सोळावं वरीस धोक्याचं…!!
By अतुल दत्तात्रय काळे
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची लगीनघाई जोरात सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव हे या निवडणुकीत ‘चौकार’ मारण्याच्या तयारीत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विलास लांडे यांच्याऐवजी अभिनेते अमोल कोल्हे यांना मैदानात उतरविले आहे. कोल्हे यांच्या ‘एंट्री’ मुळे ही निवडणूक आढळराव यांच्यासाठी नक्कीच सोपी नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान माजी आमदार विलास लांडे यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. पुणे-नाशिक महामार्गावर व इतरत्र मोठमोठ्या होर्डिंग्जच्या माध्यमातून लांडे यांंनी खासदार आढळराव हे विकास कामांच्या बाबतीत कसे निष्क्रिय ठरले आहेत, हे मतदारांच्या मनांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे आढळराव यांचे सर्व लक्ष शिवसेना व भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी युती होते की नाही? याकडेच लागून राहिले होते. अखेर ठरल्याप्रमाणे ‘तुझ्यात जीव गुंतला’ म्हणत एकदाची शिवसेना व भाजप यांच्यातील युतीची घोषणा झाली, अन आढळराव यांचा जीव एकदम भांड्यात पडला. त्यांच्यात दहा हत्तींच्या बळाचा संचार झाला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आढळराव यांनी देखील ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून राजकीय वातावरण आणखी तापविले. एक मात्र नक्की की, यंदाची शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुक कमालीची रंगतदार व अटीतटीची होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिरुर लोकसभा मतदारसंघ पुन्हा जिंकायचाच, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. कोल्हे यांच्या रुपाने शहरी व ग्रामीण भागातील घराघरांत पोहचलेला एक तरुण व उच्चशिक्षित उमेदवार राष्ट्रवादीला मिळाला आहे. त्यातच खासदार आढळराव यांनी जाहीरपणे एकेकाळचे आपलेच सेनेतील सहकारी असलेल्या अमोल कोल्हे यांची ‘जात’ काढल्यामुळे आढळराव यांच्याविषयी सुज्ञ मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. तसेच या वक्तव्यामुळे आढळराव यांच्यातील अस्वस्थता प्रकर्षाने दिसून आली असून ते पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
पूर्वीचा खेड व आताच्या शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळविला आहे. तब्बल पंधरा वर्षे त्यांनी या मतदारसंघातून खासदारकी उपभोगली आहे. परंतु पंधरा वर्षात त्यांनी या मतदारसंघाचा नेमका काय कायापालट केला? हे सांगणे खरोखरच अवघड आहे. त्यांनी आश्वासन दिलेले अनेक प्रकल्प, विकासकामे केवळ कागदोपत्री धूळ खात पडून आहेत. त्यामुळे चालू “सोळावं वरीस” म्हणजेच खासदारकीची चौथी टर्म आढळराव यांच्यासाठी निश्चितच ‘धोक्याची’ ठरू शकते. एकंदरीतच सर्वसामान्य जनतेच्या भावनिक प्रश्नांना हात घालून त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या व ‘खोगीरभरती’ केलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा लोकसभेवर पाठवू नये, असाही एक मतप्रवाह प्रकर्षाने सुज्ञ मतदारांमध्ये दिसून येत आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव यांनी ‘विकास आराखडा’ (ब्लू प्रिंट) तयार केला होता. परंतु गेल्या पंधरा वर्षात बासनात गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवलेला तो तथाकथित विकास आराखडा नेमका कसा आहे? हे अद्यापही मतदारसंघातील जनतेला पाहावयास मिळालेले नाही.
गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार आढळराव यांनी प्रामुख्याने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, राजगुरुनगर-सिन्नर महामार्ग, कळंब गावाजवळील मीना नदीवरचा पुल बांधणे, ग्रामीण भागात अद्ययावत हॉस्पिटल बांधणे, पर्यटन स्थळांचा विकास करणे, शिवनेरी किल्ला वगळता मतदारसंघातील इतर आठ दुर्लक्षित किल्ल्यांचा विकास करणे तसेच मतदारसंघातील धरणांमध्ये सी-प्लेन सारखा प्रकल्प राबविण्याचा संकल्प सोडला होता. परंतु यापैकी किती प्रकल्प पाच वर्षांत पूर्णत्वास गेले? याचे उत्तर ‘नाही’ असेच असून आढळराव यांनी याबाबतचा खुलासा मतदारांना प्राधान्याने दिलाच पाहिजे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच प्रत्यक्षात पुणे-नाशिक रेल्वेचे काम सुरू होणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले होते. परंतु असे कोणतेही काम सुरू झालेले नाही. मुळातच आढळराव यांची कृती म्हणजे ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ अशाच स्वरुपाची राहिली आहे. महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेल्या बैलगाडा शर्यती सत्तेत असूनही आढळराव का सुरु करु शकले नाहीत? मतदारसंघातील किती धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळवून दिल्या? सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, चाकण, आळंदी फाटा, चिंबळी, मोशी येथे सातत्याने होणाऱ्या वाहनकोंडीतून वाहनचालक व प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी आढळराव यांनी नेमके काय प्रयत्न केले? इनरकॉन पवनउर्जा प्रकल्पामध्ये तडजोड करून निसर्गसंपन्न अशा खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची नासाडी कुणी केली? खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कुणाच्या विरोधामुळे पुरंदरला गेला? एसईझेडसाठी एक इंचही जमिन घेऊ देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांनी एसईझेडच्या मालकाच्या गळ्यात हात घालून संबंधितांना आपल्या गावी का घेऊन गेले? चाकण औद्योगिक वसाहतीमधील किती कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून दिला? याचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा आढळराव यांनी मतदारसंघातील जनतेसमोर मांडला पाहिजे.आजही मतदारसंघात अनेक प्रश्न ‘जैसे थे’ पडून आहेत.
पूर्वी विरोधी पक्षाचा खासदार असल्यामुळे सरकारकडून जाणीवपूर्वक विकासकामांसाठी निधी दिला जात नव्हता. म्हणून कामे होत नव्हती, असे आढळराव यांच्याकडून जाहीर सभांमधून जनतेला सर्रास सांगितले जायचे. परंतु गेली पाच वर्षे राज्यात व केंद्रात भाजपसोबत शिवसेना देखील सत्तेत सामील आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा खासदार असूनही आढळराव यांनी मतदारसंघातील किती प्रलंबित प्रश्न निकाली काढले? किती प्रकल्प पूर्ण केले? तसेच प्रत्येक निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले? विरोधी पक्षात असताना मतदारसंघातील विकासकामे होत नव्हती, हे एकवेळ मान्य केले. तर मग सत्ताधारी पक्षाचा खासदार असूनही मतदारांना दिलेली आश्वासने का पूर्ण करता आली नाही? हि निष्क्रियता नाही का? मग कशासाठी तुम्हाला लोकसभेवर पुन्हा निवडून द्यायचे? याची जाहीर चर्चा मतदारसंघात होत आहे.
एक मात्र नक्की…. “सोळावं वरीस धोक्याचं” आहे. मतदारराजाला गृहीत धरण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. ‘खोटं बोल पण रेट्टून बोल’ या जुमलेबाजीला आता थारा नाही.