चौकार की त्रिफळाचीत? अढळराव ‘डी झोन’ मध्ये..??
By अतुल दत्तात्रय काळे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उमेदवारांसह विविध पक्षांचे नेतेमंडळी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मतदारांची देखील घालमेल परमोच्च पातळीवर गेली आहे. निवडून येण्यासाठी काही उमेदवार पाण्यात देव ठेऊन बसले आहेत. तर काहीजण बंगाली विद्येच्या आहारी जाऊन मतपेटीतून चमत्काराची अपेक्षा बाळगून आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा विचार केला तर, या निवडणुकीत एकुण तेवीस उमेदवार रिंगणात होते. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे व शिवसेनेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव अढळराव या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहावयास मिळाली. बहुजन समाज पक्षाचे जमीरखान कागदी व वंचित आघाडीचे राहुल ओव्हाळ किती मते घेतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सुरवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल, अशा पोकळ वल्गना करणाऱ्या मंडळीना ही निवडणूक किती अटीतटीची झाली, याचा अंदाजच आला नाही.
दरम्यान दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. एक मात्र नक्की की, या निवडणुकीत कोल्हे यांनी अढळराव यांना चांगलाच ‘घाम’ फोडला आहे. प्रारंभीच अढळराव यांनी कोल्हे यांचा कमकुवत उमेदवार असा उल्लेख करुन त्यांची यथेच्छ खिल्ली उडविण्याचे काम केले होते. अढळराव यांचा हा रणनीतीचाच भाग होता. परंतु सर्वसामान्य मतदारांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. कोल्हे यांच्या विरूद्धची ही लढत अढळराव यांच्यासाठी नक्कीच सोपी नव्हती.
अढळराव हे २५ हजार ते ७० हजार मतांनी निवडून येतील, असा शिवसेना कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यातच एक कार्यकर्ता चारचौघांत म्हणाला की, आमचा उमेदवार दोन अडीच हजार मतांनी निवडून आला तरी चालेल. दुसरीकडे कोल्हे हे ५० हजार मतांनी निवडून येतील, असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. दरम्यान सोमागोमा काअपसे या त्रयींनी मात्र अमोल कोल्हे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. असो. घोडामैदान जवळ आहे. अढळराव हे विजयाचा चौकार मारण्यात यशस्वी होतात की, कोल्हे अढळरावांना त्रिफळाचीत करुन प्रथमच संसदेत जातात, याचे उत्तर येत्या तेवीस मे रोजी मिळेलच. एक मात्र नक्की की दोघांपैकी एकाला गाशा गुंडाळून आपापल्या कामधंद्यांसाठी मुंबईला जावेच लागणार आहे.
२९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात बहुतांश ठिकाणी मतदारांचा कल परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भोसरी वगळता इतर सर्व पाच विधानसभा मतदारसंघात कोल्हेंना आघाडी मिळू शकते. मतदानाच्या दिवशी सर्वात महत्वाची जाणवलेली गोष्ट म्हणजे, बहुसंख्य सर्वसामान्य बहुजन समाजाचे मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. आणि हेच मतदान निर्णायक ठरू शकते. तसेच मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी भाजपचे पदाधिकारी काहीसे अलिप्तच राहिल्याचे चित्र होते. खेड, हडपसर व भोसरी मतदारसंघात भाजपचे अढळराव यांना कितपत सहकार्य मिळाले? हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. ‘जातीचा मुद्द्यावर’ मोठ्या प्रमाणात मतदान घडवून आणण्यात आले.
विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर, स्थानिक उमेदवार या नात्याने जुन्नर तालुका कोल्हे यांच्या पाठीशी राहिल्यामुळे या तालुक्यातून कोल्हे यांना निर्णायक व मोठी आघाडी मिळू शकते. दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्नरचे मनसेचे आमदार शरद सोनवणे यांना अढळराव यांनी शिवसेनेत आणले असले तरी सोनवणे यांच्यामुळे अढळरावांच्या पारडयात फार मोठे मत’दान’ होईल, ही सुतराम शक्यता नाही. सोनवणे यांच्या सेना प्रवेशापेक्षा त्यांच्या डोळ्यावरील काळ्या गॉगलचीच अधिक चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर शरद सोनवणे यांचा शिवसेना प्रवेशाचा निर्णय हा आत्मघाती ठरु शकतो.
गत तिन्ही लोकसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील मतदारांनी अढळरावांना दोन्ही दोन्ही हातांनी भरभरून मतदान केले होते. मतदानाच्या वेळी देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह असायचा. परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती. अढळराव यांच्या बाबतीत तालुक्यातील मतदारांनी हात आखडता घेतल्याचे सर्वत्र दिसून आले. अढळराव यांना स्वतःच्या आंबेगांव तालुक्यापेक्षा खेडमधून मोठी आघाडी मिळेल, असा ठाम विश्वास आहे. परंतु अढळरावांच्या ठाम विश्वासाला यावेळी तडा जाईल, असेच बोलले जात आहे.
आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव अढळराव विरुद्ध दिलीपराव वळसे अशीच लढत झाली. कोल्हे हे मुखवटा होते. अढळराव यांना स्वत:च्या आंबेगाव तालुक्यातून कितपत आघाडी मिळेल? यावरच त्यांची पुढील गोळाबेरीज अवलंबून आहे.
एकमात्र नक्की शिवाजीराव अढळराव हे ‘डी झोन’आहेत.
आढळराव की अढळराव? मतदानपत्रिकेत अनुक्रमांक एकवर आपले नाव राहावे, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी ज्या चलाखीने, चतुराईने आढळराव या आडनावाचे ‘अढळराव’ असे नामांतर केले, तो खटाटोप मतदारांना फारसा काही रुचला नाही. यातून आढळराव की अढळराव यांच्यातील अस्वस्थताच प्रकर्षाने समोर आली. मुळातच या नामांतराची आढळराव यांना गरज का पडली? हे कशाचे लक्षण आहे?