डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘अस्तनीतल्या निखाऱ्यां’ पासून सावध राहावे.
By अतुल दत्तात्रय काळे..
शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढत ही राज्यातील प्रमुख लक्षवेधी लढतींपैकी एक आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत आता अतिशय रोमांचक स्थितीत गेली आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक बाकी नक्की की शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. सध्यातरी डॉ. कोल्हे यांना सर्वसामान्य जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असून परिवर्तनाची चाहूल नक्कीच लागलेली आहे. मात्र असे असले तरी डॉ. कोल्हे यांना स्वपक्षातील ‘अस्तनीतल्या निखाऱ्यां’पासून सावध राहण्याची गरज आहे.
सध्या दोन्ही बाजूंकडून विशेषतः सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालू असलेल्या प्रचारावर वैयक्तिक टिका टिपणीवर अधिक जोर दिला जात आहे. तसेच दोन्हीही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात फेकाफेकी चालू आहे. दुसरीकडे गावभेटी दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी होत असलेल्या प्रचार सभांच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. ‘तो मी नव्हेच’ या भूमिकेतून दोन्ही पक्षांचे नेते विकासाच्या मुद्द्यांवरून एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. असे करताना मात्र महत्त्वाच्या प्रश्नांना सोयीस्करपणे बगल दिली जात आहे.
शिवसेना पक्षाचा विचार केला तर खासदार आढळराव हेच या मतदारसंघातील पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. आमदार सुरेश गोरे व इतर शिवसेना पदाधिकारी केवळ नावापुरतेच आहेत. कारण आढळराव यांनी या मतदारसंघात सेनेच्या कुणालाच मोठे होऊ दिलेले नाही. सुरेश गोरे हे स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेले आहेत. कमीत कमी या मतदारसंघात तरी शिवसेना पक्षापेक्षा ‘आढळराव सेना’च अधिक मजबूत आहे. शिवसेना वाढीसाठी त्यांनी काहीच केले नाही. मुळात ते शिवसेनेचे खासदार म्हणून कधी वागले नाही व वाटले देखील नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचा विचार केला तर, या पक्षात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. परंतु एरवी कधीही एकमेकांचे तोंड न पाहणारे, एकमेकांच्या पायात पाय घालून तोंडावर आपटवणारे या पक्षाचे नेते, पदाधिकारी झाले गेले गंगेला मिळाले, या भूमिकेतून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचारात मग्न आहेत. मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांच्यातील प्रेम ओसंडून वाहत आहे. दरम्यान एकमेकांचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची ही सारी धडपड आहे. बाकी काही नाही. कारण आता नाही तर पुन्हा कधीच नाही, याची जाणीव एव्हाना सर्वांना झालेली आहे.
असे असले तरी इतिहास पाहता राष्ट्रवादीतील ही एकी लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत अशीच टिकून राहणार की त्यापूर्वीच कच खाणार, हे तेवीस मे यादिवशी दिसेलच. कारण राष्ट्रवादीच्या यापैकीच बहुतांश नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये आढळराव यांना छुपी मदत केलेली आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या याच फुटीरांमुळे आढळराव तीनदा खासदार झाले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आढळरावांच्या तिन्ही विजयात राष्ट्रवादीतील ‘अस्तनीतल्या निखाऱ्यांचा’ मोठा वाटा राहिलेला आहे. आढळराव यांच्या विजयात त्यांचे स्वकर्तृत्व किती आहे, हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. असो.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावभेटी दौऱ्यांना ग्रामस्थांचा जो प्रतिसाद, पाठिंबा मिळत आहे, तो केवळ डॉ. अमोल कोल्हे यांच्या वलयामुळे, त्यांनी साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे. तसेच राष्ट्रवादी पक्षाला मनापासून मानणाऱ्या मतदारांचा. खासदार आढळरावांना पंधरा वर्षांत पार विटून, कंटाळून गेलेल्या जनतेचा. सर्वात महत्वाची जाणवणारी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणूकीपुरती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पंधरा वर्षे जी मरगळ आली होती, ती मरगळ अमोल कोल्हे यांच्यामुळे गायब होऊन त्यांच्यात नवचैतन्य संचारले आहे. प्रचंड ऊन असतानाही आमदार दिलीप वळसे व माजी आमदार दिलीप मोहिते हे दोघेही पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. परंतु आज सर्वसामान्य मतदार व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकच भीती सतावत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वीच्या झालेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीतील पराभवात राष्ट्रवादीतीलच फुटीरांचा हात होता. त्यामुळे अशा लोकांपासून कोल्हे यांनी सावध राहिले पाहिजे.
या मतदारसंघात अनेक मुलभूत प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. प्रामुख्याने यामध्ये धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन, धरणांची मालिका असूनही पाचवीला पुजलेली पाणीटंचाई, सिंचन क्षमता वाढविण्यात आलेले अपयश, रस्ते, वाहतूककोंडी, मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित होऊनही वाढलेली बेरोजगारी, अवैध बांधकामे, हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक उभारण्यात आलेले अपयश, एक नाही असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. पंधरा वर्षे राज्यात व दहा वर्षे केंद्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच सरकार होते. तसेच गेल्या पाच वर्षांपासून राज्यात व केंद्रात भाजप व शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आहे. परंतु ना आघाडी व ना महायुतीचे शासन या मतदारसंघातील प्रश्न सोडवू शकले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
दुसरीकडे विकासाचे इमल्यावर इमले बांधल्याची भाषा करणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वेळोवेळी केलेल्या दाव्यांनुसार खेड तालुक्यात हजारो कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच आंबेगावचे आमदार दिलीप वळसे यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्रीपद, ऊर्जामंत्रीपद होते. विधानसभेच्या अध्यक्षपदावर देखील ते विराजमान होते. दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास करणाऱ्या आमदार अजित पवार यांच्यारुपाने पुणे जिल्ह्याला उपमुख्यमंत्री व पालकमंत्री लाभले होते, तरीदेखील शिरुर लोकसभा मतदारसंघाचा विकास का होऊ शकला नाही? महत्वाचे प्रश्न का प्रलंबित आहेत? विशेषतः खेड तालुक्यावर कायमच अन्याय झाल्याची भावना जनतेमध्ये आहे. याउलट आपापल्या राजकीय गढया मजबूत करण्याचेच काम संबंधितांनी केले आहे. आणि आज ‘मी नाही त्यातला’ म्हणून सर्वचजण एकमेकांकडे बोट दाखवून आपापली सामाजिक जबाबदारी झटकू पाहत आहेत.