथे बांधलेल्या नऊ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये साठविल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने हे पाणी उचलण्याचे अंतर्भूत करण्यात आलेले आहे. हे सर्व बंधारे नाम. राज्यपाल यांच्या टंचाई निवारण निधीतून २००९ मध्येच बांधून पूर्ण केलेले आहेत. या पाण्यामुळे सातगाव पठारावरील सुमारे ३४४० हेक्टर इतकी जमीन सिंचित होणार आहे.

या उपसा सिंचन योजनेचे चासकमान धरण ते कान्हेवाडी खिंड या दरम्यान तीन टप्पे असून साधारणतः हे अंतर पाच किमी इतके आहे. पहिला टप्पा हा चार किमी इतक्या लांबीचा असून यासाठी तीन फुट व्यासाच्या लोखंडी पाईपाच्या दोन रांगा प्रस्तावित असून दुसरा व तिसरा टप्पा हा अर्धा अर्धा किमीचा आहे. हे पाणी तीन टप्प्यात उचलण्यासाठी तब्बल १०७०० अश्वशक्ती ( ८००० कि वॉट) इतकी वीज लागणार आहे. यासाठी चासकमान धरणाजवळच एक विद्युत उपकेंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे.

दुसरीकडे याच उपसासिंचन योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील जी जमीन सिंचित होणार आहे, त्यासाठी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यापासून म्हणजेच डोंगराच्या कडेने सुमारे दहा किमी इतक्या लांबीचा कालवा खोदला जाणार आहे. या कालव्याच्या माध्यमातून चासकमान डाव्या कालव्याच्या उत्तरेकडील असणाऱ्या कडधे, कान्हेवाडी, मोहकल, कमान,चास,मिरजेवाडी, घनवटवाडी, पापळवाडी व बहिरवाडी या गावांच्या हद्दीतील डोंगराच्या कडेची १४४० हेक्टर इतकी जमीन भिजणार आहे. परंतु कालव्याची खोदाई अद्यापही चालू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. मुळातच कालवा खोदाईचे काम प्रचंड वेळखाऊ आहे. त्यामुळे ज्याअर्थी दिलीप वळसे यांनी आंबेगाव तालुक्यातील सर्व बंधारे मान. राज्यपालांच्या टंचाई निवारण निधीतून पुर्ण केले, त्याचवेळेस कालव्याची खोदाई अपेक्षित होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान दहा वर्षांच्या कालखंडानंतर खोदाईचा खर्च देखील प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.

वादग्रस्त राजकीय पार्श्वभूमी.. कळमोडी धरण प्रकल्प सुरवातीपासूनच राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरला होता. या धरणाचे पाणी प्रामुख्याने खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त अशा पश्चिम व पूर्व भागाच्या सिंचनासाठी मिळावे, म्हणून तालुक्याचे तत्कालीन माजी आमदार कै. नारायणगाव पवार यांनी कळमोडीचे पाणी सिंचनासाठी सातगांव पठार भागात नेण्यास आमदार दिलीप वळसे यांना तीव्र विरोध केला होता. दरम्यानच्या काळात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी देखील कळमोडीच्या पाण्यावरून वळसे यांना आव्हान दिले होते.

धरणग्रस्तांच्या योगदानावर पाणी.. कळमोडी धरणाच्या निर्मितीसाठी पाणलोट क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने कवडीमोल किमतीने लुबाडल्या होत्या, त्या धरणग्रस्तांना तसेच त्या भागातील नागरिकांना अग्रहक्काने पिण्यासाठी व सिंचनासाठी या धरणावरुन लहान लहान सिंचन योजना राबविण्याची गरज होती. परंतु त्याकडे तत्कालीन मंत्री व विद्यमान आमदार दिलीप वळसे, माजी आमदार दिलीप मोहिते, विद्यमान आमदार सुरेश गोरे तसेच तब्बल चौदा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा डांगोरा पिटणारे बोलघेवडे थापाडे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी जाणूनबुजून दूर्लक्षच करण्याचे काम इतक्या वर्षात केलेले आहे. मुळातच या लोकप्रतिनिधींनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांची, सातगांव पठार भागातील शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक केलेली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील जनतेकडे मते मागताना सर्वांनीच आपापल्या सदसदविवेकबुद्धीला जागे करण्याची नितांत गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या धरणाच्या निर्मितीसाठी दिलीप वळसे यांनी जी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती, तत्परता दाखविली होती, त्याच तत्परतेने संबंधित धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हाताळणे गरजेचे होते. मात्र त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच केले.