अखेर सोळावं वरीस धोक्याचं ठरलं.. अतिफाजिल आत्मविश्वासामुळे अढळरावांचा राजकीय शेवट..

amaol kolhe

By अतुल दत्तात्रय काळे.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे तब्बल पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांचा सोळाव्या वर्षी जो मानहानीकारक राजकीय शेवट झाला, तो अपेक्षितच आहे. चौकाराची अपेक्षा ठेवलेले अढळराव हे त्रिफळाचीत झाले.

‘जायंट किलर’ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव यांचा ५८ हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव करुन राष्ट्रवादीचा गड परत ताब्यात घेतला. कोल्हे यांना ६ लाख ३२ हजार ४४२ इतकी, तर अढळराव यांना ५ लाख ७४ हजार १७४ इतकी मते मिळाली. तसेच वंचित आघाडीच्या राहुल ओव्हाळ यांना तब्बल ३८ हजार इतकी मते मिळाली. 

मुळातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त करुन सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे अढळराव यांच्यात एक प्रकारचा अतिफाजील आत्मविश्वास ठासून भरला गेला होता. त्याला तडा गेला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी मोठ्या चलाखीने डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपाने नवखा उमेदवार दिला होता. आणि पवारांची ती खेळी अतिशय यशस्वी ठरली.

दरम्यान सर्वप्रथम ‘पुणे डेक्कन न्यूज’मध्ये “सोळावं वरीस” म्हणजेच खासदारकीची चौथी टर्म आढळराव यांच्यासाठी निश्चितच ‘धोक्याची’ ठरू शकते, याबाबत विस्तृत वार्तापत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या वार्तापत्रात वर्तविण्यात आलेले भाकित तंतोतंत खरे ठरले आहे. तसेच या मतदारसंघातील जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये असल्याचे अधोरेखित केले होते. ‘पुणे डेक्कन न्यूज’ मधून सातत्याने आढळराव यांनी गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या न केलेल्या कामांची, न पाळलेल्या आश्वासनांची तसेच मतदारसंघाच्या विकासाला मारक ठरलेल्या त्यांच्या चुकीच्या निर्णयाची पोलखोल करुन सविस्तरपणे अक्षरशः चिरफाड केली होती. एसईझेड, विमानतळ व इनरकॉन पवनउर्जा प्रकल्पात अढळरावांची भूमिका निश्चितच संशयास्पद ठरली होती.  

दुसरीकडे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने अढळराव यांना गेली पंधरा वर्षे डोक्यावर घेतले होते, अखेर त्याच मतदारांनी त्यांना झिडकारून खाली टाकले आहे. शेवटी सर्वसामान्य जनतेची ताकद प्रचंड शक्तीशाली असते. त्या ताकदीचा अंदाज अढळरावांना आलाच नाही. 

शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांनाच उमेदवारी दिली जाणार, हे नक्की होते. परंतु आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार दिला जाणार? हे तळ्यात मळ्यात होते. राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास कोणीच तयार होत नसल्यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना अढळराव यांच्या विरोधात तयार करण्यात आले. लांडे यांनी देखील मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जोरदार तयारी केली होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची शिवसेनेने हिसकावून घेतलेली जागा परत मिळविण्यासाठी पाॅवरफूल खेळी केली व अनपेक्षितपणे डॉ. अमोल कोल्हे यांना अढळराव यांच्या विरोधात उभे केले. आणि येथेच अढळराव यांची फसगत झाली. अढळराव यांनी कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केल्यामुळे जनतेचे सर्व लक्ष कोल्हे यांच्यावरच केंद्रीत झाले.

मुळातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला पूर्वीचा खेड व आत्ताचा शिरुर लोकसभा मतदारसंघ सलग तीन वेळा शिवसेनेने हिसकावून घेतल्याची सल राष्ट्रवादीला विशेषतः शरद पवार व अजित पवार यांना लागून होती. त्यातच अढळराव यांनी वारंवार शरद पवारांसह राष्ट्रवादीला कायमच तुच्छतेने हिणवण्याचे काम केले होते. माझ्या विरुद्ध पवार कुटुंबातील कुणीही उभे राहून दाखवावे, अशा आव्हानांची भाषा सातत्याने अढळराव यांच्याकडून केली जायची. त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे मैदानात उतरली होती. अपवाद वगळता सहाही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व गटतट प्रचारात एकदिलाने उतरले होते. 

तीन निवडणुकीतील यशामुळे आढळराव उन्मत्त झाले होते. पंधरा वर्षांत त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही करता आले नाही. ते पूर्णपणे निष्क्रीय राहिले. आढळराव कधीही जनतेच्या सुख दुखा:त सहभागी झाले नाही. आणि याच जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. हा विजय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असून निष्क्रीय माजी खासदाराप्रमाणे विद्यमान निष्क्रीय आमदार सुरेश गोरे यांना देखील त्यांची जागा दाखविली जाईल. 

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील