भीमाशंकरचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ कधी होणार?

bhimashankar

By अतुल दत्तात्रय काळे.

सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. किंबहुना भीमाशंकर हे पावसाचे आगार म्हणूनच ओळखले जाते. दरवर्षी येथे साडेतीन ते पाच हजार मिमी इतका पाऊस कोसळतो. या पार्श्वभूमीवर ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराच्या आजुबाजुला असलेल्या सर्वच बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने ऐरणीवर आलेला आहे. येथील सर्व बांधकामे डोंगर उतारावर असून अतिशय दाटीवाटीने बांधण्यात आलेली आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करता या सर्व बांधकामांचे “स्ट्रक्चरल ऑडिट” होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी येथे लाखो भाविक व पर्यटक शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच दररोज हजारो भाविकांची गर्दी भीमाशंकर येथे असते. यासाठी संबधित यंत्रणांनी तसेच शासन स्तरावर गांभीर्याने दखल घेऊन तातडीने वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता आहे.                                                 

भीमाशंकर मंदिर हे अभयारण्य क्षेत्रात खोल दरीत भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. असे असले तरी याठिकाणी नदी नावापुरतीच असून नदीवरच बांधकामे करुन नदीलाच गुप्त करण्यात आलेले आहे. तसेच नदीपात्राच्या दोन्ही बाजुंना अतिक्रमण करुन बांधकामे करण्यात आल्यामुळे नदीचे पात्र अतिशय अरुंद बनले गेले आहे. परिणामी वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे नदीच्या नैसर्गिक वहन क्षमतेवर गंभीर परिणाम झालेला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी याठिकाणी पुरेशी जागाच उपलब्ध नाही. सर्व पाणी अरूंद झालेल्या भीमा नदीतून वाहुन जाते.

मुळातच मंदिराच्या आसपास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मंदिराच्या चोहोबाजुला असलेल्या डोंगराच्या उतारावर जिथे जागा मिळेल तेथे ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. विनापरवाना हि बांधकामे करण्यात आलेली आहेत. अनेकांनी तीन तीन मजली पक्की बांधकामे केलेली आहेत. त्यामुळे बांधकामांच्या रूपाने भीमाशंकर येथील हा अवजड भार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. काहीजणांनी तर डोंगर पोखरून थेट डोंगराला लागुनच घरे बांधलेली आहेत. परिणामी डोंगरावरील माती भुसभुशीत झालेली असून झाडांचे मूळ उघडे पडलेले आहेत. झाडांचा आधारच कमजोर झालेला आहे.

महत्वाचे म्हणजे याठिकाणी जमिनीत मातीचे प्रमाण अधिक आहे. एका अर्थाने निसर्गावर मात करण्याच्या नादात येथे प्रमाणापेक्षा अधिक मानवी हस्तक्षेप सुरु आहे. या सर्व गोष्टींचा मंदिराला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे त्यावर त्वरित नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यातच सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा भीमाशंकर मंदिर विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या माध्यमातून मंदिर परिसरात प्रचंड प्रमाणात बांधकामे होऊ घातलेली आहेत. परंतु श्रद्धेचा विषय पुढे करून तसेच राजकिय स्वार्थासाठी या गोष्टींकडे सर्रास कानाडोळा केला जात आहे. या गोष्टींची किंमत मानवाला निश्चितच मोजावी लागेल, अशी भिती व्यक्त होत आहे.