पिकअप टेम्पो दरीत कोसळून २८ जखमी
खेड तालुक्यातील चासकमान धरणांतर्गत साकुर्डी- निर्मलवाडी दरम्यान असलेल्या घाटात पिकअप टेम्पो दरीत कोसळून २८ जण जखमी झाले. बुधवार दि, २६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोतून प्रवास करणारे प्रवाशी हे कोयाळीच्या सुपेवाडी येथील आहेत. याबाबतची माहिती अशी की, कोयाळीच्या सुपेवाडी येथील ग्रामस्थ पिकअप टेम्पोतून वाडा येथे रेशनिंग भरण्यासाठी गेले होते. वाडा येथून पुन्हा माघारी सुपेवाडीला परतत असताना साकुर्डी गावाच्या पुढे असलेल्या साकुर्डी निर्मलवाडी घाटात अचानक समोरुन आलेल्या टॅंकरमुळे टेम्पो चालकाचे स्टिअरिंग वरील नियंत्रण सुटले व टेम्पो पाठीमागे येत दरीत कोसळला. सर्व ग्रामस्थ आदिवासी ठाकर समाजातील असल्याचे समजते.